तिची अडचण !

मासिक पाळी आल्याशिवाय स्त्रीला पूर्णत्व नाही. अशी धारणा आजही समाजात आहे. कारण पाळी आल्याशिवाय स्त्रीला मातृत्व येत नाही. मग ही महत्त्वाची असणारी प्रक्रिया आज अंधश्रद्धेच्या विळख्यात ग्रासलेली दिसते. या पवित्र घटनेची अडचण का होते.?

Mumbai
Menstrual Cycle

वयाच्या १२ किंवा १३ व्या वर्षी मुलींना मासिक पाळी सुरू होते. स्त्रीला पाळी येणं आणि ती नियमित असणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कारण तिच्या नियमित येणार्‍या पाळीमुळे लग्नानंतर बाळ होण्याची खातरजमा केली जाते. म्हणजेच पाळी येणे आई होण्यासाठी तसेच शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची असते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याने आरोग्यदायी गोष्ट नक्की मानले जाते. स्त्रीला वयानुसार काही शरीर बदलांना सामोरे जावे लागते त्यातील एक ‘मासिक पाळी’. अगदी १२-१३ वर्षी सुरू झालेली ही पाळी बरेच वर्ष सुटत नाही. निसर्ग नियमानुसार प्रत्येक स्त्रीला या प्रक्रियेतून जावे लागतेच, यासोबतच आपापल्या पिढीनुसार चालत असलेल्या चालीरीती, रुढी-परंपरेच्या नियमांना सोबत घेऊन तिला चालावे लागते. २१ व्या शतकात वावरत असताना अनेक महिला विविध उच्च स्तरावर कार्यरत असताना आज ही स्त्रीनं असे नियम कितपत पाळायचे हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

पाळीच्या या ४ ते ५ दिवसात तिने देवाला स्पर्श करायचा नाही, स्वयंपाकघरात जाऊन एकत्र काम करायचे नाही, घरातील कौटुंबिक सण-समारंभाला किंवा शुभ प्रसंगी सहभागी व्हायचे नाही. सगळ्यांसोबत एकत्र न राहता वेगळं रहायचे, तिला तिचे जेवण, पाणी वेगळे देऊन घरातील वस्तूंना स्पर्श करायचे नाही. असे एक न अनेक नियम तिला पाळावे लागतात. पाळी ही आरोग्यासाठी उत्तम असे म्हणणारेच घरात स्त्रीला अशी वागणूक देतात की जणू एखादा आजारच बाईला झाला असेच तिला वाटू लागते. या मिळणार्‍या वागणुकीसाठी किंवा शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी ती मासिक पाळी लवकर यावी किंवा लांबविण्याच्या गोळ्या घेणे पसंत करते. त्यामुळे भविष्यात शरीरास होणार्‍या अनेक दुष्परिणामांना तिला तोंड द्यावे लागते, परंतु या पूर्वीच्या चालत आलेल्या चालीरीती, रुढी-परंपरा आणि घरातील ज्येष्ठ वयस्कर महिला असेल तर या नियमांपुढे तिच्याकडेही कोणताच पर्याय नसतो. आजच्या विचाराने प्रगल्भ असणार्‍या तरुणी या प्रथांना, नियमांना काहीसा विरोध करताना दिसतात.

याच दिवसात प्रत्येक स्त्रीला मानसिक आणि शारीरिक त्रासातून जावे लागते. बर्‍याचदा मासिक पाळीच्या अनियमितपणामुळे म्हणा किंवा कधी लवकर येण्याने व कधी खूप उशिरा येण्याने तिच्या मनात असंख्य विचार घर करत असतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी मनाला वेगळाच घोर लागल्याशिवाय राहत नाही. ऐनवेळी येऊन सणासुदीला विचका झाल्यास मन नाराज होते, परंतु सगळ्या महिलांच्या मनावर या नियमांचा पगडा झाल्याने हे नियम मुकाट्याने पाळण्याशिवाय ‘तिच्या’ समोर पर्यायच उरत नाही. ही पवित्र नैसर्गिक प्रक्रिया मग अपवित्र कशी मानली जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here