घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटनिवडणूक एके निवडणूक!

निवडणूक एके निवडणूक!

Subscribe

शाळांच्या परीक्षा आल्या की पेपर फुटण्याच्या बातम्या येतात…निवडणूक आली की फोडाफोडीच्या बातम्या समोर येतात.

…हा फुटला, हा फोडला गेला, हा फुटण्याच्या मार्गावर आहे अशा बातम्यांची राळ उडते…पण ह्या फोडाफोडीच्या बरोबरच खास जळगावकरी झोडाझोडीची बातमीही मध्येच डोळे मिचकावून जाते…

- Advertisement -

…आणखी एक अशीच, कुणीतरी कुणावर तरी हल्लाबोल केल्याची बातमी येते…कुणीतरी म्हणे दिल्लीतून येतात आणि आल्या आल्या ते बारामतीतल्या एका कुटुंबावर घसरल्याची ती बातमी असते…

…कुणावर तरी कोण तरी ही अशी घसरल्याची बातमी येत असतानाच अचानक कुणाची तरी जीभ घसरल्याची बातमी येते…एरव्ही अतिशय समंजस समजल्या जाणार्‍या पुढार्‍याच्या मालकीची ही जीभ अशा वेळी बिनधास्त टाळूला लागलेली असते…

- Advertisement -

…निवडणुकीच्या भाषणात जीभ सांभाळून बोलणं तसं म्हणे हल्लीच्या राजकारणात तब्येतीला हानीकारकच असतं…आणि तसंही आजच्या राजकीय संस्कृतीत म्हणे जीभ सांभाळण्याच्या सुसंस्कृतपणाला कुणीच योग्य हमीभाव देत नसतो…

…पाइपलाइन फुटून कित्येक लीटर पाणी गेल्याची एरव्हीची ठराविक अंतराने येणारी बातमी निवडणुकीच्या वेळी गुपचूप गुडूप होते…एटीएम मशीनवर दरोडा घातल्याच्या बातमीलाही मग इथे थारा नसतो…

…सिनेमा-नाटकवालेही ह्या काळात अंग चोरून बसलेले असतात…क्वचित एखादा प्रिमियर, एखादा शुभारंभाचा प्रयोगही कुणी कुठे ठेवण्याचं धाडस करत नाही…

…नाटक-सिनेमाच्या बातम्यांना अशा वेळी साफ मांगच्या रांगेचं तिकिट मिळतं…पण नेत्याच्या बायोपिकच्या बातमीला अशा वेळी विनाशुल्क पुश मिळतो…

…निवडणूक ही अशी निवडणुकीसंबंधीच्या बातम्यांचं भांडार घेऊन येते…इतर बातम्यांशी भेदभाव करत त्यांना दुय्यम वागणूक देते…

…निवडणुकीतल्या बातम्यांना काळा आणि पांढरा हे दोनच रंग असतात…आणि निवडणुकीच्या कॅनव्हासवर ह्या दोनच रंगांची उधळण होते…

…प्रचार करणं म्हणजेच काळ्याला पांढरं ठरवणं…आणि पांढर्‍याला काळं फासणं…

…निवडणुकीच्या ह्याच दिवसांत अचानक कुणाच्या तरी पांढर्‍या गाडीत कोट्यवधी रूपयांची रोकड जप्त केल्याची बातमी येते…आणि पांढर्‍या गाडीतल्या ह्या पैशांचा रंग खरोखरच काळा आहे की कुणी तरी कुणाला तरी काळं करण्यासाठी हे काळं कृत्य केलं आहे ही बातमीमागची बातमीही जाणकारांना सहज कळून येते…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -