इलेक्टोरल मेरीट…

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

निवडणूक लढवण्यासाठी पात्रता काय लागते असा प्रश्न कुणा एका पक्षाच्या कार्यकर्त्याने विचारला…विचारल्या विचारल्या त्याला उत्तर मिळालं, पात्रता म्हणजे तुला काय वाटलं शैक्षणिक पात्रता? ती नव्हे…निवडून येण्याची क्षमता!

…त्या उत्तराने कार्यकर्त्याच्या तोंडातच बसली…कार्यकर्ता जो गपगार झाला तो दोन तास काही बोललाच नाही…

…निवडून येण्याची क्षमता ह्याचा अर्थ त्याला एका क्षणात कळला…निवडणूक लढवून निवडून येणं ही चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांनंतर सदुसष्ठ-अडुसष्ठावी कला असल्याचं तर एव्हाना त्याला कळून चुकलं होतं…

…ही निवडून येण्याची क्षमता निवडून देणार्‍यांमध्ये कधीच असत नाही हे लोकशाहीमधलं त्रिकालाबाधित सत्य तर त्याला हळुहळू लक्षात येऊ लागलं होतं…खुद्द तोसुध्दा वर्षानुवर्षं निवडून देणार्‍यांच्याच गटातला अविभाज्य घटक झाला होता हेही त्याला आता माहीत पडलं होतं…

…पण कार्यकर्ता असला तरी त्याच्या मनालाही कधी कधी आकांक्षांचे धुमारे फुटायचे…त्याच्या स्वप्नांनाही अधेमधे कोवळी पालवी फुटायची…

…दरवेळी साहेबांनीच साहेब म्हणून काय मिरवायचं, आपणही एक दिवस आपल्या साहेबांसारखे गरीबांचे कैवारी, दु:खितांचा त्राता, पिडितांचे कनवाळू का बनू नये?…अशी सणकी एखाद्या दिवशी ह्या कार्यकर्त्याच्या मनात येऊन जायची…

…पण गरीबांचे कैवारी बनण्यासाठीसुध्दा इतर कुठली पात्रता असण्यापेक्षा निवडून यायचीच क्षमता लागते हेही तसं त्याला उशीराच कळलं…त्याला बर्‍याच गोष्टी लोकशाहीत तशा उशीराच कळायला लागल्या ह्याचं नंतर नंतर त्याला दु:ख होऊ लागलं…

…निवडून येण्याच्या क्षमतेला इंग्रजीत इलेक्टोरल मेरीट म्हणतात हे त्याला खूप दिवसांनी हायकमांडकडून कळलं…तोपर्यंत तो मराठीत सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे निवडून येण्याची क्षमताच म्हणायचा…

…हे इलेक्टोरल मेरीट आपल्या बायोडेटात येण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न त्याने एके दिवशी स्वत:लाच विचारला…पण नीट उत्तर न मिळाल्याने एकदा ह्या प्रश्नाची तड लावण्यासाठी त्याने सदासर्वकाळ इलेक्टोरल मेरीट असणार्‍या आपल्या साहेबांनाच हा थेट प्रश्न केला…

…साहेब, तुम्ही कसं काय हो इतकं इलेक्टोरल मेरीट मिळवू शकलात?…कार्यकर्त्याने साहेबांना विचारूनच टाकलं…

…मी निवडणुकीच्या खर्चाला टेंडरने गुणत गेलो आणि पेट्या-खोके हातचे मिळवत गेलो, पुढच्या चार निवडणुकांचं इलेक्टोरल मेरीट आपोआप मिळत गेलं…साहेबांनी हे कार्यकर्त्याला सांगितलं तेव्हा कार्यकर्त्याचा चंबू झाला…

– अँकर