राजकारणातले वडील!

Subscribe

पुर्वी गिरण्या-कारखान्यांमध्ये वडिलांच्या जागेवर मुलं कामाला लागायची…त्यामुळे वडिलांचा वारसा अखंड चालू राहायचा.

…वडील असतानाही मुलं कामाला लागायची आणि नसतानाही अनुकंपा तत्वावर का होईना, पण गिरण्या-कारखान्यांमध्ये चिकटायची…

- Advertisement -

…अमिताभ बच्चनने आपल्या डोळ्यासमोर आपल्या कारखान्यात मुलाला असाच कामावर ठेवला…पण मुलाची कामगिरी तितकी समाधानकारक ठरली नाही त्यामुळे काही दिवसांनी मुलाचं नाव हजेरीपटावरून दिसेनासं झालं…

…आपल्या क्रिकेटपटू लोकांनीही आपल्या पोराबाळांना आपल्या पश्चात कामावर चिकटून पाहिलं…पण ह्या कुलदीपकांना खेळपट्टीवर चिकटून उभं राहता न आल्यामुळे ती दिवसाढवळ्या आउट झाली…

- Advertisement -

…मग आपल्याच कारखान्यात, आपल्याच खात्यात, आपल्याच छकुल्यांना चिकटवायची ही साथ राजकारणात आली…आणि मग काय, एकेक छकुली टपाटप चिकटली, खासदार झाली, आमदार झाली, मंत्री झाली…

…जे इतर कोेणत्याही क्षेत्रातल्या बाप लोकांना आणि बाप-लेकांना जमलं नाही ते राजकारणाने करून दाखवलं…राजकारण हे कर्तबगार लोकांचं क्षेत्र आहे हे ह्यावरूनही सिध्द होतं…

…वडील विरोधी पक्षात आणि पुत्ररत्न सत्तारूढ पक्षात असंही राजकारणातल्या काही कारखान्यात दिसू लागलं…पण पोरगं नाक्यावर उभं न राहता कामावर तर आहे ह्याचा दिलासा वडील पक्षाला मिळू लागला…

…काही आज्ञाधारक मुलं वडिलांच्या आज्ञेत राहून वडिलांच्या पक्षात राहिली…काही आज्ञाधारक मुलं दुसर्‍या पक्षात राहूनही वडिलांच्या आज्ञेत राहिली…

…काहींनी मात्र हद्द केली…तुमच्या कारखान्यात राहू की प्रतिस्पर्ध्याच्या कारखान्यात जाऊ, असं म्हणत वडिलांना चक्क दमातच घेतलं…

…वडिलांना कळलं की आपली चप्पल मुलाच्या पायात आली आहे…पण हीच वेळ आहे की आता आपला पाय मुलाच्या हातात येता कामा नये…

…आता आपण आपल्या कारखान्यात मुलाला चिकटवता चिकटवता आपली राजकारणावरची चिकटपट्टी सैल होऊ नये म्हणून वडील तोंडाला पट्टी लावून बसू लागले…

…आता वडीलांना प्रश्न पडला आहे की पोराला पक्षांतर्गत विरोधक म्हणायचं की घरचा भेदी?…

-अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -