चिंतन बैठक आणि संंपर्क यात्रा!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

इकडे ह्यांची चिंतन बैठक सुरू झाली तेव्हा तिकडे त्यांची संपर्क यात्रा सुरू होऊन सांगतेची वेळ समीप आली होती.

…मोरूला चिंतन बैठक आणि संपर्क यात्रा ह्या दोन्ही गोष्टींबद्दल खूप कुतुहल होतं…चिंतन बैठकीत कशाचं चिंतन करतात आणि संपर्क यात्रेत कुणाशी संपर्क करतात, ह्याबाबतीतली त्याची जिज्ञासू वृत्ती नेहमी जागृत व्हायची…

…राधा गौळण करिते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन, हे गाणं त्याने त्याच्या आईच्या तोंडून ऐकलं होतं, तेव्हापासून चिंतन बैठक म्हणजे त्याला अध्यात्मिक मार्गावर चालताना लागलेला एक मुक्काम वाटायचा…

…चिंतन बैंठक हा ज्यांचा लाडका शब्द आहे त्या पक्षातले सगळे शीर्षस्थ नेते, पदाधिकारी आणि त्यांचे सगळे भालदार, चोपदार, जमादार अतिशय धीरगंभीर मुद्रा धारण करून आणि व्याघ्रचर्मावर छान मांडी घालून ध्यानस्थ बसत असावेत, असा मोरूचा कयास होता…

…संपर्क यात्रेबद्दलही त्याच्या मनात काही आदर्श कल्पना होत्या…त्याला वाटायचं की हे संपर्क यात्रा वगैरे आयोजित करणारे लोक भल्या पहाटे उठत असतील…आणि मतदारयादीतला एकही जीव संपर्कावाचून राहू नये म्हणून कितीतरी तळमळीने त्यांना हुडकून हुडकून भेटत असतील…

…मोरूला वाटायचं की संपर्क यात्रेतले यात्रेकरी संपर्क होणार्‍या प्रत्येकाशी त्याच्या रोजच्या जगण्याबद्दल विचारत असतील…श्वास घेण्यासाठी त्याला हवेतून किती ऑक्सिजन मिळतो इथपासून, बाजारातले भोपळी मिरचीचे भाव तुझ्या खिशाला परवडतात का, इथपर्यंतचे सगळे प्रश्न साग्रसंगीत जाणून घेत असतील…

…चिंतन बैठकीबद्दल तर त्याला खात्रीच होती की ह्या बैठकीतले लोक नक्कीच अखंड विश्वातल्या प्रत्येक महामानवाला पडणार्‍या चिंतेचा विचार करत असतील…आणि समाजातल्या शेवटच्या स्तरावरच्या शेवटच्या माणसाच्या गरजांची कदर असतील…

…राजकारणातली माणसं बेरकी, बेरड आणि निबर कातडीची असतात हा त्याच्या मनात जो वर्षानुवर्ष समज होता त्याला ह्या चिंतन बैठकीने आणि संपर्क यात्रेने जबरदस्त धक्का बसला होता…

…लोक किती सेवाभावी वृत्तीने राजकारणात येतात ह्याचा त्याने खूप सहानुभुतीपुर्वक विचार केला…आणि त्या चिंतनशील, संपर्कशील लोकांना मनातल्या मनात सलाम ठोकला…

…अशी माणसं आहेत म्हणून आज हे जग सुखेनैव चालतंय असं त्याला मनोमन वाटू लागलं…माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाची कदर करणार्‍या राजकारणातल्या अशा मानवतावादी लोकांची आपण काहीतरी कदर केलीच पाहिजे असं त्याला राहून राहून वाटू लागलं…

…तो ताबडतोब चाळीच्या खाली उतरला…आणि त्याने कोपर्‍यावरल्या एका दुकानातून एक महागडा पुष्पगुच्छ घेतला…

…थोड्याच वेळात चिंतन बैठक घेणार्‍या पक्षाच्या ऑफिसात मोरू पोहोचला…तर चिंतन बैठकवाले मोरूचं सर्वसामान्य रूपडं पाहून म्हणाले, ए, भुसनळ्या कुठे चालला रे…

…मोरू म्हणाला, आम्हा लोकांबद्दल हे लोक चिंतन करतात म्हणून त्यांचे आभार मानायला…

…आता आत जाता येणार नाही, आतले सगळे लोक चायनिज खाताहेत…चिंतन बैठकीच्या बाहेरचा चिंतनशील पहारेकरी म्हणाला…

…चिंतन बैठकीतल्या चायनिजचा अर्थ मोरूला लक्षात आला…खरेदी केलेला महागडा पुष्पगुच्छ फुलवाला परत घेणार नाही ह्याची चिंता आता मोरूला लागून राहिली होती…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here