श्रीमंत विरूध्द जुने

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

अल्पावधीत त्यांचा पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष झाला…आणि प्रदीर्घ काळ मिळूनही ह्यांचा सर्वात जुना पक्ष जुनाच राहिला.

…त्यांची श्रीमंती त्यांच्या टेबलावरच्या कापडातूनही दिसू लागली…ह्यांचा जुनेपणा त्यांच्या पांढर्‍या सदर्‍यातून दिसत आला…

…नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये असं म्हणतात म्हणून त्यांना कुणी त्यांच्या श्रीमंतीबद्दल काही विचारलं नाही…ह्यांना आता हे जुनेच आहेत तर उगाच जुनेच प्रश्न काय उकरून काढायचे म्हणून कुणीच काही बोललं नाही…

…त्यांनी त्यांची कार्यालयं वगैरे कशी मस्त पंचतारांकित करून घेतली…हे त्यांच्या जुन्या भवनात आपला तोच जुना चरखा चालवत बसले…

…ते अहोरात्र मार्केटिंग करत बसले, वॉररूम चालवत बसले…हे त्याच जुनाट अ‍ॅन्टि इन्कम्बन्सी फॅक्टरची वाट बघत बसले…

…ते थोर प्रतिकं वापरू लागले, उंच पुतळे उभारू लागले…हे नुसतेच पुष्पहार घालत बसले, पुष्पचक्र अर्पण करत राहिले…

…त्यांनी मैदानात मांडी घातलेल्या लोकांना योगा शिकवायला घेतला…हे समता, बंधुभावाचा तोच जुना धागा विणत बसले…

…ते उंच व्यासपीठांवरून कायम उंच आवाजात बोलू लागले…हे दया, क्षमा, शांतीचा चिरका स्वर आळवू लागले…

…त्यांनी उत्तरं द्यायचीच नाही असं ठरवून टाकलं…हे तरीही प्रश्नांमागून प्रश्न विचारत बसले…

…ते बायोपिक काढत बसले…हे ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइटच्याच जमान्यात रमत राहिले…

…ते तिथे क्लिन चीट देत राहिले…हे इथे जामीन देत राहिले…

…ते किराणा मालासारखी त्यांच्या योजनांची यादी देऊ लागले…हे त्या योजना आपल्याच काळातल्या आहेत म्हणून बोलू लागले…

…ते ह्यांच्यापासूनच्या मुक्ततेची घोषणा करू लागले…ते तरीही कुठे ना कुठे डोकं वर काढत राहिले…

…त्यांनी मग ह्यांचीच ब्रेकेबल माणसं फोडायला घेतली…तेव्हा मात्र ह्यांनी, इतक्या सर्वात श्रीमंत पक्षात माणसं कमी पडतात का म्हणून विचारायला सुरूवात केली…

…त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया न देण्याचं ठरवलं…ह्यांनी राहिलेल्या ब्रेकेबल माणसांसोबत काम करायचं ठरवलं…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here