पावसाळ्यात घ्या हलका आहार

पावसाळ्यात आरोग्याच्या तक्रारींपासून दूर राहण्यासाठी हलक्या आहाराला प्राधान्य द्यावे.

Mumbai
take light diet in rainy season
पावसाळ्यात घ्या हलका आहार

पावसाळ्याच्या दिवसात साथीचे अनेक आजार डोके वर काढतात. जुलाब, ताप, सर्दी-खोकला, उलट्या, पोटासंबंधी तक्रारी सुरू होतात. पावसाळ्यातील प्रसन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये थोडा बदल करणे गरजेचे आहे. एरव्ही नेहमीच बाहेरचे पदार्थ खाणाऱ्यांनी पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाण्याकडे दुर्लक्ष करावे. त्याऐवजी संतुलित, हलक्या आहाराला प्राधान्य द्यावे, असा सल्ला नेहमीच डॉक्टर्सकडून दिला जातो.

बरं मग पावसाळ्यात डॉक्टर हलका आहार घेण्याचा सल्ला का देतात माहिती आहे का? यामागचे कारण असे की पावसाळ्यात पचनक्रियेचा वेग खूपच मंदावलेला असतो. त्यामुळे पावसाळ्यात कटाक्षाने हलका आणि योग्य प्रमाणात आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो. आता हलक्या आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा असा प्रश्नही पडतोच. तर नेहमीचाच आहार पण त्यातील पदार्थांमध्ये किंचीतसा बदल केला की हलका आहार तयार होतो.

म्हणजेच बघा ना पावसाळ्यात तुम्ही आहारात घरातील जुने तांदूळ, जुने गहू, जुनी धान्ये यांच्यापासून अन्नपदार्थ तयार करा. हे पदार्थ तयार करताना हिंग, मिरी, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदीना यांचा योग्य प्रमाणात वापर करा. हे अन्न पचनास मदत करतात. एकंदरीत भाकरी, चपाती, दूधभात, पिठले असा साधा हलका आहार पावसाळ्यात घ्यावा. पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात पालेभाज्या खाणे टाळावे. त्याऐवजी दुधी, दोडका, पडवळ, भेंडी, अशा वातशामक भाज्यांचा आहारात समावेश करावा. विशेष म्हणजे या काळात दही खाणे टाळावे. पचनासाठी आवश्यक असलेला अग्नी दह्यामुळे मंदावतो म्हणूनच या ऋतूत दही कमी खावे. त्याचप्रमाणे मांसाहार शक्यतो टाळावा. यामध्येही मासे खाणे टाळावे. कारण या काळात माशांचा वीणीचा हंगाम असतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here