एकेकाचा एकेक जाहीरनामा!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

बघता बघता एकेकाचा जाहीरनामा जाहीर होऊ लागला…आणि शेगडीवरच्या रश्शाला तापता तापता जसा रंग येतो तसा अवघ्या वातावरणाला रंग येऊ लागला.

…सत्ता मिळण्याची खात्री नसणार्‍या मंडळींचा जाहीरनामा म्हणजे आश्वासनांची तुडुंब पोतडी असते…गृहिणींना मोफत नेलपॉलिश आणि लिपस्टिक ह्यासह दर पंधरवड्याला ब्युटी पार्लरचा खर्च देण्याचीही तयारी दाखवतील की काय, अशी शंका तो जाहीरनामा प्रसिध्द होताना येते…

…सत्ताधारी मंडळींना मात्र जाहीरनामा तयार करताना मागेपुढे बघत तो जपून लिहावा लागतो…मागच्या जाहीरनाम्यातलं काय काय पूर्ण केलं, काय काय करताना आपल्या हातून कशाकशाचं वाटोळं झालं हे बघत त्यांना अतिशय सावधपणे जाहीरनामा करावा लागतो…

…तसं पाहिलं तर गवती चहा पिऊन सर्दी अंगावर काढणार्‍या सामान्य माणसाला ह्या जाहिरनाम्याचं काही सोयरसुतक नसतं…त्यांच्या लेखी कुणाचाही जाहीरनामा हा बँकेत टाकल्यावर बँकेने नाकारलेला चेक असतो…

…पण राजकीय पक्षांना मात्र एकमेकांच्या जाहीरनाम्याबद्दल खूपच पडलेली असते…दुसर्‍याचा जाहीरनामा येण्यापूर्वीच त्यांनी आपली प्रतिक्रिया ठरवून टाकलेली असते…

…सत्तेत येण्यासाठी विरोधकांच्या वारेमाप आश्वासनांचा पाऊस पाडलेल्या जाहीरनाम्याला सत्ताधारी मुंगेरीलाल के हसीन सपने म्हणणार हे आपल्या लोकशाहीतल्या पहिलटकर मतदारालाही मेंदूला फार ताण न देताही कळतं…आणि सत्ताधार्‍यांनी त्यांचा जाहीरनामा जाहीर करताच पुन्हा नव्या भुुलथापा असं स्टिरिओटाइप विशेषण विरोधक लावणार हे सगळ्यांना पाठ झालेलं असतं…

…खरंतर कुणाच्याही जाहीरनाम्यात घरात आणि करात सवलत असलं लाळघोटं लोणी असल्याशिवाय तो पूर्ण होत नाही…आणि त्यावर भुरभुरायला; रस्ते, वीज, पाणी ह्याचा थोडासा मसाला मारल्याशिवाय त्याला शोभाही येत नाही…

…सर्वसामान्य लोकांना उगाचच वाटत राहतं की सत्तेत आलेले सगळे वीरपुरूष सत्तेत आल्यानंतर दरदिवशी जाहीरनाम्याचं प्रत्येक पान उघडत असतील आणि ते वाचून त्याप्रमाणे राज्यकारभार करत असतील…आणि नंतरच आपल्या देवघरातल्या पोथीला हात लावत असतील…

…जाहीर केलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे वागायला पाहिजे रे बाबा, नाहीतर जनतेला आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही…जाहीरनामा म्हणजे जनतेपुढे घेतलेली शपथ आहे, ती मोडली तर आपल्याला पाप लागेल असं त्यांना सगळ्यांना वाटत असेल असं आपल्याला उगाचच वाटतं…

…पण नंतर सगळ्यांनाच कळतं की विनोदाचे जसे कायिक विनोद, वाचिक विनोद असे प्रकार असतात…तसाच जाहीरनामा हा लोकशाहीतला दर पाच वर्षांनी येणारा छापील विनोद असतो आणि त्यामुळे एखाद्या वेळी त्यात प्रिन्टिंग मिस्टेक होण्याची शक्यता असते…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here