घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टमुस्लिम उत्तर भारतीय मतांवर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून

मुस्लिम उत्तर भारतीय मतांवर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून

Subscribe

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात काटे की टक्कर

उत्तर-पश्चिम मतदारसंघ…काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ हळूहळू शिवसेना गड म्हणून ओळखला जाऊ लागला आणि 2014ला तर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर या मतदार संघातून ४,६४,८२० इतकी मते घेत निवडून आले. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी बांधलेल्या या मतदारसंघात 2014 ला गजानन कीर्तिकर यांनी त्यांना पराभूत केले. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या निधनामुळे कीर्तिकर यांची खासदारकीची वाट जरी सोपी असली तरी त्यांना यावेळी विजयासाठी झगडावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी मतदार संघात दिसत आहे.

या मतदारसंघात शिवसेनेचे 3 आणि भाजपचे 3 असे सहा आमदार असल्याने आघाडीची मदार ही उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांवर असणार आहे. त्यातच गजानन कीर्तिकर यांच्याकडे राज्यमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांच्यासारखे तगडे नेते असल्याने कीर्तिकर यांचा थोडा ताण कमी होणार आहे. एककिडे गजानन कीर्तिकर या मतदारसंघातून तयारी करत असताना दुसरीकडे कीर्तिकर यांचा जनसंपर्क तुटल्याने त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी द्यावी असा काहीसा सूर मतदारसंघातून उमटू लागला आहे. तसेच राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांना दिल्लीत जाण्यात अजिबात रस नाही. त्यामुळे या मतदारसघात गजानन किर्तीकर की अमोल कीर्तिकर याचा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे निवडून आल्यानंतर कीर्तिकर यांनी ठराविक कार्यक्रम सोडले तर मतदारसंघात फिरकुन पाहण्याची देखील तसदी घेतली नसल्याची नाराजी मतदार आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे.

- Advertisement -

काँग्रेसमध्येही गटबाजी

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांनी या मतदारसंघात चांगल्या प्रकारे पक्षबांधणी केली असली तरी या मतदारसंघातून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना उमेदवारी मिळाली तर कामत गट संजय निरुपम यांच्या विरोधात काम करेल असे बोलले जात आहे. गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यामधील वाद सर्वश्रुत होते. आधीच कामत गट निरुपम यांच्यावर नाराज आहे त्यात निरुपम यांना तिकीट मिळाली तर कामत गट कितपत संजय निरुपम यांच्यासाठी काम करेल हा महत्वाचा मुद्दा त्यामुळे जरी या मतदारसंघात काँग्रेसची ताकत असली तरी त्याचा कितपत फायदा निरुपम यांना होतोय हे पाहणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांचा देखील या मतदारसंघावर डोळा असून, या मतदार संघात खरी लढत पहायला मिळणार आहे ती शिवसेना विरुद्ध काँग्रेस.

North-West

- Advertisement -

मुस्लीम-उत्तर भारतीय मतदार कुणाकडे?

या मतदारसंघात मराठी मतदार जसे जास्त आहेत तसेच मुस्लीम, उत्तर भारतीय आणि इतर मतदारदेखील आहेत. त्यामुळे ही एकगठा मते जर काँग्रेसला पडली तर त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात काटे की टक्कर होणार हे निश्चित.

या आहेत मतदासंघातल्या समस्या –

1) रखडलेल्या एसआरए प्रकल्पामुळे स्थानिकांची नाराजी
2) अनियमित पाणीपुरवठा
3) मेट्रोमुळे वाहतूक कोंडी
4) भाजी मार्केट, मनोरंजन सभागृहाचा तुटवडा

2014 ची आकडेवारी –

गजानन कीर्तिकर (शिवसेना) – ४,६४,८२०
गुरुदास कामत (काँग्रेस) – २,८१,७९२
महेश मांजरेकर (मनसे) – ६६,०८८
मयंक गांधी (आप) – ५१,८६०

या मतदारसंघांची थोडक्यात माहिती –

एकूण मतदार (२०१४) – ८ लाख ९७ हजार २४५
महिला मतदार – ३ लाख ९३ हजार ०४३
पुरुष मतदार – ५ लाख ४ हजार २०२

विधानसभा मतदारसंघातील एकूण आमदार

१५८ – जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर – शिवसेना
१५९ – दिंडोशी – सुनील प्रभू – शिवसेना
१६३ – गोरेगाव – विद्या ठाकूर – भाजप
१६४ – वर्सोवा – भारती लव्हेकर – भाजप
१६५ – अंधेरी पश्चिम – अमित साटम – भाजप
१६६ – अंधेरी पूर्व – रमेश लटके – शिवसेना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -