निवडणुकांच्या देशा…

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

जिंदा कौमे पाच साल तक इंतजार नही करती, असं राम मनोहर लोहिया म्हणून गेले…लोहियांचं म्हणणं खरं आहे, पण ह्या पाच वर्षांत मध्ये पोटनिवडणुकांसह दोन-तीन निवडणुका येऊन जातात त्याचं काय करायचं हा आमच्या मनात प्रश्न असतो…

…राकट देशा, कणखर देशा असं जे कुणी लिहुन गेलेत त्याच्याबद्दलही आमचा आक्षेप नाही…पण त्यापुढे ते निवडणुकांच्या देशा लिहायला नक्की विसरले असं आम्हाला राहून राहून वाटतं…

…मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावण्याच्या जाहिराती झळकू लागल्या की आमच्या मनात हे असे विचार येऊन जातात…तरीही पुढच्याच क्षणी लहर आली की आम्ही मतदान केंद्रात जात असतो हे सांगायलाच हवं…

…निवडणुकीत मतदानकेंद्र हे आमच्या अस्तित्वाचा रांग लावून सत्कार करण्याचं व्यासपीठ असल्याचा आम्हाला भास होत असतो…सर्व असामान्यांच्या कोंडाळ्यात आम्ही सर्वसामान्य जे जगून दाखवत असतो त्याची काही तरी कदर करण्याचं आम्हाला ते ठिकाण वाटत असतं…

…मतदान करायलाच हवं हे तसं आमच्या मनावर पुर्वापार कोरलं गेलं आहे…पण कधी कधी आमच्या मनात प्रखर उन्हाच्या सबबी येतात आणि त्यामुळे आम्हाला कधी कधी वामकुक्षी घेण्याची लहर येते हे आम्हाला नाकारता येत नाही…

…कधी कधी शनिवार-रविवारला लागून सुट्या येतात तेव्हा आमच्या चंगळवादी मनाला आउटिंगला जायची हुक्की येते…मग मात्र आमचा लोकशाहीवादी विचार आम्हाला गुंडाळून ठेवावाच लागतो…

…कधी कधी आम्हाला वाटतं की लोकशाहीचा भार आपल्या एकट्यावरच नसतो…मतदान केंद्रात जे पन्नास-साठ टक्के लोक नित्यनेमाने येतात ते जर हा भार वाहत असतील तर आपण तिथे जाण्याची काय गरज आहे असं आमच्या मनात येतं…

…कुणी ना कुणी लोकशाहीचे शास्ते, आधारस्तंभ आपल्या अवतीभोवती असतात, शेजारी राहतात हे खरंतर आमचं परमभाग्य आहे…त्यांच्यामुळेच लोकशाहीचा प्रवाह वाहता राहिला आहे ह्याचाही आम्हाला आनंद आणि अभिमान आहे…

…पण तरींही लोकशाही आमच्याकडे टिकली पाहिजे, नांदली पाहिजे असं आम्हाला सारखं वाटतं…लोकशाही टिकवण्यासाठी कुणीतरी तशाच संबंधितांनी पुढे यायला हवं असं सारखं आमच्या मनात येतं…

…असो, आम्हाला तसाच वेळ मिळाला की आम्हीही लोकशाहीची प्राणपणाने प्रतिष्ठा राखू ह्याचं आम्ही वचन देतो…कधी ना कधी सिनेमा थिएटरसारखं मतदान केंद्रही शंभर टक्के हाउसफुल्ल करू ह्याची खात्री देतो, धन्यवाद…

– अँकर