चर्चा बंद दाराआडची…

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

कार्यकर्त्यांच्या उघड्या डोळ्यांदेखत बंद दाराआड चर्चा करण्यासाठी सगळे नेते हॉटेलमध्ये गेले…आणि आपापल्या रूमवर पोहोचले.

…रूम्स अर्थातच थंडगार वार्‍याला गुलाम करणार्‍या होत्या…जेवण्याखाण्याची, झोपण्याची, घोरण्याची अशी सगळी बडदाश्त त्यात असणं अपरिहार्य होतं…

…युतीतला तिढा सोडवण्यासाठी म्हणे हेच हॉटेल लकी ठरतं…आणि आघाडीतली बिघाडी सोडवण्यासाठीही हेच हॉटेल उपयोगी पडतं…

…दोन्ही पक्ष एकत्र येऊनही दोन पक्षातले काही लोक नाराज होते…कारण म्हणे एका जागेसाठी दोन पक्षात एकमत होत नव्हतं…

…एका पक्षातले काही लोक म्हणत होते की ती मूळ आमची जागा आहे…आणि दुसर्‍या पक्षातले काही लोक म्हणत होते की तो आमचा बालेकिल्ला आहे…

…हे जे दोन्हीकडले काही लोक म्हणजे स्वामिनिष्ठ आपापला कळप करून हॉटेलबाहेरच उभे होते…एकमेकांना वांझोटी खुन्नस देत होते…

…कुणी कुणी बाहेरून कान टवकारून बातम्या काढत होतं…कुणी कुणी उगाचच मोबाइलवरून बोलताना आपण हायकमांडच्या खूप जवळ असल्याचा अभिनय करत होतं…

…कुणी कुणी, आता थांबायचं नाय म्हणत दुसर्‍या गटाचा रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न करत होतं…कुणी, आता मांडवलीबिंडवली काय नाय म्हणत समोरच्याच्या तंबूत घबराट निर्माण करत होतं…

…हॉटेलबाहेरचं वातावरण एकदम तणावपूर्ण बनलं होतं…कुणाचा कुणाशी समझौता होणार नाही असं एकूण चित्र होतं…

…आता कुणी कुणाला अरे म्हटलं असतं तर पलिकडून कारे असा प्रतिध्वनी आला असता…आणि काही ध्वनी कर्णपिंपुटाखालीही उमटण्याची शक्यता होती…

…प्रामणिक आणि पापभिरू अशा दोन्ही प्रकारच्या सर्वसामान्य माणसाने हॉटेलच्या जवळून जाऊ नये अशी सर्व नेपथ्यरचना होती…ठिणगी कोणत्याही क्षणी पडेल अशी वादळाआधीची शांतता होती…

…आणि इतक्यात बंद दारं किलकिली झाली…हळुच नेतेमंडळी बाहेर आली…

…नेतेमंडळींचे जडबंबाळ चेहरे पाहूून सर्वांना वाटलं की बोलणी फिसकटली…वाट लागली…

…इतक्यात दोन प्रतिस्पर्ध्यातल्या एकाचं नाव नेत्यांनी घोषित केलं…दुसर्‍याने वेळ न लावता त्याला पेढा भरवला…

…दोघांच्याही गण्यागंपूंनी, आगे बढो, हम तुम्हारे साथ है वगैरे घोषणा दिल्या…आणि हॉटेल युतीला लकी ठरलं…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here