फॉर्म भरण्याचा सोेहळा!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

आमच्या मतदारसंघातले उमेदवार आज त्यांचा फॉर्म भरायला निघाले…ते घरातल्या सोफ्यावरून उठले आणि देवघरासमोर हात जोडून घराबाहेर पडले तसे त्यांच्याबरोबर त्यांचे नेहमीचे गण्यागंपूसुध्दा त्यांचा फॉर्म भरायला निघाले.

…सगळ्यांच्या खिशाला लखलखीत, चकचकीत पेनं होती…त्यामुळे नेमकं कोण फॉर्म भरणार हे गल्लीतल्या गर्दीच्या लक्षात येत नव्हतं…

…सगळ्यांचेच कपडे ताठ परीटघडीचे होते…आणि पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे होते…

…नवरात्रात वर्तमानपत्रात आपल्या ग्रुपचा लई भारी फोटू छापून यावा म्हणून हौशी महिला वर्ग जशा एकरंगी साड्या नेसतात तसे उमेदवाराचे गण्यागंपू एकसमान कपडे घालून आले होते…त्यासोबतच एकाच डिझाइनची उपरणी त्यांनी गळ्यात घातली होती…

…बघता बघता ही अशी उपरणी चढवलेले बरेच गळे एकामागोमाग एक गोळा झाले…आणि त्यातल्याच एका गळ्यातून बाहेर पडलेला उमेदवाराच्या झिंदाबादचा कर्णकर्कश्य चित्कार गल्लीतल्या चिंचोळ्या आसमंतात फुत्कारत वर गेला…

…गल्लीतून समोरून येणार्‍या दुचाकी आणि चारचाकींना उमेदवाराच्या ह्या ताफ्यासमोर अंग चोरून उभं राहावं लागलं…हा ताफा पूर्णपणे निघून जाईपर्यंत वडापाववाले, पेपरवाल्यांना जागच्या जागी निपचीत बसावं लागलं…

…गल्लीतलं वातावरण त्या गर्दीने असं काही करून टाकलं की अखंड जगाचे तारणहार फक्त ह्याच गल्लीत जन्माला आले आहेत…आणि तारणहारही अशा पध्दतीने फॉर्म भरायच्या मोहीमेवर निघाले की आता फॉर्म भरला की जगातल्या सगळ्या दुष्टांचं निर्दालन होऊन सज्जनांचं कल्याण होणार…

…उमेदवारांची गंमत अशी होती की फॉर्म भरायला जाताना उमेदवाराच्या चेहर्‍यावर असं काही तेज होतं की ते तेज सुर्याच्या चेहर्‍यावर नसेल…फॉर्म भरायला जातानाच उमेदवाराच्या अंगात असा काही जोश आणि दौड होती की पावसाळी आकाशात लकाकणारी वीज लाजेल!…

…तर असे हे उमेदवार वेडात मराठे वीर दौडले सात पध्दतीने एकसाथ निघाले…आणि निघताना झुकून नमस्कार करत चालले…

…निवडणूक लढवण्याच्या आधीच गल्लीतली वातावरणनिर्मिती अशी होती की उमेदवार आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेत…पण नंतर सर्वांना कळलं की वरून आदेश होता फॉर्म भरायला जाताना असं शक्तीप्रदर्शन करा की विरोधी पक्षासकट सगळं अशक्त वाटलं पाहिजे…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here