स्तनपान योग्य होण्यासाठी

Mumbai
Mom and baby

स्तनपान ही आईला बाळासाठी मिळालेली दैवी देणगी आहे आणि या दुधाची विशिष्ट प्रकारची संरचना असते आणि बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो.पण बाळाला योग्य तंत्राने स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने, तंत्रामुळे मातेला पाठदुखी, स्तनांना सूज येऊन त्यात रक्त किंवा पाणी साठणे, ताप येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात आणि बाळाचे कुपोषण होऊ शकते, परिणामी अनेकदा संसर्ग होणे, वजन वाढण्याचे प्रमाण फार कमी असणे, मातेशी जिव्हाळा कमी असणे असे प्रकार होतात.

त्यामुळे मातेला जी स्थिती आरामदायी वाटत असेल त्या स्थितीत तिने स्तनपान द्यावे. त्यावेळी तिच्या पाठीला आधार असणे महत्त्वाचे आहे. स्तनपान देण्यासाठी भारतीय पद्धत, क्रेडल पद्धत, मॉडिफाइड क्रेडल पद्धत, साइड लाइंग पद्धत (आडवे पडून बाळाला स्तनपान देऊ नये हा एक गैरसमज आहे). या सर्व पद्धतींमध्ये उत्तम अटॅचमेंटचे (जोडणी) नियम पाळले गेले पाहिजेत.

* बाळाचे तोंड पूर्ण उघडले पाहिजे.
* बाळाच्या हनुवटीचा स्पर्श स्तनाला व्हावा
* स्तनमंडल आधी तोंडाच्या वर आणि नंतर खालून दिसावे.
* खालचा ओठ बाहेरच्या बाजूला वळलेला असावा.
* सर्व स्थितींमध्ये बाळाचे पूर्ण शरीर आईच्या समोर असावे. बाळाचे डोके, मान यांना शरीराच्या एका रेषेत आधार मिळावा आणि ते स्तनांच्या समोर असावे.
* स्तनाचा योग्य प्रकारे स्पर्श होत असेल तर दूध पुरेसे येते, ते बाहेरही सुरळीत निघते आणि बाळापर्यंत त्याचा प्रवाहही योग्य असतो.परिणामकारक स्तनपानासाठी बाळ जन्मापासून आईजवळ दिवसरात्र असणे अपेक्षित आहे.
* सामान्य प्रकृती असलेल्या बाळाला जन्मानंतर तीस मिनिटांच्या आत आईच्या पोटावर किंवा छातीवर ठेवावे. त्यामुळे बाळाला उब मिळते आणि स्तनपान करण्याची संधी मिळते. स्तनपान जेवढ्या लवकर सुरू होईल, तेवढ्या लवकर आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतो.
* आईला बाळाच्या भुकेचे संकेत (मुठी चोखायला लागणे, डोके स्तनांकडे वळविणे, स्तन शोधणे) समजून आणि बाळ रडेपर्यंत थांबण्याऐवजी संकेत समजून स्तनपान देण्यास प्रोत्साहन द्यावे.
* वेगवान स्तनपान करणारी बाळे ५-६ मिनिटांत पूर्ण स्तन रिकामा करतात आणि मंद स्तनपान करणारी बाळे स्तनपानास १५-२० मिनिटे लावतात. बाळाची इच्छा असेपर्यंत त्याला स्तनपान द्यावे.
* स्तनपानामुळे बाळाची तहान आणि भूक दोन्ही भागते. जेव्हा बाळ पहिले स्तन स्वतःहून सोडते तेव्हा आईने त्याला दुसर्‍या स्तनापाशी घ्यावे. बाळाची तहानभूक भागली असेल तर ते दुसर्‍या स्तनाचे स्तनपान करणार नाही. दुसर्‍या स्तनपानाच्या वेळी दुसर्‍या स्तनाने पाजावे, जेणेकरून दोन्ही स्तनांमधून पुरेसे दूध तयार होईल.
* स्तनपान पूर्ण झाल्यावर बाळाला ढेकर देण्यास मदत करावी. कारण सगळीच बाळे स्तनपान करताना हवाही पोटात घेतात. बाळाला उभ्या स्थितीत कडेवर घ्यावे किंवा मांडीवर बसवावे आणि पाठीवर हात फिरवावा किंवा हलकेच चापटी मारावी. ही क्रिया पार पाडली नाही तर बाळाच्या पोटातील अतिरिक्त हवेमुळे प्रत्यावर्तन, उलटी आणि हवा आतड्यापर्यंत पोहोचली तर बाळ अस्वस्थ होऊ शकते किंवा पोटशूळ होऊ शकतो.

स्तनपानामध्ये अडथळे निर्माण होणे
* आईला स्तनपानात स्वारस्य नसणे, अति अस्वस्थता वाटणे, स्तनाग्रांना भेगा पडणे, सूज येऊन त्यात पाणी साठणे आणि मास्टिसिससारख्या स्तनांच्या समस्या.
* प्रमाणापेक्षा कमी वजन असलेली बाळे (मुदतपूर्व प्रसूती झालेली बाळे), संसर्ग, तोंड येणे, नाक चोंदणे इत्यादी तात्पुरत्या समस्या, हवा पोटात गेल्यामुळे आलेला अति दाब, दुभंगलेले ओठ किंवा जबड्यांसारखे जन्मजात व्यंग.
या समस्या आवश्यकतेनुसार हाताळल्या पाहिजेत.

-डॉ. पियुष रणखांब

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here