फसलेल्या पटकथेची कथा…

Mumbai
Dokyla shot editorial
डोक्याला शॉट संपादकीय

सकाळ झाली, मोरू उठला.

…निवडणूक समोर दिसू लागल्यापासून खरंतर हे बदललंय…मोरू उठल्यावर सकाळ झाली, असं झालंय…

…कारण निवडणुकीचं वारं आता मोरूच्या कानात शिरलंय…मोरू आता निवडणूक वाचतोय, निवडणूक जगतोय आणि निवडणूक निवडणूक करतच झोपतोय…

…हल्ली सकाळी उठण्यासाठी त्याला घड्याळाचा गजर, मोबाइलचा टायमर वगैरे लावावा लागत नाही…

…निवडणुकीची पोलिटिकल टिकटिक त्याच्या डोक्यात वाजतच राहते…त्यामुळे त्याला आपोआप जाग येते…

…परवा तर सकाळी त्याला उठावंच लागलं नाही…कारण उठण्याइतकं मोरू रात्रभर झोपलाच नाही…

…कारणही तसंच होतं…मोरूने सुरूवातीपासूून वर्तवलेला अंदाज सपशेल खरा ठरला होता…

…युतीची सुपारी फुटली होती…दोन्ही बाजुला एकमेकांविरोधात पेटणारी शेकोटी आता एकत्र येत विझली होती…मनी आनंद, वनी आनंद, भुवनी आनंद असा काहीजणांसाठी तो अद्वितिय क्षण होता…

…पण काही जणांसाठी सस्पेन्स संपल्याची निराशा होती…

…आता मुखपत्रातला तो नेहमीचा ओळखीचा जाळ संपणार…नेहमीची धग संपणार हे मोरूनेही मनोमन ताडलं होतं…

…तरी आग विझल्यावर नितीनियमाला धरून निखारे काही काळ धुमसत असतात…पण इथे निखारे इतके चिल्ड झाले होते की जणू कुणीतरी उचलून ते कुणाच्या तरी एकच प्याल्यात टाकावेत…

…मोरू काही विश्लेषक, अभ्यासक, चिकित्सक, जाणकार ह्यापैकी कुणीच नव्हता…बाजारात जाऊन खाकी पिशवीतून मुळ्याची भाजी आणणारा तो एक सर्वसाधारण नागरिक होता…

…पण त्यालाही इंटरव्हलनंतर युती होणार हे महाराष्ट्राच्या भुमीतलं मर्‍हाटी सत्य ब्लॉकबस्टर सुरू व्हायच्या आधीपासून माहीत होतं…

…मागे वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजायचा मामला निघाला तेव्हाच मोरूने ताडलं होतं की बहुतेक हे वाघाच्या कातडीवरचे पट्टे मोजायला पुन्हा येणार…

…कुणाची तरी ती कविता होती…त्या कवितेत त्या दोन ओंडक्यांची सागरात भेट होते..आणि त्या दोन ओंडक्यांना कुणा दुष्ट लाटेने पुन्हा गाठभेट न होण्यासाठी तोडलं होतं हे मोरूला माहीत होतं…पण राजकारणातली धष्टपुष्ट लाट वेगळी असते ह्याचीही मोरूला माहिती झाली…

…ती लाट ओंडक्यांना एकमेकांपासून तोडते…आणि ही लाट सत्तेच्या सागरात ओबडधोबड ओंडक्यांनाही एकत्र आणते हे आश्चर्य मनात नोंदवून मोरू शेअरिंग रिक्षाने जाताना एकटाच ओक्साबोक्शी हसला…

…सिरीयलमधल्या कचाकचा भांडणार्‍या सास्वासुनांचीसुध्दा होत नाही अशी ही मेलोड्रॅमॅटिक दिलजमाई बघून मोरूला गहिवर वगैरे काही आला नाही…पण कोल्हटकर, कालेलकर, मयेकरांच्या नाटकातली टाळीबाज वाक्यं त्याला उगाचच आठवली…

…सलीम-जावेदचे डायलॉगसुध्दा त्याला निष्कारण आठवले…जावेदजींनी लिहिलेला, मोगॅम्बो खुश हुवा हा डायलॉग आठवून ह्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर मुर्तिमंत मोगॅम्बो उभा राहिला…

…जत्रेत हरवलेल्या जुळ्या भावांचे सिनेमे आठवून त्याला निष्कारण निरूपा रॉय आठवली…

…सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती हे गाणं गाताना त्यातली शेवटची ओळ, वेड्या बहिणीची वेडी गं माया, अशी न म्हणता वेड्या भावांची वेडी गं माया अशी मोरूला गावीशी वाटली…

…पंचवीस वर्षं युतीत गंजलेला जीव एकाएकी तुझ्यात जीव रंगला म्हणून त्याच्यासमोर आला…

…तो मी नव्हेच ह्या नाटकातला फिरता रंगमंच त्याच्या नजरेसमोर गरागरा फिरू लागला…

…मोरूला आता मेलोड्रामा म्हणजे फार्सिकल ड्रामा वाटू लागला…घनगंभीर डायलॉगनासुध्दा तो फिस्सकन हसू लागला…

…कुणीकुणी गंभीर बोलत असतात, पण तरीही लोकांना त्याचं हसू का येत असतं ह्याचा जिताजागता अनुभव मोरू घेत होता…

…कधी कधी चित्रपटाची कथा चांगली असते…पण चित्रपट पटकथेत फसत असतो हे मोरू समोरासमोर बघत होता…

…फसलेल्या पटकथेला हसत हसतच मोरू घरी आला तर घरासमोरच्या गल्लीत गाणं वाजत होतं…शिट्टी वाजली, गाडी सुटली, आणि पदर गेला वर, पोरी जरा जपून दांडा धर…

…मोरूला आता अधिकच हसू आवरेनासं झालं…

…कारण मोरूला त्या गाण्याचे शब्द ऐकू येत होते- युती वाजली, लोकं विटली आणि पडदा गेला वर, मोरू जरा हसून घे पोटभर…मोरू जरा हसून घे पोटभर…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here