होळी खेळताना घ्या त्वचेची काळजी

होळी डर्माटोसेस - भाग १

Mumbai
Holi Festival

वसंतऋतूच्या सौंदर्याची नांदी होळीच्या सणातून वाजू लागते. जुन्या काळात हे होळीचे रंग झाडाची नैसर्गिक पाने-फुले वाटून तयार केले जायचे. त्यात चंदनाची भुकटी, केशर वगैरे वापरले जायचे. मात्र, अलीकडील काळात या रंगांचे घटकपदार्थ बदलले आहेत. औद्योगिकीकरणानंतर नैसर्गिक रंगांची जागा स्वस्तातील रंगांनी घेतली आहे. अनेक रासायनिक प्रक्रियांद्वारे हे रंग तयार केले जातात. या कृत्रिम रंगांमध्ये मॅलाशाइट ग्रीन, ऑरामाइन, मिथाईल व्हॉयलेट आदींचा अंतर्भाव असतो. हे रंग नंतर स्टार्च किंवा कणिक व मिका डस्टसोबत मिसळले जातात. त्यामुळे अ‍ॅलर्जी तसेच प्रादुर्भावाची शक्यता आणखी वाढते.

परिणामी, होळीचा सण झाल्यानंतर लगेचच विविध अ‍ॅलर्जी तसेच जळजळ होत असल्याची तक्रार घेऊन क्लिनिक्समध्ये येणार्‍या रुग्णांची संख्या प्रचंड वाढते. होळी किंवा त्यानंतरच्या काही दिवसांतील या समस्यांना म्हणूनच होलीडर्माटोसेस असे म्हटले जाते. याचा परिणाम शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. यामुळे डोळे किंवा अन्य अवयवांना खाज सुटणे, जळजळ होणे वेदना, स्राव किंवा पाणी येणे, त्वचेच्या ढलप्या निघणे, गजकर्णासारखी जखम, त्वचा झिजल्यासारखी होणे/ब्लिस्टर्स, झेरोसिस, एरिथिमा, युर्टीकॅरिअल, अ‍ॅक्युट नेल-फोल्ड इन्फ्लमेशन, ओरखडे, पूर्वीपासून असलेल्या त्वचारोगांमध्ये वाढ होणे (उदाहरणार्थ, मुरुम, इग्झिणा आणि पॅरोनिशिया) आदी आजार जडू शकतात.

रंगछटा आणि त्वचेच्या अवस्थेवरून केल्या जाणार्‍या प्रकारांमध्ये विशिष्ट असा संबंध नसला, तरी रंगांचा सर्वाधिक परिणाम चेहर्‍यावर होतो. कारण, रंग बहुतेकदा चेहर्‍यावरच फासला जातो. हाताच्या त्वचेवर त्याखालोखाल परिणाम होतात. कारण, रंग तयार करण्यासाठी हातांचा वापर होतो. याशिवाय डोक्याची त्वचा, हाताचा पुढील भाग, हात आणि खांद्यांखालील भागावर (धड) परिणाम होतो.

चेहर्‍यावर किंवा डोक्यावर रंग ‘फासण्यासाठी’ हाताने चोळण्यासारख्या अनेक पद्धतींमुळे त्वचेवर ओरखडे उमटतात आणि परिणामी अनेक प्रकारचे प्रादुर्भाव व दाह निर्माण होतात. डर्माटोसेसचा संबंध सहसा त्रासदायक, अ‍ॅलर्जिक संपर्काशी आणि यांत्रिक घटकांशी आहे.

होलीडर्माटोसेस बरे होणे

खाज सुटणे, जळजळ यांसारख्या त्वचेला त्रास देणार्‍या समस्यांवर तत्काळ उपचार झाले पाहिजे. त्वचेवरील कोणताही रंग किंवा पेंट तत्काळ थंड पाण्याने धुऊन टाकावा. योग्य उपचार मिळावेत यासाठी तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांना किंवा डर्माटोलॉजिस्टना दाखवले पाहिजे. लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावित जागी कोर्टिकोस्टेरॉइड ऑइंटमेंट लावणे. त्वचा बरी करण्यासाठी प्रतिजैवके (अ‍ॅण्टिबायोटिक्स) किंवा अँटीफंगल औषधे घेणे. त्वचेचा शुष्कपणा कमी व्हावा म्हणून काही आरामदायी ऑइंटमेंट्स त्वचेला लावणे. कोणतेही तीव्र रंग नसलेल्या सौम्य पीएच फ्रेण्डली साबणाने त्वचा धुणे. प्रादुर्भाव तीव्र असेल तर तोंडावाटे घेण्याची औषधेही दिली जाऊ शकतात.

डॉ. रिंकी कपूर,
लेखिका त्वचारोगतज्ज्ञ आहेत.