घरलाईफस्टाईलनाशिक-सेकंड होमसाठी उत्तम पर्याय

नाशिक-सेकंड होमसाठी उत्तम पर्याय

Subscribe

द्राक्ष ते रुद्राक्ष आणि मंत्र ते तंत्र असा प्रवास करणार्‍या नाशिकच्या विकासाचे अवकाश दिवसागणिक विस्तारत आहे. झपाट्याने विकसित होणार्‍या जगातील शहरांमध्ये 16 वा क्रमांक पटकावणार्‍या नाशिकला आता मुंबई, ठाणे आणि पुणेकरांची ‘सेकंड होम’साठीही पसंती मिळतेय. आल्हाददायक वातावरण, हिरवाईची शाल पांघरलेला निसर्ग ही नाशिकची बलस्थाने आहेत. नाशिकची थंडी हीदेखील नेहमीच चर्चेत असते. तपमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसपर्यंत जाणारे नाशिक म्हणूनच महाबळेश्वरला पर्यायी शहर ठरू पाहण्याच्या मार्गावर आहे.

सिंहस्थ कुंभनगरी, आल्हाददायक वातावरण, पर्यटन स्थळांची रेलचेल, द्राक्ष पंढरी आणि कांदा पिकाचे माहेरघर म्हणून लौकीक असलेल्या नाशिक शहराच्या विकासाचा आलेख चांगलाच रुंदावला आहे. पूर्वी केवळ मंदिरांचे शहर म्हणून नावारुपाला आलेले हे शहर आता शिक्षण, उद्योग आणि बांधकाम क्षेत्रातही भरारी घेत आहे. नाशिक जिल्ह्याला प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. जिल्ह्यात 50 हून अधिक गिरिदुर्ग (डोंगरी किल्ले) आहेत. 12 जोर्तिलिंगापैकी एक असलेले एक त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि साडेतीन पीठांपैकी एक असलेले अर्धपीठ असलला सप्तशृंगी मातेचा गड नाशिकमध्येच आहे. याशिवाय अलिकडेच झालेला ‘स्टॅच्यू ऑफ अहिंसा’चा अर्थात वृषभदेवांचा भव्य पुर्णाकृती पुतळा जिल्ह्यातील मांगीतुंगी डोंगरावर समृध्दीची साक्ष देत आहे.

शहर परिसरात निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केल्याचे चित्र बघायला मिळते. शहरापासून अवघ्या काही किलोमीटर असलेल्या त्रंबकेश्वर, दिंडोरी रोड, घोटी, इगतपुरीचा परिसर पावसाळ्यात अक्षरश: नंदनवनात आल्याचा आभास देऊन जातो. पावसाळ्यात खळाळत डोंगरावरून कोसळणारे धबधबे, चिंब भिजवणारा पाऊस आणि गुलाबी थंडी असे वातावरण वर्षातील बहुतांश काळ असल्याने या परिसरात पर्यटकांची रेलचेल असते. द्राक्षासाठी पोषक वातावरण येथे असल्याने राज्यातील 52 पैकी 37 वाईनरीज नाशिक जिल्ह्यात सुरू आहेत. त्यातूनच वाइन फेस्टिवलचे कल्चर फुलू लागले आहे.

- Advertisement -

सर्वांगीण विकासाचे जणू प्रतीक असल्याप्रमाणे या शहराची वाढ प्रमाणबद्ध झाली आहे. त्यामुळे नागरी समस्यांची फार सद्दी या शहरात नाही. दक्षिणेतील काशी समजल्या जाणार्‍या शहराचा चेहरामोहरा कालानुरूप बदलला असून नाशिक आता औद्योगिक आणि मालमत्ता बाजारपेठेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शहर म्हणून उभे राहत आहे. शहरात मिळणारी औद्योगिक संधी यामुळे मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकचा प्रामुख्याने विचार होत आहे. काळाप्रमाणे नाशिकचा झपाट्याने विस्तार होत गेला. पूर्वी मुंबई नाक्यापासून सुरू होणारे नशिक आता अंबडपर्यंत पसरले आहे. याला उद्योगांबरोबरच बांधकाम क्षेत्रही कारणीभूत आहे. चार वर्षांपर्यंत चार-सहा मजल्यांपर्यंत इमारतींना परवानगी होती. आता 14 मजल्यापर्यंत परवानगी मिळत असल्याने बांधकाम क्षेत्राला ‘गगनही ठेंगणे’ झाले आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार नाशिकमध्ये काही वर्षात तब्बल 25 बहुमजली इमारती बांधल्या जाणार आहेत. कपाटाच्या प्रश्नामुळे सुमारे सहा हजार इमारतींच्या बांधकाम परवानग्या आणि पूर्णत्वाचे दाखल रखडले असले तरीही हे प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी येत्या काही महिन्यात बांधकाम क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त होईल.

नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करणारे मुंबई आणि पुण्याचे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक गुजरातमधील व्यावसायिकांनीही आपल्या वेगळ्या शैलीत या क्षेत्राला नावारुपाला आणले आहे. शहरासह जिल्ह्याच्या बलस्थानांमुळे रिसॉर्टची संख्यादेखील कमालीची वाढली आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर, मखमलाबाद, इगतपुरी यांसारख्या निसर्गदत्त आणि निवांत ठिकाणी घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी अनेकांना मिळत आहे. शहरापासून जवळपासच्या भागात म्हणूनच आता फार्म हाऊस आणि टुमदार घरे नजरेस पडतात. मुंबई, ठाणे आणि पुण्यातील अनेक हौशी मंडळी विकेण्ड साजरा करण्यासाठी नाशिकचाच पर्याय निवडतात. अशा वेळी हे फार्म हाऊस त्यांना पर्वणीगत ठरतात.

- Advertisement -

सेकंड होम म्हणून मुंबईकर-ठाणेकर नाशिककडे पाहत असून शहरात अगदी 16 लाखांपासून तीन-चार कोटींच्या पेंटहाऊसपर्यंत प्रॉपर्टीचा पर्याय उपलब्ध आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास होत असतानाच मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकांची स्पर्धा करत असल्याचा परिणाम अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना मिळत आहे. मोठ्या गृहप्रकल्पांत स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गार्डन, प्ले-ग्राउंड, जिम्नॅशियम अशा सुविधा रहिवाशांना मिळू लागल्या आहेत. दुसरीकडे बांधकामांमध्ये अत्याधुनिक सुविधांचा अंतर्भाव होत आहे. अत्याधुनिक प्रकारचे किचन, चकचकीत इम्पोर्टेड ऑटोमेशन तंत्रज्ञानावर आधारित सुविधाही यात आहेत. इको फ्रेंडली हाऊस, ग्रीन हाऊसिंग अशा संकल्पनांकडे शहराचा प्रवास सुरू आहे. बांधकाम व्यावसायिकांची संघटना शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावत आहे, हेदेखील महत्वाचे!

मुंबई-पुण्यापाठोपाठ सर्वाधिक व्यवहार
शहरातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची गती सद्यस्थितीत मंदावली असली तरी अजूनही मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक शहरात सर्वाधिक प्रमाणात जमिनीचे व्यवहार होत असल्याचे चित्र आहे. जमिनीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. या क्षेत्रात होणारी हस्तांतर म्हणजे भविष्यात मोठे नागरी वसाहती प्रकल्प उभे करण्याच्या इराद्याने होणारे व्यवहार आहेत. गेल्या काही वर्षात जमिनीच्या दरात 60 ते 70 टक्के वाढले आहेत. शहरात पुरेशी मोकळी जागा नसल्याने आडगाव मखमलाबाद उपनगरांमधून जमिनीच्या व्यवहारात वाढ झाली आहे.

हेमंत भोसले

– लेखक ‘आपलं महानगर’च्या नाशिक आवृत्तीचे मुख्य वार्ताहर आहेत.

नाशिक-सेकंड होमसाठी उत्तम पर्याय
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -