ट्वेंटी-ट्वेंटी निवडणूक!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

क्रिकेटमध्ये आधी फलंदाजी करणार्‍या संघाचा डाव आटोपतो…आणि आपल्या संघाने केलेल्या एकूण धावांवरून त्या संघाला सामना संपल्यावर आपल्या संघाचं काय निकाल लागणार, ह्याचा पुरता अंदाज येेतो.

…आपल्याला पाचपन्नास धावा कमी पडल्या आहेत हे शेवटचा चेंडू पडल्या पडल्या त्यांच्या लक्षात येतं…आणि पॅव्हेलियनमध्ये परतताना, नंतर आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे ह्याची मनातल्या मनात ते नोंद घेतात…

…निवडणुकीच्या रिंगणातसुध्दा, सध्या ज्याच्या हातात बॅट आहे त्या पक्षाला आपण किती चेंडू फुकट घालवले…आणि कुठल्या चेंडूंवर अनावश्यक फटके मारून आपण आपल्या विकेट्स फेकण्याचा अवसानघात कसा केला हे डाव संपायला आला की लक्षात येतं…

…बॅटधारी पक्षाची जाहिरनामा करताना खरी पंचाईत होते…रोजगाराच्या बाबतीत पुन्हा कोणतं आश्वासन द्यायचं आणि पुन्हा किती कोटीचा आकडा मांडायचा ह्या विषयावर हनुवटीवरची दाढी पुन्हा पुन्हा खाजवावी लागते…

…उभ्याआडव्या खेळपट्टीवर पाच वर्षं मनाला येईल तसं खेळताना रोजगाराचा आकडा तसा गाठताच येत नाही…मग पाच वर्षांनंतर बेरकी फलंदाजांना रोजगाराच्या आकडेफलकावरच बारदान घालावंसं वाटतं…

…मग मंदिर प्रश्नावरचा फिरकी चेंडू राउंड द विकेट दबा धरून बसलेला असतोच…हा चेंडू धूर्त आणि निष्णात फलंदाजांनी संपूर्ण पाच वर्षात आधीची चार वर्षं बॅटवर आणि पॅडवरही न घेता यष्टीरक्षकाकडे जाऊ दिलेला असतो…

…मग पाचव्या वर्षाच्या मध्यावर हा चेंडू क्रिज सोडून खेळायचा प्रयत्न सुरू होतो…आणि मग मायबाप प्रेक्षकही ह्या फलंदाजाच्या अंगात असं एकाएकी येऊन हा असा एकाएकी आक्रमक का झाला हे समजून जातात…

…तिथे प्रतिस्पर्धी संघातले इब्लिस खेळाडू काही चेंडूंच्या अंतराने नियमितपणे हाऊज दॅट, हाऊज दॅट अशी कचकचीत अपिलं करत राहतात…पण फलंदाजी करणार्‍या लोकांना प्रतिस्पर्ध्यांच्या हाऊज दॅटमध्ये फुले-शाहू-आंबेडकर ऐकू येतं, त्यामुळे ते कधी लक्ष देतात तर कधी लक्ष दिल्याचा कसदार अभिनय सादर करतात…

…शेवटची इनमिन षटकं धावफलकावर दिसू लागली की देशभक्ती, देशद्रोहाचा रिव्हर्स स्विंग सुरू होतो…आणि प्रेक्षकांमध्ये भावनावेगाची लाट उसळायला सुरूवात होते…

…पण हल्लीचे प्रेक्षकसुध्दा इतके चापलूस की पुढचं षटक सुरू झालं की आधीच्या भावभावनांना मुठमाती देऊन टाकतात…त्यामुळे बॅटधार्‍यांना सामन्यात देशभक्तीच्या भावनेच्या नव्या आतषबाजीची व्युहरचना आखावी लागते…

…पण चाबरट प्रेक्षक आता कशालाच बधत नाही हे लक्षात येतं…आणि फलंदाजी करणार्‍यांना स्टार फलंदाज असूनसुध्दा धावफलकावर कमी धावा लागणार ह्याचं वास्तव स्विकारावं लागतं…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here