Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर लोकसभा २०१९ डोक्याला शॉट उत्सव संपता संपता…

उत्सव संपता संपता…

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

लोक राजकारणाबद्दलचं आपलं भलंबुरं मत व्यक्त करतात…पण मतदान करत नाहीत.

…मतदानाचं प्रमाण पाहिलं की लोकांच्या राजकारणाबद्दलच्या एकूण उदासीनतेचंच प्रमाणपत्र मिळतं…उत्सवप्रिय देशातल्या लोकांना लोकशाहीतल्या मोठ्या उत्सवाबद्दल फारसा उत्साह नसतो हे चित्र पहायला मिळतं…

…निवडणुकांदरम्यान लोक उलटसुलट भाषणं ऐकतात…एकदुसर्‍याला खिजवणार्‍या जाहिराती बघतात…

…कुणी जान्हवं घालून देवळात जाताना पहातात…कुणी कुणाचे पाय धुताना पहातात…

…हीसुध्दा उत्सवाचीच लक्षणं असतात…मग ह्या उत्सवाची सांगता होताना मतपेटीकडे भाविक कमी संख्येने का वळतात?…

…लोकशाहीच्या ह्या मोठ्या उत्सवाबद्दलची लोकप्रियता अशी कमी का होत चालली आहे?…की कुणाची तरी लाट निर्माण झाली तरच ह्या उत्सवाबद्दल भाविकांना आस्था वाटते?…

…की लाट ओसरली की भाविक ओसरतात?…आणि लाटेतून कोणती प्रतिमा उभी राहिली की भाविक ह्या उत्सवाच्या भजनी लागतात?…

…सव्वाशे कोटी असा आकडा उत्सवाचे आयोजक बसताउठता आपल्या भाषणांतून लोकांच्या तोंडावर फेकत असतात…देशातल्या जनांना मायबाप जनता असं अतिशय नम्र विशेषण लावून हात जोडत असतात…

…पण तरीही शेवटी सव्वाशे कोटींमधले काही कोटी ह्या उत्सवाकडे पाठ फिरवत असतात…ते ह्या आकड्यांच्या खेळाने, असल्या अतिनम्र विशेषणांनी उबगून जातात…

…पन्नास-पंचावन्न टक्क्यांनी हा उत्सव उत्तीर्ण होतो…आजच्या स्पर्धात्मक जगात असल्या पन्नास-पंचावन्न टक्क्यांना खरंतर कुणी विचारत नसतो…

…ह्या उत्सवात हिरीरीने सामील होण्यासाठी बोटाला शाई लावल्यानंतर नाशिकातल्या एखाद्या ठिकाणी भाविकांना मोफत रूद्राक्ष दिलं जातं…एखादा मिठाईवाला उन्हाळ्याची काहिली शमवणारं पन्हं देत असतो…

…पण तरीही पन्नास टक्के भाविक ह्या आमिषांना भुलत नसतात…आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आलिशान लिफ्टमधून खाली उतरत नसतात…

…असा हा लोकशाहीचा मोठा उत्सव संपत येतो तसं भाषणं संपतात, आरोप-प्रत्यारोप संपतात…आणि गेले अडीच महिने चालू असलेला हा डोक्याला शॉटही संपतो…

…खरंतर राजकारण हेच मुळी सर्वसामान्यांच्या डोक्याला शॉट असतं…पण तरीही राजकारणावरच्या ह्या डोक्याच्या शॉटला जो उत्साही वाचकांचा प्रतिसाद मिळतो त्यासाठी शब्दांचं तुुटपुंजेपण जाणवतं…खूप आभार वाचकहो!…

– अँकर