घरलाईफस्टाईलरत्नागिरीची रम्य सहल

रत्नागिरीची रम्य सहल

Subscribe

कोकण म्हणजे पृथ्वीतळावरचा स्वर्ग आहे. कोकणातील हिरवे सौंदर्य सर्वांना आकर्षित करते. संपूर्ण कोकणपट्टी निसर्गसौंदर्याने रसरसलेली आहे. कोकणाला सागर आणि संह्याद्री यांचे वरदान लाभले आहे. कोकणच्या चारही जिल्ह्यांतून एकापेक्षा एक पाय खिळवून ठेवणारी व नजर रोखणारी प्रेक्षणीय स्थळे आहेत.

आमच्या घरच्या माणसांनी यावेळी रत्नागिरी व त्याच्या आसपासची स्थळे पाहण्याकरिता सहल आयोजित केली. त्याप्रमाणे आम्ही रत्नागिरीला पोहचलो. ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याच्या जवळच थिबा राजाचा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात सध्या वस्तुसंग्रहालय आहे. थिबा राजाच्या वेळच्या वस्तूंचा संग्रह पर्यटकांना बघण्यासाठी ठेवला आहे. संग्रहालयाच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंचे अतिशय चांगले जतन केले आहे. संग्रहालयाच्या बाहेर आल्यावर समोरच एक गार्डन केले आहे. तेही सुरेख आहे.

- Advertisement -

शिवाजी महाराजांच्या काळातील रत्नदुर्ग किल्ला पाहून अभिमानाने उर भरून आला. त्या किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. सदरचे मंदिर शिवकालीन पद्धतीचे असून, त्या मंदिरात बसल्यावर मनाला शांतता व समाधान मिळते. सदर मंदिराच्या बाजूने रत्नदुर्ग किल्ल्याभोवती केलेली तटबंदी पाहण्यासाठी जायला वाट आहे. रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी सात ते रात्री सातपर्यंत उघडा असतो.

रत्नागिरी जिल्ह्यात धार्मिक प्रवृत्तीच्या पर्यटकांना आकर्षित करणारी पावस, गणपतीपुळे, परशुराम क्षेत्र यासारखी अध्यात्मिक स्थाने आहेत. प्राचीन ग्रंथात गणपतीपुळे या गणेशाची स्थापना परशुरामाने केली असा उल्लेख आढळतो. गणपतीपुळे येथील नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे. पावस येथे स्वरूपानंदाची समाधी आहे. या स्थानावर गेल्यावर आपल्याला शांतता लाभते व आपोआपच आपण देवाशी एकरूप होतो.

- Advertisement -

भाट्याचा किनारादेखील बघण्यासारखा आहे. सागर किनार्‍यावर उसळणार्‍या उंचच उंच लाटा, डोलणारी माडाची झाडे पाहून मन उल्हसित होते. शहरी जीवनापासून लांब गेल्याने निसर्गाशी एकरूप होऊन जातो. शिवाजी महाराजांच्या काळापासून समुद्र मार्गे व्यापार चालू होता व तो अद्यापही आहे. रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जाणार्‍या रस्त्यावर जयगड हे गाव आहे. गावाच्या उत्तरेस जयगड किल्ला आहे. या किल्ल्याच्या तटबंदीला वीस बुरुज आहेत. ‘जयबा’ या शूरवीरांनी किल्ल्याच्या पायथ्याशी स्वतः.स गाडून घेतले म्हणून या किल्ल्याला जयगड हे नाव मिळाले.

आता आमची मुंबईला परतण्याची वेळ आली. रत्नागिरी व त्याच्या आसपास बघण्यासाठी खूप प्रेक्षणीय स्थळे, डोंगर, दर्‍या, सागर असल्याने ते पाहण्यास वेळ अपुरा पडतो. तरी जेवढे पाहता येईल तेवढे पाहून घेतले. ही सहल खूपच अविस्मरणीय झाली.

वृंदा हरयाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -