राजकारण, एक खेळ!

Subscribe

राजकारणात, आणि विशेषत: निवडणुकीत गल्लीबोळ राजकारण्याचाही आत्मविश्वास डळमळीत होऊन चालत नाही…माझ्याकडे आहे ते राजाकडे नाही असं कठीण परिस्थितीतही त्यांना म्हणावं लागतं.

…पक्षाच्या पूर्ण विरोधात जनमत असलं आणि ते सपशेल दिसत असलं तरी अखंड देशातली तमाम जनता खंबीरपणे आमच्यामागे आहे असं देठोक बोलावं लागतं…आम्हाला पराभूत करणारा अजून ह्या भूतलावर जन्माला यायचा आहे असेही गर्विष्ठ फुत्कार प्रसंगी टाकावे लागतात…

- Advertisement -

…वास्तविक आपला पराभव अटळ आहे हे त्यांना माहीत असतं…आणि त्यांचा पराभव होणार हे अंतिम सत्य त्यांना माहीत आहे हे जनतेलाही माहीत असतं…

…पण तरीही जनता आमच्या बाजुने आहे आणि आम्ही केलेलं काम जनतेच्या स्मरणात आहे असं बोलायची एक पध्दत आहे…आणि ही पध्दत, निकालाच्या दिवशी पहिल्या चार फेर्‍यांमध्ये साफ पिछाडीवर पडल्यावरही पक्षाच्या प्रवक्त्यांना बोलताना अंमलात आणावी लागते…

- Advertisement -

…मतमोजणीत नंतर नंतर आपल्या उमेदवाराचा पराभव स्वच्छ दिसायला लागलेला असतो…पण तिथेही आमच्या उमेदवाराला पडलेली शेकडा मतं तोडीस तोड आहेत अशी फुशारकी पुन्हा तितक्याच आत्मविश्वासाने मारावी लागते…

…दणदणीत पडलो तरी ढिगार्‍याखाली गाडलो गेलो नाही ना, असं वरच्या पट्टीत सांगावं लागतं…पराभव झाला तरी पराभव मान्य आहे असं न म्हणता आम्ही जनमताचा कौल स्विकारतो असं म्हणावं लागतं…

…खेळाच्या मैदानात पराभव स्विकारण्याची एक वेगळी पध्दत असते…आमच्यापेक्षा विजयी संघाची कामगिरी सरस झाली असं खुल्या दिलाने म्हणायची खिलाडू वृत्ती पराभूतांना तिथे पध्दत असते…

…राजकारणातले खेळाडू पर्दे के पिछे पराभवाचं वास्तव स्विकारतील…पण पडद्यावर मात्र आपल्यातला खेळाडू वजा करून टाकतील…

…क्वचितप्रसंगी विजयी उमेदवाराला हार्दिक शुभेच्छा देतीलही…पण त्या शुभेच्छाही जुलमाच्याच असतील…

…राजकारणातल्या विजय-पराजयातही राजकारणी शेवटपर्यंत राजकारण करत राहण्याची आपली सवय आणि शैली काही केल्या सोडत नाहीत…आणि राजकारणातल्या आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत खिलाडूवृत्ती काही येऊ देत नाहीत…

…बाकी सगळ्याचा खेळखंडोबा करताना राजकारणाचा खेळ करत राहतील…पण खिलाडू वृत्तीला पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत नॉन-स्ट्रायकिंग एन्डला ठेवतील…

…त्यांचा खेळ ते त्यांच्या नियमाप्रमाणे खेळतील…आणि त्यांचे नियम हे त्यांच्या नियमातच बसवतील…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -