एक होता वासू, एक होती सपना!

Mumbai
Dokyla shot editorial
डोक्याला शॉट संपादकीय

सकाळ झाली भैरू उठला आणि दात वगैरे न घासता सरळ नाक्यावरच्या पेपर स्टॉलवर गेला.

पेपरस्टॉलवाला म्हणाला, बोला, कोणतं वर्तमानपत्र पाहिजे आपल्याला?

भैरूसुध्दा पेपरवाल्याला वेड्यात काढत म्हणाला, कोणतं वर्तमानपत्र पाहिजेल हाय म्हनून काय विचारताय?…मी काय वर्तमानपत्र वाचतो काय?…मला मुखपत्र द्या!

पेपरवाल्याची अर्धी जिंदगी पेपर विकण्यात गेलेली. त्यालासुध्दा कळलं की भैरूला मुखपत्रं म्हणजे नेमकं काय हवं आहे ते. त्याने पेपरांच्या चळतीतून नेमकं मुखपत्र बाहेर काढलं आणि भैरूला दिलं.

भैरूची कळी खुलली. भैरूने मुखपत्राच्या हेडलाइनवर नजर टाकली. आतलं संपादकीयही पाहिलं नाही…आणि तो ओरडतच घरी आला…बायकोला म्हणाला, काय नाय, काय नाय…युतीबिती काय होणार नाय!

बायको लगेच त्याच्या अंगावर कावली, म्हणाली, एका युतीसाठी तुम्ही रोज रोज हे एकच मुखपत्रं का म्हून घिऊन येता?…बाकीची वर्तमानपत्रबी घिऊन या की!…त्यांच्याबी हेडलाइनी आम्हाला कळू द्या की!…हेच तेवढं मुखपत्रं…आणि आजच्या तारखेला बाकीची काय मूकपत्रं हायत की काय?

भैरू परत आपल्या मूळ पदावर आला आणि म्हणाला, हे बघ…मी तुला सांगतो ते ध्येनात ठेव…आजची ह्या मुखपत्राची हेडलायन बघ…देशाच्या प्रगतीच्या आकड्याची प्रचंड पिछेहाट!… आगं, साफ ही हेडलायनच सांगतीय की युतीबिती काय होत नाय…

भैरूच्या बायकोने त्याला लगेच डिवचलं, म्हटलं, कशापाय युती होत नाय?

भैरू पुन्हा जोशात म्हणाला, अगं, मी या मुखपत्राच्या नुस्त्या हेडलायनीवरून तुला सांगतू…युती होत नाय ज्जा!

भैरूची बायको म्हणाली, आत्ता गं बया…चारच दिवस आधी तुम्हीच तं म्हनाला होता ना की युती व्हनार म्हून?…

भैरूच्या बायकोने भैरूला बरोबर पेचात पकडलं.

पण भैरूने लगेच उत्तर दिलं, अगं बये, पन त्या दिवशी युतीबद्दल एक शब्द नव्हता मुखपत्रात! आणि संपादकीय लेखातबी राजकारणाचा विषय नव्हता…म्हनून मला वाटलं आता युती होणार…अख्खा महाराष्ट्र खालसा होणार!

भैरूची बायको म्हणाली, तुम्हाला ते जुनं वासू-सपनाचं गाणं म्हायत हाय का?…

भैरू म्हणाला, कोणतं गं…कोणतं गाणं?

भैरूची बायको म्हणाली, ते ओ…तेरे मेरे बीच में, कैसा हैं ये बंधन अंजाना!

भैरूच्या तोंडाचा चंबू झाला.

भैरूची बायको म्हणाली, त्या युतीमधी कसलं तरी बंधन आलंय अंजाना!

भैरू म्हणाला, तरीबी मी तुला सांगतू…ते बंधन निघून गेलं तरी युती होत नाय जा!…ते बंधन म्हणजे काय पाण्याच्या पायपात अडकलेला बोळा हाय काय!…बोळा काढला की पाणी झुळुझुळू व्हाहून गेलं?..तुुला मी सांगतू, युती होत नाय म्हणजे होत नाय ज्जा!

भैरूची बायको म्हणाली, पण तुम्हाला ते तेरे मेरे बीच में हे गाणं कोणत्या शिनेमामधी होतं ते माह्यत हाय का?

भैरू म्हणाला, पण त्या शिणेमाच्या नावाचा आणि ह्या समद्याचा काय संबंध हाय इथं?

भैरूची बायको म्हणाली, अवं काय तरी संबंध हाय म्हून तं मी बोलती ना?

भैरू म्हणाला, हे बघ…आपण एकदम पालिटिकल वाचणारा माणूस हाय…आपल्याला शिनेमाबिनेमातलं कायबी कळत नाय!

भैरूची बायको म्हणाली, अवं आसं काय करताय…त्या शिनेमाचं नाव होतं एक दुजे के लिए!

भैरू म्हणाला, असंल त्या शिनेमाचं नाव एक दुजे के लिए…त्याच्या नावाशी काय करायचंय आपल्याला!

भैरूची बायको म्हणाली, वायच कळ काढा…एके दिवशी तुम्हीच मुखपत्र घिऊन येताना बोंबलत याल की आज हेडलायन छापून आलीय…वासू-सपनाची सुपारी फुटली…युती जुळली!

भैरू पुढे काहीच बोलला नाही. मुखपत्राची घडी घालून गपगार बसला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here