घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटछाप्याची मोबाइल बातमी...

छाप्याची मोबाइल बातमी…

Subscribe

मन्याला मोबाइलच्या कुठल्याशा ग्रुपवर पोस्ट आली की कुठल्याशा नेत्याच्या घरावर प्राप्तीकर कार्यालयाचा छापा पडला.

…मन्याची त्या नेेत्यावर शॉलेड खुन्नस होती…साहजिकच, मन्या मनातून जबरदस्त सुखावला होता…

- Advertisement -

…मन्या लोकलमध्ये व्हॉट्स अ‍ॅप चाळत होता…आणि कधी एकदा घरी जाऊन टीव्हीवर ह्याची बातमी बघत चहा घेतोय असं त्याला झालं होतं…

…तो नेता स्वत:ला मोठा शहाणा समजत होता, बरं झालं त्याच्या घरावर छापा पडला…मन्या हळूच ओठातल्या ओठात पुटपुटत होता…

- Advertisement -

…ह्या नेत्याने बराच धनसंचय करून ंठेवल्याचा मन्याला राजकारण कळायला लागल्यापासून संशय होता…

…स्टेशनामागून स्टेशनं जात होती…घर कधी येतंय असं मन्याला झालं होतं…

…तोपर्यंत मन्या ती पोस्ट सगळ्यांना फॉरवर्ड करून मोकळा झाला होता…

…इतरांनीही मन्याला ती पोस्ट फॉरवर्ड केली होती…त्यामुळे त्या नेत्याच्या घरावर प्राप्तीकर कार्यालयाचा छापा पडला आहे ह्याची मन्याला खात्री पटली होती…

…खरंतर त्या नेत्याने मन्याच्या उण्यापुर्‍या आयुष्यात मन्याचं काही घोडं मारलं नव्हतं…पण तरीही मन्याला त्या नेत्याने आपल्या पटावरचे एक-दोन घोडे मारल्यासारखं वाटायचं…

…शेवटी भरला ना पापाचा घडा?…आता उडाली असेल झोप!…मन्या त्या नेत्याच्या नावाने खडे फोडत होता…

…मन्या घरी जाईपर्यंत लोकलमध्ये तसा एक छान झोप काढायचा…शेजारच्यांच्या खांद्यावर मानसुध्दा टाकायचा…पण आज मात्र मन्याच्या आनंदाला इतकं भरतं आलं होतं की मन्या झोप घेऊ शकणारच नव्हता…

…शेवटी मन्याचं स्टेशन लोकलने गाठलं…आणि गर्दीतून आडदांडपणा, रासवटपणा करत मन्या लोकलमधून खाली उतरला…

…धावतपळत, धापा टाकत मन्या त्याच्या सोसायटीत आला…तीन पायर्‍यांची एक पायरी करत मन्या त्याच्या घरापर्यंत पोहोचला…

…दारावरची बेलसुध्दा त्याने घाईघाईत वाजवली…बायकोने दरवाजा उघडला तसा तो बायकोकडे जराही न पहाता अशा वेगाने घरात शिरला की जणू काही प्राप्तीकरवाले मन्याच्याच मागे लागलेत…

…मन्याची बायको घाबरली, पण मन्याने जेव्हा टीव्ही लावला तेव्हा तिची भीती निघून गेली…

…मन्याने या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळे चॅनेल धुंडाळले…पण प्राप्तीकरवाल्यांनी त्याच्या त्या नावडत्या नेत्याच्या घरावर छापा टाकल्याची बातमी त्याला कुठेही दिसली नाही…

…मन्याने चष्मा नळाखाली धरला…आणि रूमालाने खसाखसा पुसला…पण तरीही ती बातमी त्याला कुठेही दिसली नाही…

…त्याने पुन्हा पुन्हा मोबाइल चाळला तर अजूूनही त्याचे काही दोस्त ती छापा टाकल्याची पोस्ट त्याला फॉरवर्ड करतच होते…

…शेवटी मन्याने मोबाइल वर उचलला आणि फोमच्या बिछान्यावर आदळला…नंतर गॅलरीत जाऊन त्या छाप्याचे फोटो त्याने काढून टाकले…पुढे कितीतरी वेळ मन्याने मोबाइल हातात घेतलाच नाही….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -