घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटअच्छे दिनचा उगमबिंदू!

अच्छे दिनचा उगमबिंदू!

Subscribe

पाच वर्षांपूर्वी दर तीन सेकंदाला, अच्छे दिन आने वाले हैं हे धृपद वाजायचं…सारखं वाजणारं गाणं सारखं सारखं वाजल्यामुळे घोकंपट्टी न करता पाठ होतं तसं ते सगळ्यांच्या पाठ झालं…

…जाड भिंगांचा चष्मा लावणारे एक भाषांतरकार हे अच्छे दिन आने वाले हैं जेव्हा जेव्हा वाजायचं तेव्हा अगदी निरखून टीव्ही बघायचे…इतके निरखून टीव्ही बघायचे की कधी कधी त्यांचा चष्मा टीव्हीला लागेल की काय, अशी भीती त्यांच्या घरच्यांना वाटायची…

- Advertisement -

…खरंतर अच्छे दिन आने वाले हैं, हे तसे अगदी साधे आणि सोपे शब्द…मिष्टान्न खाल्लयानंतर तोंडात बडिशेप घोळावी तसे डोक्यात घोळत राहणारे शब्द…

…प्रत्येकाच्या डोक्यात तेव्हा ते घोळ घोळ घोळले…आणि तेव्हाच्या त्या पापभिरू ईव्हीएम मशीनमध्ये जाऊन रूजले…

- Advertisement -

…आपल्या जाडभिंग्या भाषांतरकारांना त्या शब्दांचं भाषासौंदर्य, कारणमीमांसा, कार्यकारणभाव, प्रयोजन वगैरे काही कळेपर्यंत त्या शब्दांनी दिल्ली काबीजही करून दाखवली…भाषांतरकारांच्या जाड भिंगांना तरीही त्या शब्दांतली गोम काही नाही उमगली…

…भाषांतरकारांनी भिंगं पुसली, डोळे पुसले, डोकं खाजवलं, दाढी कुरवाळली, शब्दकोष चाळले, संदर्भग्रंथ धुंडाळले…पण त्या शब्दातलं कोडं काही त्यांना नाही सुटलं…

…उठता-बसता, खाता-पिता, न्हाता-धुता भाषांतरकार नुसते ह्या शब्दांच्या मागे हात धुवून लागले…पण त्या शब्दांतलं, शब्दांमागचं, शब्दांच्या मधलं त्यांना जे काही हवं होतं ते त्यांना नाही सापडलं…

…अच्छे दिन आने वाले हैं, ह्या शब्दांमध्ये वास्तविक तसं गहनगहिरं, गूढ असं काहीच नव्हतं…पण तरीही ते शब्द भाषांतरकारांच्या डोक्याला विलक्षण गुंगारा देत होते…

…भाषांतरकारांचा मेंदू अच्छे दिनने हैराण केला होता…कधी नव्हे इतका त्यांचा जीव मेटाकुटीला आला होता…

…रस्त्याने जातानासुध्दा भाषांतरकार, अच्छे दिन आने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं असं सारखं पुटपुटत जात होते…आणि अच्छे दिनचा पाठपुरावा करत होते…

…शेवटी एक दिवस येणार होता तो आलाच…आणि भाषांतरकारांना जो उलगडा व्हायचा होता तो झालाच…

…अरे हे तर शब्दश: नाही, पण स्वैर भाषांतर आहे…घरातले संदर्भकोष चाळता चाळता स्वत:वरच खुश होत भाषांतरकार म्हणाले…

…स्वैर भाषांतर?…कसलं स्वैर भाषांतर?…घरच्यांनी विचारलं…

…अच्छे दिन आने वाले हैं, हे गरीबी हटाव ह्या वाक्याचंच स्वैर भाषांतर आहे…भाषांतरकार म्हणाले आणि बर्‍याच दिवसांच्या संकटातून सुटले…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -