त्यांचे प्रश्न…आपले प्रश्न!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

रोज रोज पालेभाज्या काय खायच्या, बायकोला उद्या सांगितलीच तर कशाची उसळ करायला सांगायची, हा तुम्हाला-आम्हाला पडलेला दैनंदिन प्रश्न असतो…राजकारणातल्या लोकांचे दैनंदिन प्रश्न मात्र तसे नसतात.

…राज ठाकरेंच्या सभेचा खर्च कुणाच्या खात्यात टाकायचा, हा त्यांच्यापुढचा प्रश्न असतो…आणि आपल्या फिजूल दैनंदिन प्रश्नांपुढे त्यांचा हा प्रश्न कितीतरी घनगंभीर असतो!…

…ते राज ठाकरेंसाठी काढलेला हा प्रश्न राज ठाकरेंना करत नसतात…आणि निवडणूक आयोगालाही करत नसतात…

…ते आपल्या दैनंदिन प्रश्नात त्यांना पडलेल्या प्रश्नाची भर टाकत असतात…आपल्या प्रश्नावलीला पुरवणी प्रश्नावली लावत असतात…

…आपल्या पोराबाळांचा सर्दीखोकल्याचा ताप अजून का उतरत नाही, हा आपल्यापुढचा प्रश्न असतो…अशा वेळी, पुलवामा हल्ला झाल्यानंतर पुढच्या तीन दिवसांतच देशभक्तीचा ज्वर इतक्या लवकर का उतरला, हा ज्वरजहाल प्रश्न त्यांना पडलेला असतो, हा प्रश्न पडताना त्यांच्या हातात त्यांच्या आयटी सेलचं थर्मामीटर असतं…

…गावाहून आपली आई आपल्या घरी राहायला आली तर ते आपल्या बायकोला चालेल का, हा आपल्यापुढचा प्रश्न असतो…त्याच वेळी, उद्या राहूल गांधी पंतप्रधान झाले तर ते शरद पवारांना चालणार आहे का, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो…

…आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी सोसायटीच्या वाढीव खर्चाबद्दल सगळ्यांना विश्वासात घेऊन का सांगत नाहीत, हा आपल्याला पडलेला प्रश्न असतो…तेव्हाच, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद का घेतली नाही, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो…

…थोडक्यात काय तर आपल्या आणि त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न वेगवेगळे असतात…कारण ते आपल्यापेक्षा वेगळे लोक असतात…

…त्यांना आपल्यासारखं राहून, आपल्यासारखं दिसून चालत नाही…आणि आपल्यासारखे मिरची-कोथिंबिरीचे प्रश्न पडून चालत नाही…

…त्यांचे प्रश्न राजा भोज असतात…आपले प्रश्न दोन वेळच्या भोजनाचे असतात…

…एव्हाना सगळ्यांना कळलंच असेल…ते आपल्या फिजूल प्रश्नांना भाव का देत नाहीत?…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here