राजकारणातली ज्योतिषवाणी!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

ज्योतिषीबाबा खरंतर परदेशात जाणार होते…पण देशाच्या हितासाठी त्यांनी देशातच राहायचा निर्णय घेतला होता.

…निवडणुकीत कुणी कुठून उभं राहावं?…मुळात कुणी उभं राहावं की राहू नये, हे सगळं ज्योतिषीबाबांच्या ज्योतिषावर ठरणार होतं…

…साहजिकच, निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या पक्षांचे संभाव्य उमेदवार आपापल्या कुंडल्या घेऊन येणार हे ज्योतिषीबाबांना माहीत होतं…म्हणूनच ज्योतिषीबाबा देशाबाहेर सोडाच, घराबाहेरही पडत नव्हते…

…ज्योतिषीबाबांच्या सुचनांमुळे अडगळीत पडलेल्या, विजनवासात गेलेल्या नेत्यांचीही वर्णी मंत्रीमंडळात लागल्यामुळे ज्योतिषीबाबांची किर्ती राजकीय क्षितिजावर फार दूरवर पसरली होती…ज्योतिषीबाबांंनी सांगितल्यास घरात काही अघटित घडलेलं नसतानाही काही राजकारणी चकोट करायचे, काही जण केस काळे करणं सोडून द्यायचे…

…काही म्हणा, पण ज्योतिषबाबांचं सगळ्याच पक्षातलं वजन वाढलं होतं…त्यामुळे कधी कुणाच्या समोर कुणाला उभं करायचं ह्याचंही सेटिंग ज्योतिषबाबा घरबसल्या लावायचे…

…एखाद्या पक्षातला अतृप्त आत्मा ज्योतिषीबाबांकडे पडल्या चेहर्‍याने आला तर ते त्याला जाताना फुलल्या चेहर्‍याने घरी पाठवायचे…त्याला तीन अक्षरी, सहा अक्षरी किंवा नऊ अक्षरी पक्षात जायचं बोधामृत पाजायचे…

…परवा असाच एक अतृप्त आत्मा ज्योतिषीबाबांकडे आला…आणि ह्या पक्षात जीव रमत नाय म्हणाला…

…ज्योतिषीबाबांनी त्याचा हात बघितला आणि सध्या डब्यात गेलेल्या एका पक्षातल्या महत्वाच्या माणसाला फोन लावला…

…ज्योतिषीबाबा म्हणाले, हे पहा, एका फॉर्मातल्या पक्षातल्या माणसाला मी तुमच्याकडे पाठवतोय…पण तुमच्यातले जुनेजाणते डावलून त्याला तुमच्या पक्षात वरचा नंबर द्या, तुम्हाला सांगतो, तुमचा पक्ष दिल्लीपर्यंत पोहोचेल…

…ह्याला पाठवल्यामुळे आमच्या पक्षाला काय फायदा होईल?…डब्यात गेलेल्या पक्षाच्या माणसाने ज्योतिषीबाबांना विचारलं…

…ज्योतिषीबाबा म्हणाले, सध्या ह्यांच्या राशीतले ग्रह फार उच्चीचे आहेत…ते तुमच्या पक्षात येताच तुमचे सगळे विरोधक खच्ची होतील…

…पण आमच्या विरोधकांची कुंडली बघितली आहे का तुम्ही?…पलिकडून प्रश्न आला…

…का रे बाबा? असं का विचारतो आहेस?…ज्योतिषीबाबांनी ओशाळून विचारलं…

…अहो ज्योतिषबाबा, आमचे सगळे विरोधक तिसर्‍याला पाडण्यासाठी टेबलाखालून आम्हाला सामील झाले आहेत…पलिकडून उत्तर ऐकलं आणि ज्योतिषबाबाच खच्ची झाले…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here