घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटनिघालो आज मी स्वगृही...

निघालो आज मी स्वगृही…

Subscribe

दिवेलागणीच्या वेळी पाखरं परतायला लागतात…अगदी तसंच निवडणुकीच्या वेळी पुढारी स्वगृही परतायला लागले…

…हे पुढारी स्वगृही परतू लागल्याच्या बातम्या यायला लागल्या…आणि नुकतंच मिसरूड फुटलेला मन्या ह्या स्वगृही परतणार्‍या पुढार्‍यांचा हिशोब ठेवू लागला…

- Advertisement -

…एकामागोमाग एक पुढारी स्वगृही परतू लागले…तसा मन्याच्या चोपडीतला आकडा वाढू लागला…

…आज इतक्या दिवसांनी हे पुढारी स्वगृही परतत आहेत, तर मग इतके दिवस हे कोणत्या गृहात नांदत होते, असा प्रश्न मन्याच्या मनाला सारखा सतावायला लागला…हे स्वगृह वाटतं तर मग त्या परगृहात त्यांना इतके दिवस कुणी असं डांबून ठेवलं होतं, असा पेच मन्याला पडला…

- Advertisement -

…आज मी पुन्हा माझ्या माहेरी आलो आहे, अशी एका पुढार्‍याने जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा मात्र मन्या हसून हसून गडाबडा लोळला…हा पुढारी आधी जिथे होता तिथे त्याला अचानक कसला सासूरवास होत होता ह्याचा त्याने मनातल्या मनात तर्क करून पाहिला…

…हे सगळे पुढारी स्वगृही परतताना समारंभपुर्वक परतत होते ह्याची नोंद मन्या घेत होता…स्वगृही परतताना झेंडा-उपरणं घालून प्रत्येकाचा सोहळा साजरा होत होता हेही मन्या पहात होता…

…पुढार्‍यांच्या स्वगृही परतण्याचा जर इतका नयनरम्य सोहळा होत असेल तर पुढारी आधी जिथे होते तिथे जेव्हा ते गेले त्यावेळीही झालेल्या अशाच सोहळ्याचं काय, असाही विचार मन्याच्या मन्यात येऊन गेला…

…पुढारी आता जिथे परतत होते ते जर स्वगृह असेल तर आधीचं परगृह होतं की परग्रह होता, असाही खोडकर विचार मन्याच्या मनात आला…आणि मन्या ह्या स्वगृह फेम पुढार्‍यांबद्दल स्वत:शी खूपच खोडकर बोलू लागला…

…आता हे स्वगृही परतलेले पुढारी ह्या आल्या घरी किती काळ सुखी राहतील, ह्याची मिश्किल चिंता मन्याला लागून राहिली…पुढच्या पाच वर्षांनी आधीचं दिलं घर तर त्यांना स्वगृह वाटणार नाही ना, अशी एक सहज शंका त्याच वेळी मन्याच्या मनात डोकावून गेली…

…मन्याच्या मनात विचारांचं असं काहूर माजलं असतानाच मन्याने सहज म्हणून आजच्या वर्तमानपत्रातली आपली रास चाळली…त्यात मन्याच्या राशीसमोर गृहकलह छापलं होतं…

…आपली आजची रास बघून मन्याच्या डोळ्यासमोर आपली कजाग आई आली…पण आपल्याला आपल्या स्वगृहीच परतावं आणि राहावं लागेल ह्याची त्याला पटकन जाणीव झाली…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -