घरलाईफस्टाईलअशी घ्या नवजात बालकाची काळजी

अशी घ्या नवजात बालकाची काळजी

Subscribe

मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बाळांच्या बाबतीत तंत्रज्ञानामुळे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. पण या प्रक्रियेत मानवी स्पर्श काहीसा कमी होत गेला आहे. संशोधनातून दिसून आले आहे की, मानवी स्पर्श महत्त्वाचा आहे आणि त्याला आता ह्युमन निओनॅटल केअर (मानवी स्पर्शाचा उपयोग करून केलेली नवजात आरोग्यसेवा) म्हटले जाते. ह्युमन निओनॅटल केअर म्हणजेच नवजात बालकांची माणसांनी मायेने काळजी घेणे आणि त्यांना यंत्रांच्या हाती न सोपविणे. ज्या बाळांची अशा प्रकारे काळजी घेतली जाते, त्या बाळांचे वजन लवकर वाढते, स्तनपान लवकर सुरू होते, त्यांना डिस्चार्ज लवकर मिळतो आणि सामाजिक व मानसिक विकासही लवकर होतो.

एनआयसीयूमध्ये आईची भूमिका
एनआयसीयूमध्ये आईने लवकरात लवकर सहभागी होणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. तिला आजारी बाळाची शुश्रुषा करणार्‍या आरोग्यसेविकेप्रमाणे वागवले जाते. पूर्वी मातांना एनआयसीयूमध्ये प्रवेश नव्हता आणि त्यांना त्यांची बाळे काचेच्या दरवाज्यातून किंवा अरुंद खिडक्यांमधून दाखवली जात असत. ही पद्धत आता बदलली आहे आणि मातेचा सहभाग हा आता ह्युमन निओनॅटल आरोग्यसेवेचा पाया झाला आहे.

सुदृढ आरोग्य असो वा आजार असो, मानवाचे अस्तित्व स्पर्श, गंध, दृष्टी, श्रवण आणि चव या पंचेंद्रियांवर आधारित असते. मुदतपूर्व प्रसूत झालेले नवजात बालक हेही त्याला अपवाद नाही. या बालकांभोवती व्हेंटिलेटर ट्युबिंग, फीडिंग ट्युब्स, आयव्ही कॅन्युला, मॉनिटर प्रोब्स, फोटो थेरपी गॉगल्स असतात. त्यांनाही लवकर बरे होण्यासाठी या मूलभूत इंद्रियांची अत्यंत आवश्यकता असते.

- Advertisement -

*बाळाला त्यांच्या गंभीर अवस्थेत मातेने कुरवाळले असता ऑक्सिजनेशन वाढते आणि त्याची प्रकृती सुधारण्यासाठी मदत होते.

*मुदतपूर्व प्रसुती झालेल्या बाळांच्या माता त्यांना स्तनपान देऊ शकत नाहीत. ही बालके आपल्या गंभीर आजारातून बरी होत असतात. त्यांना व्हेंटिलेटर लावलेला असतो किंवा कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असतो. त्यामुळे बाळाला तोंडावाटे अन्न देण्यापूर्वी बाळाजवळ स्तनांमधून येणार्‍या दुधाने भरलेली वाटी ठेवली तर त्याची गंध ओळखण्याची आणि चव समजण्याची यंत्रणा उद्दिपित होते. त्यामुळे अशा बाळांमध्ये स्तनपानाचा पाया रचण्यास मदत होते.

- Advertisement -

*बाळाला सौम्य संगीत ऐकवले किंवा पालकांच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण ऐकवले तर बाळांना मल्टिपॅरा मॉनिटर्स आणि व्हेंटिलेटरच्या आवाजामुळे येणार्‍या ताणावर मात करता येते.

*ओरोमोटर स्टिम्युलेशन – अन्नसेवनाच्या बाबतीत उदासीनता दाखविणार्‍या बाळांना ओरोमोटर स्टिम्युलेशन देण्यात येते. एक बोट वापरून, बाळाच्या चेहर्‍याचे स्नायू, गाल, ओठ आणि जीभेला उद्दिपित करण्यात येते. ही क्रिया माता किंवा नर्स करू शकते.

*नॉन-न्युट्रिटिव्ह सकिंग – बाळाला रिकामे स्तन किंवा मातेची करंगळी चोखण्यास दिली जाते, जेणेकरून त्याची ओरोमोटर (तोंड, जबडा, जीभ, ओठ या तोंडातील अवयवांच्या स्नायूंची हालचाल) क्रिया सुरू राहील.

कांगारू मदत केअर (केएमसी)
मुदतपूर्व प्रसूत झालेल्या आणि आकाराने लहान असलेल्या बाळांना पुरेशा वाढीसाठी उब, आईच्या दुधाच्या माध्यमातून पोषक आहार आणि स्वच्छता यांची आवश्यकता असते. सुरक्षित मैलाचा दगड समजले जाणारे २००० ग्रॅम्सचे लक्ष्य साध्य करण्यासाठी या बाळांना बराच वेळ लागतो. असे असले तरी इन्क्युबेटरमध्ये असलेल्या बाळांना सामान्य होण्यास विलंब लागतो. त्याचप्रमाणे बाळ सतत नर्सरीमध्ये असेल तर विरहामुळे येणारी हुरहूर वाढते. त्याचप्रमाणे निओनॅटल उपचार केंद्रावरही भार येतो कारण एक बेड त्यासाठी वापरलेला असतो. कांगारू मदर केअर (केएमसी) या पद्धतीत मुदतपूर्व प्रसुती झालेली किंवा कमी वजन असलेली बाळे आईकडेच असतात. यामुळे बाळाला उब, पोषण आणि स्वच्छता मिळेल याची खातरजमा केली जाते.

कोलंबियामधील डॉ. एडगर रे यांनी १९७८ साली प्रथम केमसीची सूचना केली. मार्सुपिअल केअर (अपुर्‍या वाढीसह जन्माला आलेली पिल्ले मादीच्या बेंबीशी असलेल्या पिशवीमध्ये आणि योग्य पोषणासाठी स्तनांच्या जवळ बाळगणारी प्रजाती) गिव्हिंगवरून कांगारू केअर ही संज्ञा अस्तित्वात आली आहे. यात मातांचा इनक्युबेटरसारखा उपयोग केला जातो आणि वेळेवर प्रसुती झालेल्या बाळांप्रमाणेच ही बालके परिपक्व होईपर्यंत आणि त्यांच्याप्रमाणे गर्भाशयाबाहेरील आयुष्य जगण्यास सक्षम होईपर्यंत माता याच त्यांच्या अन्नाचा आणि स्टिम्युलेशनचा मुख्य स्रोत असतात. भारतात कमी वजन असलेल्या (एलबीडब्ल्यू) नवजात बालकाची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. केएमसीमुळे एलबीडब्ल्यू नवजात बालकांना हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज मिळतो.

विकसित देशांमध्ये केलेल्या प्रयोगांती दिसून आले आहे की, मृत्यूदराच्या दृष्टीने केएफसी सुरक्षित आहे आणि त्यामुळे गंभीर स्वरूपाचे व्यंग कमी होऊ शकते आणि हॉस्पिलमध्ये दाखल करण्याची आवश्यकताही टळू शकते. त्यामुळे एलबीडब्ल्यू नवजात बालकांचे, विशेषत: ज्या ठिकाणी स्रोत अपुरे आहेत, अशा ठिकाणी असलेल्या बालकांच्या आरोग्यामध्ये केएमसीमुळे सुधारणा होऊ शकते.

केएमसीचे मुख्य घटक खालीलप्रमाणे
१. बाळाला होणारा स्पर्श. बाळांना रात्रंदिवस आईच्या स्तनांमध्ये उभ्या स्थितीत घट्टपणे कवटाळून ठेवले जाते.
२. बाळाला नित्यनियमाने आणि केवळ स्तनपानाद्वारे किंवा थोडासा अपवाद वगळता स्तनपानाद्वारेच पोषण देण्यात येते.
३. वजन किंवा गर्भाशयातील कालावधी किती असेल तरी हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज मिळतो.
या हस्तक्षेपाच्या यशस्वितेसाठी श्वसन, शारीरिक तापमान आणि आहाराच्या बाबतीत स्थैर्य येणे महत्त्वाचे असते.

तीन परिस्थितींमध्ये केला जातो केएमसीचा वापर

* ज्या ठिकाणी नवजात बालकांच्या शुश्रुषेसाठी पुरेशा सुविधा नाहीत, तेथे इनक्युबेटर्सची कमतरता केवळ केमसीद्वारे भरून निघू शकते.

* ज्या ठिकाणी प्रत्येक प्रकारची निओनॅटल केअर उपलब्ध आहे. तेथे आई व बाळामध्ये दृढ नाते तयार होण्यासाठी आणि यशस्वी स्तनपानासाठी केएमसीची मदत होते.

* ज्या ठिकाणी तांत्रिक आणि मनुष्यबळ स्रोत चांगल्या दर्जाचे आहेत पण मागणीच्या तुलनेत अपुरे आहेत, तेथे नवजात बालकांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर केएमसी ही पर्यायी निओनॅटल मिनिमल केअर (किमान शुश्रुषा करण्याची आवश्यकता) युनिट असते.

जन्मजात कमी वजन असलेल्या मुदतपूर्व प्रसुती झालेल्या बाळांसाठी या पद्धतीची उपयोग्यता लक्षात घेत डब्ल्यूएचओने मुदतपूर्व प्रसुती झालेल्या कमी वजन असलेल्या बाळांच्या शुश्रुषेसाठी या पद्धतीचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.

यातून खरे तर मानवी स्पर्शाने शुश्रुषा करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. मुदतपूर्व प्रसुती झालेल्या बाळांच्या जगण्याचा दर वाढवायचा असेल तर तंत्रज्ञानाच्या बरोबरीने या पद्धतीचाही वापर होणे आवश्यक आहे. शेवटी मी एवढेच म्हणतो की, या चिमुकल्या जीवांना मदत करण्यासाठी माणसाचे हृदय आणि मेंदू यांनी एकत्र काम केले पाहिजे.

– डॉ अभिजीत म्हापणकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -