निवृत्ती राजकारणातली…

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

परवा राहूल गांधी पुण्यात म्हणाले की राजकारणातही निवृत्ती असायला हरकत नाही…आणि साठ वर्षांपर्यंत राजकारणाचं घोडं दामटणं ठीक आहे.

…राहूल गांधींच्या इतर कोणत्या विधानांवर वाद होण्यासाठी टपलेले लोक ह्या विधानावर वाद घडवून आणतील असं आपल्या मोरूला त्यावेळी उगाचच वाटलं…आपल्या देशातला एखादा चुकार राजकारणी राहूल गांधींच्या ह्या निवृत्तीच्या ह्या विचारावर निदान सहमती दर्शवणारा ट्विट करील असंही मोरूच्या मनात आलं…

…पण वाद घालण्याचं पेटंट असणारे लोकही ह्याच्यावर तेरी भी चूप, मेरी भी चूप स्टाइल गप्प बसले तेव्हा मोरूलासुध्दा ते खटकलं…पण मोरूसुध्दा त्याला काय करणार! मोरूसुध्दा त्यावर तेरी भी चूप, मेरी भी चूप स्टाइल गप्प बसला…

…कारण मोरूला त्यातल्या त्यात बरे वाटणारे बहुतेक नेते आपली षष्ट्यब्दिपूर्ती साजरी करून मोकळे झाले होते…आणि ह्या ना त्या मोक्याच्या खुर्चीवर आपला संधीवात सांभाळत विसावले होते…

…मोरूने त्याच दिवशी लालकृष्ण अडवाणींचा ब्लॉग वाचला…आणि त्यात त्यांनी त्यांच्या वयाच्या नव्वदाव्या वर्षी, कर चले हम फिदा जानो तन साथियो पध्दतीचा लिहिलेला मजकूर वाचला आणि मोेरूला जरा भरून आलं…

…पण तिथेही मोरूचा भ्रमनिरास झाला…कारण अडवाणींना सक्तीची निवृत्ती पत्करायला लागली होती हे काही सेकंदांतच मोरूच्या लक्षात आलं…

…मोरू त्याच्या ऑफिसातून ऐच्छिक निवृत्ती घेऊन आता शांत जीवन जगत होता…आयुष्यभरातल्या जगण्याच्या लढ्यात त्याला ज्या ज्या उचापती कराव्या लागल्या त्यातली एकही उचापत करायची त्याची आता इच्छा नव्हती…

…पण मोरूच्या ळक्षात आलं की नव्वद वर्षांच्या अडवाणींनी जाता जाताही मोदी, शहांना कानपिचक्या देत कुरापत काढली होती…आणि आपल्या काळातल्या भाजपची संस्कृती शिकवली होती…

…आपल्या ऑफिसातून निवृत्त होताना मोरूच्या मनातही त्याची जागा बळकवणार्‍या वरिष्ठांबाबत आजच्या अडवाणींसारखाच राग आला होता…पण जाता जाता कशाला कुणाशी वाईटपणा घ्यायचा म्हणून मोरू सगळा राग गिळून पुष्पगुच्छाचा स्वीकार करत ऑफिसच्या बाहेर पडला होता…

…मोरूला ते सगळं आठवलं आणि अडवाणींसारखं आपण कुणालाच काही सोज्वळ भाषेतही सुनावलं नाही ह्याचा खूप पश्चात्ताप झाला…त्या काळात ब्लॉग लिहिण्याची सुविधा उपलब्ध नव्हती ह्याचंही मोरूला वाईट वाटलं…

…मोरूला अडवाणी खूप अनुभवी वाटले…आणि खूप स्मार्टही वाटले…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here