कलाकार सज्ज आहेत!

Subscribe

…तर आता ह्यापुढे दीड-दोन महिने मनोरंजन करणारी माध्यमं साफ फिकी पडणार हे मॅचफिक्सिंगसारखं नक्की झालं आहे…मनोरंजनाच्या क्षेत्रातले खरे कलाकार मनोरंजन करण्याचा घेतला वसा आता दीड-दोन महिने तरी बाजुला ठेवणार आहेत.

…कारण सरळ आहे, आता रसिकजनांची सेवा करण्यासाठी राजकारणातले यच्चयावत कलाकार पुढचे दीड-दोन महिने सज्ज होणार आहेंत…आणि ते करत असलेल्या मनोरंजनाला कशाकशाची तोड असणार नाही…

- Advertisement -

…आधी आम्ही शंभर आणि तुम्ही पाच म्हणणारे, नंतर अचानक आम्ही अधीपासूनच एकशेपाच आहोत असं सांगत एकाच घोड्यावर टाच मारून वेडात दौडणार आहेत…हे मुलखाचे विनोदमुर्ती अख्खा मर्द मराठी मुलुख पालथा घालणार आहेत…

…दुसर्‍या बाजुला मावळ, माढा प्रांतातले फेटे, पागोटी, पगड्या घातलेले लोककलाकार आपल्या लोकलगीतांची सुरूवात थोडीशी बिचकत, पण इंग्रजाळलेल्या मराठीत करणार आहेत…त्याच्याच थोडं बाजुला मफलरवाले बाबा आपल्या मफलरमधून दिल्लीवर तीर मारायला सरसावलेले आहेत…

- Advertisement -

…अशाच एका कोपर्‍यात एक गोळीबंद चारोळीकार सध्या त्यांच्यासाठी एकही गाळलेली जागा न ठेवल्यामुळे आपल्या चारोळ्या, कविता कुलूपबंद ठेवून बसले आहेत…पण त्यांची गाळलेली जागा भरली गेली की ते आपल्या कविता गाळायला सुरूवात करणार आहेत…

…थोडेसे लांब असलेले, पण खुर्चीत असो किंवा नसो, आपल्या जिभेच्या दांडपट्ट्याने तिन्ही त्रिकाळ दिग्विजय मिळवणारे एक राजेही आपल्या जिभेला धार काढून बसले आहेत…ते जिथे आवश्यक तिथे तर दांडपट्टा चालवणार आहेतच…पण जिथे अनावश्यक आहे तिथेही दांडपट्टा गोल गोल फिरवणार आहेत…

…खालच्या बाजुला आपल्या विद्वान बोलीने थरारून टाकणारा आणि राजकीय आभाळातला झुल्पधारी देखणा शशी त्याला कधी वेळ मिळाला तर एक डायलॉग टायमिंग साधत टाकण्याची शक्यता आहे…आता सध्यातरी तो त्यासाठी आपणच लिहिलेल्या पुस्तकातले संदर्भ चाळत आहे…

…विस्तीर्ण भालप्रदेश मिरवत फिरणारे एक स्वामी तर विनापरवाना विनोदी बोलण्याच्या तयारीतच आहेत…आणि वेळप्रसंगी ते आपल्याच माणसांवरही ब्लॅक कॉमेडी करायला मागेपुढे बघणार नाहीत…

…शिवाय आंध्र प्रदेशातून उत्तर प्रदेशात आणि उत्तर प्रदेशातून पुन्हा उत्तर प्रदेशातच पदन्यास करणारी अभिनेत्री मुखाने काही बोलणार नाही…पण ह्या अशा पदन्यासातूनच मनोरंजन करण्यासाठी सिध्द, कटिबध्द आहे…

…तर सांगायचा मुद्दा हा की पुढचे दीड-दोन महिने राजकारणाचा सेट लागलेला आहे…ह्या रिअ‍ॅलिटी शोमधल्या कलाकारांपुढे त्या आलिया-गेलिया, रणवीरसिंग-कणवीरसिंग कलाकारांचं मनोरंजन शंभर टक्के फ्लॉप ठरणार आहे!…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -