घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटस्त्रीशिक्षण ते स्मृतीशिक्षण!

स्त्रीशिक्षण ते स्मृतीशिक्षण!

Subscribe

ताकाला जाताना भांडं लपवू नये…आणि निवडणूक लढवायला जाताना आपलं शिक्षण लपवू नये.

…स्मृती इराणींना निवडणुकीतलं हे शाश्वत सत्य उशीरा का होईना कळलं…पण ते कळल्या कळल्या त्यांनी अमेठीतून फॉर्म भरला…

- Advertisement -

…बरं, फॉर्ममध्ये खरं खरं लिहिल्यावरही विरोधकांनी स्मृती इराणींविरूध्द आदळआपट करायला सुरूवात केली ह्याचं बर्‍याच जणांना खूप वाईट वाटलं…म्हणजे चुकीचं काही केल्यावर तुम्ही बोटं मोडताच, पण माणसाने सत्याची कास धरल्यावरही तुम्ही थयथयाट करता हे बर्‍याच भुतदयावादी लोकांना पटलं नाही…

…चुकलेला वाटसरू योग्य मार्गाला लागला ह्याचं मानवतावादी तत्वांना धरून स्वागत व्हायला हवं होतं…पण पापाचं परिमार्जन करून पुण्याचा रस्ता धरणार्‍यांच्या वाटेलाही उपेक्षा यावी ह्वासारखं दुसरं दु:ख नव्हतं…

- Advertisement -

…नसतं एखाद्याचं इतकं शिक्षण झालेलं, पण म्हणून एखाद्याची इतकी चेष्टा करावी?…त्यातून चक्क एका महिलेला इतकं हिणवलं जावं?

…आणि शिक्षणाचं इतकं काय घेऊन बसलात राव!…नाहीतरी माणसाचं खरं शिक्षण हे शाळा सोडल्यावरच सुरू होतं असं म्हणतात ना?…

…व्यवहारी जगात अखेर शिक्षणाचा काही उपयोग होत नाही हे शिक्षणक्षेत्रातल्याच लोकांनी कबूल केलं आहे ना?…त्याशिवाय का ’शिक्षणाच्या आयचा घो’सारखा सिनेमा जोरात चालला?…

…आणि राजकारणातल्या लोकांचं शिक्षण आधी कुणी विचारावंच का?…नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारण्यासारखंच नाही का ते?…

…राजकारणात हल्ली शिक्षणाने काही कुणाला साध्य होतं का?…राजकारणात हल्ली फॉर्म भरल्यावर कुणाच्या शिक्षणाला प्रसिध्दी मिळण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या स्थावर, जंगम मालमत्तेला जी प्रसिध्दी मिळते त्यानेच सगळं काही साध्य होत असतं हे कुणाला माहीत नाही का?…

…लोक तरीही एखाद्याच्या खर्‍याखोट्या शिक्षणाचा इतका बभ्रा करतात हे खरोखरच अशिक्षितपणाचं लक्षण आहे…अशाने लोकांची शिक्षणाबद्दलची ओढ कमी होण्याची शक्यता स्पष्ट दिसते आहे…

…सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीशिक्षणासाठी इतका घनघोर संघर्ष केला त्याची परिणती एखाद्या स्त्रीच्या शिक्षणाबद्दल हुर्रेवडी उडवण्यात व्हावी ह्याला काय म्हणावं!…स्त्रीशिक्षण ते स्मृतीशिक्षण ह्या वाटचालीत स्त्रीसकट एकूण समाजाच्याच नशिबी हे काय पहाणं यावं?…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -