‘स्वाइन फ्लू’ पासून करा तुमचे संरक्षण

स्वाइन फ्लू म्हणजे अनेक प्रकारच्या स्वाइन इन्फ्लुएन्झा विषाणूंमुळे होणा-या संसर्गातून होणारा आजार

Mumbai

H1N1 या नावानेही ओळखला जाणारा स्वाइन फ्लू म्हणजे अनेक प्रकारच्या स्वाइन इन्फ्लुएन्झा विषाणूंमुळे होणा-या संसर्गातून होणारा आजार आहे. हा अतिशय वेगाने फैलावणारा आजार असून H1N1 विषाणूने बाधित व्यक्तीच्या अगदी कमीत-कमी संपर्कामुळेही तो पसरू शकतो. जेव्हा बाधित व्यक्ती खोकते, थुंकते किंवा शिंकते तेव्हा विषाणूंचे अतिसूक्ष्म थेंब हवेत फवारले जातात. हे थेंब लिफ्टचे बटन, डोअरनॉब्ज, फ्लश नॉब्ज असे जिथे-जिथे पडतात त्या जागेला आपण स्पर्श केल्यास आपल्यालाही H1N1 स्वाइन फ्लूची बाधा होऊ शकते.

शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या प्रकरणांची संख्या भीतीदायकरित्या वाढत आहे आणि ही गोष्ट लक्षात घेता, लोकांनी या संसर्गाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे व खूप उशीर होण्याआधी योग्य ते प्रतिबंधात्मक उपचार मिळविणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

संसर्गाचा धोका कुणाला जास्त?

पुढील गटांसाठी अतिरिक्त काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे:

 • ६ वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
 • गर्भवती स्त्रिया
 • अवयव प्रत्योरोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती
 • डायलिसिसवर असलेल्या व्यक्ती
 • रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठीची/वाढविण्यासाठीची औषधे घेणा-या व्यक्ती
 • दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती

रोगाची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत?

H1N1ची लक्षणे ही बरीचशी साध्या तापासारखीच असतात. त्यामुळे दोघांमधला फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत;

 • तीनपेक्षा जास्त दिवस भरपूर ताप येणे
 • बरी न होणारी सर्दी व खोकला
 • खोकताना रक्त पडणे
 • श्वसनास त्रास होणे
 • मळमळणे आणि उलट्या होणे
 • नाक गळणे
 • अशक्तपणा आणि थकवा

प्रतिबंधात्मक उपाय

फ्लूपासून दूर राहण्यासाठी पुढील प्रतिबंधात्मक उपाय करावेत.

 • भरपूर पाणी प्या
 • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
 • प्रवास करताना N95 मास्क वापरा (मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध)
 • प्रथिनांनी समृद्ध आहार घ्या

फ्लूमधून बरे होत असाल तर ‘या’ गोष्टी करा

 •  दर दिवशी किमान २-३ लीटर्स पाणी किंवा द्रवपदार्थ घ्या. (ज्यूस, सूप इत्यादी)
 • कॅप्सिकम, कोबीसारख्या फ्लेवर्ड भाज्या खाणे टाळा
 • तळलेले पदार्थ खाणे टाळा
 • प्रोबायोटिक पदार्थांचा आहारात समावेश करा.
 • साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात खा
 • घरीच बनविलेले अन्न खा
(डॉ. कीर्ती सबनीस – संसर्गजन्य रोगतज्ज्ञ व एचआयव्ही फिजिशियन)