घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात मधुमेहाचे व्यवस्थापन - भाग १

उन्हाळ्यात मधुमेहाचे व्यवस्थापन – भाग १

Subscribe

उन्हाळ्यामुळे वातावरणातील उष्मा वाढला असेल किंवा तुम्ही एखाद्या उष्ण प्रदेशात सुट्टीचा आनंद घ्यायला गेला असाल, तर प्रत्येकानेच उष्णतेसंदर्भात आणि उष्णतेच्या शरीरावर होणार्‍या परिणामांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. जेव्हा पारा वाढतो तेव्हा विशेषतः मधुमेहींनी जास्त काळजी घेण्याची गरज असते. अति उष्णतेचा तुमच्या रक्तशर्करेवर परिणाम होऊ शकतो. अति उन्हाळ्यामुळे तुमची औषधे आणि चाचणी उपकरणेही खराब होऊ शकतात. उन्हाळ्यात मधुमेहींनी त्यांच्या वस्तूंची काळजी घेण्याची गरजच असते.

उन्हाळ्यातील अति उष्म्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो, त्या व्यक्तीला खूप घाम येतो आणि कदाचित ती व्यक्ती डिहायड्रेटेड (शरीरातील पाणी कमी होणे) होऊ शकते, त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढू शकते. तुम्ही डिहायड्रेटेड झालात की तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे अनेकदा मूत्रविसर्जन करावे लागते. त्यामुळे डिहायड्रेशनमध्ये भर पडते आणि रक्तातील साखरेची पातळीसुद्धा अधिक वाढते. वाढलेल्या तापमानाचा औषधांवर आणि इतर मधुमेह व्यवस्थापन वस्तूंवर प्रतिकूल परिणाम होतो. अति उष्णतेमुळे औषधांचा दर्जा खालावतो आणि त्यांचा परिणाम होत नाही व निरुपयोगी होतात.

- Advertisement -

उन्हाळ्यात मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या टिप्स

1) द्रवपदार्थ भरपूर प्रमाणात घ्या – उन्हाळ्यात डिहायड्रेशन पटकन होते. तुम्ही डिहायड्रेटेड होता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर घट्ट होते कारण तुमच्या मूत्रपिंडांमधून वाहणार्‍या रक्ताचे प्रमाण कमी असते. रक्त कमी असल्याने मूत्रावाटे अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडे सक्षमपणे कार्य करू शकत नाहीत. मधुमेहींनी उष्ण हवामानात द्रवपदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत, दिवसभरात पाणीसुद्धा नियमितपणे प्यावे.

२) औषधे आणि संबंधित उपकरणे सांभाळा – उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा मुधमेहाची औषधे, ग्लुकोज मीटर आणि डायबेटिस टेस्ट स्ट्रिप्सवर परिणाम होतो. जेव्हा हवामान उष्ण असते तेव्हा इन्सुलिन आणि इतर औषधांचा दर्जा खालावतो. ही औषधे बर्फाचा पॅक असलेल्या कूलरमध्ये बाळगा. उन्हातील कार, स्विमिंग पूलच्या शेजारी, थेट सूर्यप्रकाशात किंवा समुद्रकिनार्‍यावर ठेवू नका. टेस्ट स्ट्रिप्सबाबतही अशीच काळजी घ्यावी.

- Advertisement -

३) तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा – उष्ण तापमानात तुमच्या शरीरातर्फे इन्सुलिन वापरण्याच्या यंत्रणेत बदल होतो. त्यामुळे मधुमेहींनी रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रमाण वारंवार तपासावे आणि इन्सुलिनचा डोस त्यानुसार घ्यावा.

४) उन्हापासून लांब राहा – मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यात व्यायामाची महत्त्वाची भूमिका असते, पण उन्हामध्ये व्यायामाचा कोणताही प्रकार करणे चांगले नाही. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बाहेर पडावे, जेव्हा तापमान कमी असते.

५) हलके कपडे परिधान करा – उष्णतेप्रमाणेच कडक उन्हाचाही शरीरावर परिणाम होतो. तुम्ही बराच वेळ उन्हात असाल तर तुमची त्वचा पोळते आणि त्याचा तुमच्या मधुमेह नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी नेहमी रुंद कडा असलेली हॅट घाला. त्वचा पोळण्यापासून वाचविण्यासाठी सनस्क्रीन लावा. हलके आणि फिकट रंगाचे कपडे परिधान केल्यास तुम्ही थंड राहू शकाल.

6) तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वारंवार तपासा – उष्ण तापमानामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप खाली-वर होते. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळा ही चाचणी करून घ्यावी. तसे केल्याने ही पातळी संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही योग्य आणि तत्काळ पावले उचलू शकाल.

७) लिंबू पाणी किंवा ताक प्या – मद्यसेवन आणि कॅफिनयुक्त कॉफी व एनर्जी किंवा स्पोर्ट्स पेये टाळा. कारण त्यामुळे शरीरातील पाण्याची घट होऊ शकते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. लिंबू पाणी (साखर विरहित), ताक किंवा कलिंगड, टरबुजाचा रस पिऊ शकता.

– डॉ. प्रदिप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -