नवभाषण!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

आघाडीवाले म्हणाले, आता परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही, ते होणारच…मोदी म्हणाले, काँगेसच्या लोकसभेत आता चव्वेचाळीस जागा आहेत त्यापेक्षाही कमी होणार आहेत…

…तिथे लाल शर्टावर जांभळा जर्द टाय लावून आकड्यांच्या ढिगार्‍यात आकडे शोधून काढणारे सेफॉलॉजिस्ट त्यांच्यापेक्षाही भलताच आकडा मांडून बसलेत…शरद पवार त्यांच्या जाणतेपणातून अनुभवाचा आणखी वेगळा आकडा सांगताहेत…

…गल्लोगल्लीचे आकडेशास्त्रज्ञ तर आणखी वेगळा आकडा फेकताहेत…तर आणखी कुणी ठिकठिकाणी नको नको तो आकडा लावताहेत…

…कुणी म्हणताहेत, यंदा मोदींची ती उंच उसळलेली लाट नाही…आणि अच्छे दिनचे स्क्रूसुध्दा फिट होऊ शकले नाहीत…

…तर काही म्हणताहेत, विरोधकांकडे सक्षम म्हणजे बोलघेवडेपणात पारंगत नेता नाही…लाखांची गर्दी ओढून आणण्याची त्यांच्याकडे कला नाही…

…काही म्हणताहेत, ह्यांचं विसर्जन करायचा तर कुणाच्या नावाने पर्यायी मांडव घालायचा?…कुणी म्हणतोय, सव्वाशे कोटींमधून पर्याय नाही असं कसं होईल?…

…कुणी म्हणताहेत, ह्यांनी काय केलं?…कुणी म्हणताहेत, त्यांनी तरी काय आरती ओवाळली?…

…सगळा गोंधळ कमी म्हणून की काय, मोदींनी हिंदू कार्ड फेकलं…मग राहूल गांधींनी नव्याने पत्ते पिसताना न्यायाची बोली लावली…

…राहूल गांधीं गरीब, गरीब, गरीब असं आपल्या भाषणात तीन वेळा बोलल्यामुळे तिथे जेटली जागे झाले…त्यांनी राहूल गांधीच्या भाषणात मध्यमवर्ग हा शब्द नसल्याचं भिंग लावून शोधलं…

…इथे मोदी सगळ्यांकडून सगळे चौकिदार असल्याचं मंत्रपठण करून घेऊ लागले आहेत…तरी पण आयपीएलमध्ये चौकिदार चोर हैंच्या घोषणा थांबायला तयार नाहीत…

…तिथे युतीवाले आमची युती नैसर्गिक म्हणून सांगताहेत…म्हणूनच पक्षप्रमुख गांधी नगरला खास फॉर्म भरण्याच्या सोहळ्याला अकृत्रिमपणे हजर राहताहेत…

…एकीकडे वातावरणात कमाल, किमान असं सगळं तापमान वाढलं आहे…आणि सजवलेल्या स्टेजवरच्या भाषणांची डेसिबल पातळीही दिवसेंदिवस वाढते आहे…

…लोकशाहीच्या उत्सवातली ह्याने त्याला चोर म्हणायचं, त्याने ह्याला लबाड म्हणायचं ह्या छापाची भाषणं ऐकून कंटाळलेले लोकही आहेत…ते नंतर नंतर कंटाळून चणेवाल्याकडून दोन रूपयांचे शेंगदाणे घेऊन पूर्ण भाषण न ऐकताच घरी जाताहेत आणि सरळ माझ्या नवर्‍याची बायको बघत बसताहेत…

…पण आता त्यांचे पाय एका अभिनव भाषणाकडे वळू लागले आहेत…कारण तिथे भाषणाबरोबरच मागच्या पडद्यावर पंचनामा दाखवला जातो आहे…

…मनोरंजनात नाविन्य असाव लागतं…बाकी काही नसलं तरी नव्याची आस असणार्‍यांनाच ते चांगलं कळलं आहे…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here