लोकशाहीवादी स्वप्न!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

बाळू मेंगळे ती पोस्टर्स भिंतीच्या वीतभर जवळ जाऊन वाचू लागला…पोस्टरवर लिहिलं होतंं, आपला मतदानाचा ह्क्क बजावा, सुजाण नागरिक बना.

ती पोस्टर्स वाचून बाळू मेंगळे स्वत:शीच म्हणाला…किती वर्षं आपण असं सुजाण नागरिक बनून राहायचं, आपण कधी कुणाचे अधिकृत उमेदवार, तरूण तडफदार, गरीबांचे कैवारी वगैरे बनणार?…

…ह्यावेळी आपण कुणाचं तरी अधिकृत उमेदवार बनून दाखवायचंच, अशी शपथच बाळू मेंगळेंने घेतली…आणि तो कामाला लागला…

…दुसर्‍याच दिवशी तो नाक्यावरच्या एका गल्लीबोळ पुढार्‍याच्या ऑफिसात पोहोचला…तिथे गटारातलं पाणी तुंबतं वगैरे तक्रारी घेऊन त्याच्या गल्लीतले काही सुजाण आणि जागरूक नागरिक पुढार्‍याकडे आले होते…

…हळुहळू सरकत सरकत बाळू मेंगळेचा नंबर लागला तेव्हा पुढार्‍याने बाळूला बाळूची तक्रार विचारली…बाळू मेंगळेने आपण आपली तक्रार नव्हे तर आपण आपलं एक स्वप्न घेऊन आल्याचं सांगितलं…

…पुढारी चांगलाच चक्रावला, पण पटकन सावरला…त्याला कळलं की कुणीतरी लोकशाहीवादी चक्रम आपल्याकडे आला आहे…

…पुढार्‍याने बाळू मेंगळेला त्याचं स्वप्न विचारलं…बाळू मेंगळेने, आपल्यालासुध्दा तुमच्या पक्षाचं अधिकृत उमेदवार व्हायचं असल्याचं स्वप्न सांगून टाकलं…

…पुढारी आणखी चक्रावला, पण त्यावर तोडगा काढत त्याने बाळू मेंगळेपुढे मध्यममार्ग ठेवला…तो बाळू म्हणाला, तुम्ही आधी आमच्या पक्षाच्या सदस्यत्वाची पावती फाडा…

…बाळू मेंगळेने दुसर्‍याच क्षणाला एकशे एक रूपये देऊन पावती फाडली…आणि बाळू मेंगळे एका राष्ट्रीय पक्षाचा सदस्य झाला…

…आता बाळू मेंगळे सगळे कामधंदे सोडून पक्षाच्या कार्यालयात रोज बसू लागला…पक्ष सांगेल ती कामं करू लागला, पक्षाच्या चूटूरपुटूर आंदोलनात भाग घेऊ लागला…

…हळुहळू निवडणूक येण्याची चाहूल लागली…आणि आता आपलं स्वप्न पूर्ण होण्याची बाळू मेंगळेला चाहूल लागली…

…बाळू मेंगळेने पक्षाचा अधिकृत उमेदवार होण्यासाठी तिकिट मागितलं…बाळूला लागलीच तिकिट नाकारण्यात आलं…

…बाळूनेसुध्दा लागलीच त्याचं कारण विचारलं…बाळूला सांगण्यात आलं, तुझ्याकडे इलेक्टोरल मेरीट म्हणजे निवडून येण्याची क्षमता नाही!…

…बाळूला लागलीच कळलं की आपली लोकशाही इलेक्टोरल मेरीट असलेलेच लोक चालवतात…बाळू पक्षाच्या ऑफिसात जायचा बंद झाला…

– अँकर