चाणक्यांचा मेळा!

Subscribe

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये…अगदी तसंच शहाण्याने निवडणुकांच्या दिवसांत सार्वजनिक वाचनालयात जाऊ नये.

…तिथे ह्या दिवसांत खोर्‍याने चाणक्य भेटतात…हे समस्त चाणक्य ह्या सार्वजनिक वाचनालयातली वर्तमानपत्रं वाचतात कमी आणि चाळतात जास्त…

- Advertisement -

…पण वर्तमानपत्र चाळता चाळता ते इतरांचा मेंदू चाळायला घेतात…आणि शरद पवार किंवा अमित शहा ह्या वाचनालयातल्या चाणक्यांचा सल्ला घेऊनच राजकारण करतात अशा थाटात चर्चा करतात…

…ह्या चाणक्यांना दुसर्‍याची ओळखपाळख असणं अजिबात अनिवार्य नसतं…ते विनावॉरंट कुणाचाही मेंदू कधीही ताब्यात घेऊ शकतात…

- Advertisement -

…परवा एक चाणक्य एका अनोळखी इसमाला त्याच्या मेंदूसकट ताब्यात घेताना म्हणाले…ह्यावेळी शरद पवारांवाचून पर्याय नाही, जाणता राजाच पंतप्रधान होणार, तुम्हाला मी कोर्‍या चेकवर लिहून देतो…

…दुसर्‍या चाणक्याने ताबडतोब तो मुद्दा खोडून काढत म्हटलं…ह्यावेळी तुम्हाला मी सांगतो, मोदी, पवार, केजरीवाल, राहूल गांधी ह्यापैकी कुणीही पंतप्रधान होणार नाही, ह्यावेळी देवेगौडांना जशी पंतप्रधानपदाची लॉटरी लागली तशी नितीशकुमारांना लागणार!…

…तिसरे चाणक्य तिथे हजर होतेच…ते म्हणाले, नितीशकुमारांनी चुकीची गाडी पकडली आहे, ते भाजपविरोधी गटात होते तेव्हा त्यांचं नाव पुढे येऊ शकलं असतं, आता तुम्हाला मी सांगतो, ते कायम मुख्यमंत्रीच राहणार!…

…चौथे चाणक्य न राहवून म्हणाले…ह्यावेळी कुणाचीही लाट नाही, त्यामुळे कुणीच सपाट होणार नाही, त्यामुळे कोण पंतप्रधान होणार हे कुणीच सांगू शकत नाही…

…पाचवे चाणक्य दबक्या आवाजात म्हणाले…जिथे लाट नसते तिथे नुसताच खळखळाट असतो…

…पहिल्या चाणक्यांची सटकली…ते म्हणाले, लाट कशी नाही, लाट आहे, बंगालमध्ये ममता बॅनर्जींची लाट आहे, त्याच पंतप्रधान होऊ शकतात…

…दबक्या आवाजातल्या पाचव्या चाणक्यांनाही कुणाची लाट मान्य नव्हतीच…आपला मौल्यवान निष्कर्ष मांडताना ते म्हणाले, जिथे लाट नसते तिथे काठावरच्या माणसांनासुध्दा संधी असते…

…सगळे चाणक्य चमकले…म्हणाले, काठावर कोण आहे?…

…पाचवे चाणक्य दबक्या आवाजात म्हणाले…नेहमी काठावर राहून तमाशा बघणारेच सध्या काठावर आहेत!…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -