घरलाईफस्टाईललोणावळ्यातील फासेबाईंची खानाव

लोणावळ्यातील फासेबाईंची खानाव

Subscribe

काही खानावळी, हॉटेलमधील अन्नाची चव ही अतिशय अप्रतिम असते. मात्र ते काहीसे लपलेली असतात. त्यातील चवीबद्दल फार कमी लोकांना माहित असते. पुन्हा अशी हॉटेल, खानावळी आपली जाहिरात करायला तयार नसतात. अशीच लोणावळ्यातील फासे बाईंची खानावळ आहे.

मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे हे जर या खानावळीत जेवायला गेले नसते तर कदाचित फासेबाईंची खानावळ आमच्यासारख्या खवय्यांना कळलीही नसती. पुण्याहून मुंबईला येताना लोणावळ्यासाठीची एक्झिट घेऊन आपण लोणावळ्याच्या बाजारात पोचलो की मुख्य रस्त्यावरच उजवीकडे हरी ओम इंटरनॅशनल म्हणून हॉटेल दिसतं. त्याच्या बाजुच्या गल्लीतून आत शिरलं की लगेचच उजव्या बाजुला जोशी सॅनटोरियम आणि होमली फूड अशी पाटी दिसते. हीच फासे बाईंची प्रसिद्ध खानावळ.

ही खानावळ ज्यांची आहे त्या शैला फासे तिथेच बाजुला लहानशा घरात राहतात. जवळपास ३०-३२ वर्षांपूर्वी जोशी सॅनटोरियमची जागा विकायला आहे असं कळल्यावर शैलाताईंनी ही जागा विकत घेतली आणि लहानशी खानावळ तिथे सुरू केली. सुरूवातीला इथे फारसे लोक येत नसत. मात्र एखादी व्यक्ती या खानावळीत गेली की तेथील खाद्यपदार्थांच्या प्रेमात पडल्याशिवाय रहात नसे. असेच एकदा ड्युक्स नोजला ट्रेकिंगला गेलो असताना या खानावळीत जाण्याचा योग आला. ट्रेकिंग संपवून लोणावळा शहरात आलो होतो. दुपार झाली होती. भूकही चांगलीच लागली होती. कुठे जेवायचे हा प्रश्न होता. इतक्यात एक मित्र बोलला की येथे फासेबाईंच्या खानावळीत जाऊ. या खानावळीत लक्ष्मीकांत बेर्डे जेवायला येतात. त्यानंतर ठरलं की फासेबाईंच्याच खानावळीत जेवायचे आणि आमच्या चार मित्रांचा ग्रुप खानावळीच्या दिशेने कूच करता झाला.

- Advertisement -

खानावळीत शिरताच तेथील स्वच्छता आणि टापटिपपणा मनाला भावला. खानावळीच्या मालकीण बाई शैलाताई जातीने प्रत्येक गोष्टीवर लक्ष देत होत्या. या खानावळीत शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीचे जेवण उत्तम मिळते. स्वयंपाकघरात गेलात तर शाकाहारी जेवण ठेवण्यासाठी वेगळे टेबल असते. वेगळी भांडी, वेगळे चमचे दिसतील. या किचनमध्ये पुसून ठेवलेली भांडी तुम्ही बघाल तर थक्क व्हाल इतकी ती स्वच्छ असतात. जेवायला बसायला साधी लाकडी टेबल्स आणि बाकं आहेत. अर्ध्या बंद जागेत ही टेबलं आहेत. पावसाळ्यात उघडा भाग प्लॅस्टिकनं बंद केला जातो. जेवायला बसलो की स्वच्छ पुसलेली ताटे, वाट्या, चमचे, चिरलेला कांदा, लिंबू, लोणचं येेते. तुम्ही तुमची ताटं मांडून घ्यायची. मग तुम्ही सांगितलं असेल ते गरमागरम जेवण समोर येतं. डब्यात गरमागरम पोळ्या येतात. मासे सांगितले असतील तव्यावरून ताटात येतात.

येथील प्रत्येक पदार्थ हे रुचकर, तुम्ही शाकाहारी जेवण घ्या नाहीतर मांसाहारी. दोन्ही पदार्थांना खास चव. अंदाज घेत आम्ही दोन शाकाहारी आणि मांसाहारी थाळी मागवल्या होत्या. चिकन, मासे, वेगवेगळ्या भाज्या असा खमंग बेत होता. जेवायला सुरुवात केली तेव्हा अन्नपदार्थ कधी संपले हे कळलेच नाही. भूक नव्हती तरी पुन्हा काही तरी मागवूया, अशाच पोट फुटेपर्यंत पदार्थ पोटात गेले होते. त्यामुळे मन तयार नसले तरी थांबावेच लागले. सुमारे ९ वर्षांपूर्वी जे पदार्थ या खानावळीत खाल्ले होते त्याची चव आजही जीभेवर रेंगावळेत. त्यानंतर दोन-तीनदा या खानावळीत जाणे झाले. पण ना येथील पदार्थांची चव बदलली ना स्वच्छता. कधी लोणावळ्यात गेलात तर या खानावळीला नक्कीच भेट द्या.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -