घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटआयपीएल आणि निवडणूक!

आयपीएल आणि निवडणूक!

Subscribe

आयपीएल आणि निवडणूक असा सगळा टू-इन-वन मामला येतो आहे…सगळी खूप मजा मजा असणार आहे.

…मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपली आयपीएल आपण दक्षिण आफ्रिकेत निर्यात केली होती…ह्या वेळी आपल्या झाडाची फळं आपणच आपल्याच अंगणात चाखायचं ठरवलं आहे…

- Advertisement -

…गेल्या आयपीएलमधला गौतम गंभीर ह्यावेळी निवडणुकीच्या मैदानात दाखल झाला आहे…आणि त्यालासुध्दा म्हणे देशाच्या विकासाचा आस्किंग रेट कळला आहे…

…यंदा आयपीएल आणि लोकसभा निवडणूक एकमेकांचा हात धरून नेमकं उन्हाळ्यात येताहेत…ह्यामागेही काही राजकारण असल्याचं काहीं बनचुक्या लोकांचं म्हणणं आहे…

- Advertisement -

…एकदा का आयपीएलमध्ये लोक बुडाले की ते देशाचा जीडीपी रेट विसरतात असाही काहींचा समज आहे…तर एकाच माणसाचं त्याच तारस्वरातलं भाषण ऐकून कंटाळा आला असेल आणि त्याचा टीआरपी कमी झाला असेल तर खापर फोडायला काहीतरी हाताशी असावं म्हणून आयपीएल ह्यावर्षी इथेच ठेवलं आहे असंही काहीजण म्हणताहेत…

…आयपीएल आणि ही निवडणूक, दोन्हीही उष्ण प्रदेशातल्या उन्हाळ्यात येत असल्यामुळे घामटा निघणार हे ओघाने आलंच…पण दोन्ही ठिकाणच्या ह्या घामाला कोटी कोटींची किंमत असणार हेसुध्दा बरोबरीने आलंच…

…पण एक मात्र आहे, निवडणूकवाल्यांना आयपीएलवाल्यांकडे लक्ष द्यायची इच्छाही नसणार आणि तितका वेळही नसणार!…आणि तसंही इकडे आयपीएलवाल्यांना निवडणूक, लोकशाही वगैरेची काय पडलेली असणार!…

…निवडणूकवाल्यांना एका गोष्टीची चिंता नक्की असणार…बारा चेंडूत अडतीस धावांची गरज असताना स्टार प्रचारक, फायरब्रॅन्ड नेत्यांची भाषणं कोण ऐकणार?…

…निवडणूकवाल्यांना चुकूनमाकून दोन सेकंद कुठे आयपीएल बघायची सवड मिळालीच तर आयपीएलवाल्यांकडून ते काहीतरी बोध घेतील…आणि दोन स्लीप एक गली लावून निकटच्या प्रतिस्पर्ध्याची विकेट कशी काढायची, ह्याची युक्ती शिकतील…

…हळुहळू आयपीएलचा गोंगाटसुध्दा वाढेल…आणि निवडणुकीचा ज्वरसुध्दा वर वर चढत जाईल…

…पण एका बाबतीतलं साम्य मात्र नक्की दिसेल…काल मुंबई इंडियनमधून खेळणारा खेळाडू जास्त बोली लावून आज मुंबई इंडियनविरूध्द खेळताना दृष्टीस पडेल…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -