…ते एक वादग्रस्त!

Subscribe

राजकारणातला माणूस राजकारणात असल्यामुळे त्याला स्वस्थ राहून आणि स्वस्थ बसून चालत नाही…त्याने कायम अस्वस्थ राहायलाच हवं असा राजकीय निसर्गाचा म्हणे नियमच आहे.

…त्यासाठी त्याला बहुसंख्य वेळा कारण नसताना किंवा अधेमधे कारण असताना वाद करावे लागतात, वाद घालावे लागतात…कधी कधी वाद उकरावे लागतात, कधी कधी वादांना निमंत्रण द्यावं लागतं…

- Advertisement -

…असेच एक गृहस्थ आहेत त्यांना तर वाद खूप आवडतात…चार दिवसांत त्यांच्याबाबतीत एखादा वाद झाला नाही तर त्यांना आपण राजकारणातून बाहेर फेकलं गेल्यासारखं वाटतं…

…मग कुणाशी तरी एखादा नवा वाद घालून ते स्वत:ची पुन्हा राजकीय प्राणप्रतिष्ठा करतात…आणि आपलं राजकीय अस्तित्व बरणीत लोणचं टिकवावं तसं टिकवतात…

- Advertisement -

…हे असे वाद निर्माण करताना त्यांचा चेहरा पाहण्यालायक असतो…गुगली टाकून दुसर्‍याला मस्त खिजवण्याचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर कायम असतात…

…छोट्या गोष्टीतही ते सापडला नाही तरी वाद शोधून काढतात…आणि माकड झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसावं तसं वादाच्या शेंड्यावर जाऊन बसतात…

…जगाचे सगळे प्रश्नं मिटून जग सगळ्या अंगाने संपूर्णपणे सुखी झालं तरी ते सुखी होणार नाहीत…जग कशावरून सुखी झालं आहे ह्याचे पुरावे मागितल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत…

…त्यांच्या आजुबाजूचं सगळं राजकीय पर्यावरण त्यांना एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणतं…त्यांना स्वत:ला मात्र त्यांचं व्यक्तिमत्व वादग्रस्त असणं हे त्यांचं क्वालिफिकेशन वाटतं…

…ऐन मोक्याच्या क्षणी त्यांचे अमूल्य वादग्रस्त उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडायला उशीर जरी झाला तरी पत्रकारांसकट सर्वांच्या भुवया उंचावल्या जातात इतकी त्यांची वाद निर्माण करण्याबाबत जबरदस्त ख्याती आहे…

…खरंतर म्हातारी रोज मरे त्याला कोण रडे, असं ह्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाबद्दल एव्हाना व्हायला हवं होतं…पण म्हातारी रोज मरे ते रोज सगळ्यांना आवडे असं त्यांच्याबाबतीत झालं आहे…

…परवा त्यांना वादाला कोणताही विषय मिळाला नाही तेव्हा त्यांना खूप घुसमटल्यासारखं झालं…आणि त्यांच्या छातीत कळ आली…

…त्यानं लगोलग आपल्या निधड्या छातीपासून शरीरमानाचं मोजमाप जाहीर केलं…पण आपलं वादग्रस्त रूपडं शाबूत ठेवलं…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -