बारमाही शिमगा!

Subscribe

…काल ते चारचौघांसमक्ष म्हणजे जाहीर सभेत बोलले…कालचं त्यांचं ते म्हणणं सगळ्या चॅनेलवर दाखवण्यात आलं आणि आज ते सगळ्या वर्तमानपत्रात रीतसर छापून आलं…

…ते जे काही बोलले तेव्हा सगळ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या…आणि त्यांनीही टाळ्या आणि शिट्ट्या वाजताना छान पॉज् घेऊन त्या स्विकारल्या…

- Advertisement -

…काल जे काही बोलले त्याच्याशी ते अगदी ठाम होते…आणि रात्री ते निश्चिंतपणे झोपले तोपर्यंतही त्यांच्या मनात आपल्या त्या उद्गारांबद्दल कोणत्याही प्रकारचा किंतू आला नव्हता…

…पण आज सकाळी त्यांना जाग आली…आणि त्यांनी आपल्या म्हणण्याचा सगळ्यांनी विपर्यास केल्याचं सांगायला सुरूवात केली…

- Advertisement -

…मी असं म्हणालोच नाही, असं ते म्हणू शकत नव्हते…कारण कळलाव्या कॅमेरा तेव्हा त्यांच्यासमोर होता…

…पुर्वी ही कॅमेर्‍याची भानगड नव्हती तेव्हाचे दिवस त्यांना आज आठवले…मी असं म्हणालोच नाही अस तेव्हां ते कितीदा म्हणाल्याची आज त्यांना पुन्हा पुन्हा आठवण झाली…

…तरूण पिढीला ज्या अत्याधुनिकतेकडे न्यायचं अभिवचन आपण देतो ती अत्याधुनिकता आपल्या मार्गात अशा पध्दतीने कशी आडवी येते ह्याचा आज त्यांनी पुन्हा एकदा अनुभव घेतला…

…आज दिवसभर त्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना सारवासारव करावी लागणार होती…आणि तसंही दिलगिरी व्यक्त करणं हे राजकारणी कसाही असो, त्याच्या तत्वात बसणारं नसतंच…

…आपण तसं बोललो हे त्यांनी मान्य केलं…पण लोकांनी त्या म्हणण्याचा काढलेला अर्थ त्यांना अमान्य होता…

…मी ते म्हणालो, पण तसं म्हणालो नाही हे वाक्य नंतर कानामात्रेची चूक न करता त्यांना पाठ झालं…त्यांच्या सहकार्‍यांनीही ते जसंच्या तसं पाठ केलं आणि चॅनेलोचॅनेली जसंच्या तसं बोलूून दाखवलं…

…त्यांच्या त्या वाक्याने राजकारणात उडालेला धुरळा आणखी दोन-चार दिवस तसाच उडत राहणार ह्याचा त्यांना अंदाज होता…आणि नंतर तो खाली बसणार ह्याचीही त्यांना खात्री होती…

…पण तोपर्यंत वर्षातून एकदा येणारा शिमगा त्यांनी आपल्या शुभहस्ते पेटवला होता…त्यात विरोधकांचं एकेक लाकूड कसं येतं आहे ह्याची ते वाट बघत आणि आनंद घेत बसले होते…

…असा शिमगा पेटवण्याची त्यांना कित्येक वर्षांची जुनी सवय होती…मग आता निवडणूक नावाचा शिमगा पेटताना ते थोडेच स्वस्थ बसणार होते!?…

अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -