मोर्चा निघतोय मोर्चा!

Mumbai
Dokyla shot editorial
डोक्याला शॉट संपादकीय

राजकारणाच्या आकाशात आचारसंहितेचे ढग आता कधीही जमा होतील ह्याची चाहूल लागली…आणि हिंदुराव धोंडेपाटलांनी निवडणुकीपूर्वीचा एक भव्य, विराट, विशाल, मोर्चा काढायचं ठरवलं.

…झालं, कार्यकर्ते कामाला लागले…

…दणादण बॅनर्स लागली…फटाफट पोस्टर्स चिकटली…धोंडेपाटलांनी दिवसाची रात्र केली आणि रात्रीचा दिवस केला…एकदम 24 ु 7 मेहनत घेतली…

…धोंडेपाटलांना 24 ु 7 स्वप्नंही पडू लागली…आपल्या मोर्चाला अथांग जनसागर लोटल्याची स्वप्नं त्यांना दिवसाही पडू लागली आणि रात्रीही…त्या स्वप्नात त्यांना तहानभूक लागेनाशी झाली…कारण त्यांची मोर्चाची भूकच इतकी मोठी होती…

…धोंडेपाटलांना त्या मोर्चातून पक्षश्रेष्ठींना, पक्षांतर्गत विरोधकांना, विरोधकांना आपलं शक्तीप्रदर्शन दाखवायचं होतं…अशा वेळी अशक्त हालचाली करून चालणारच कसं होतं?…

…धोंडेपाटलांनी आठ-दहा दिवसांत कार्यकत्यांना ही फोनाफोनी केली…एकेकाच्या घराचे पुन्हा पुन्हा उंबरठे झिजवले…मध्यरात्री उत्तररात्रीपर्यंत जागवल्या…

…तुम्हाला नाही तर कुणाला मदत करायची…तुमच्यासाठी काय पण…तुम्ही म्हणाल तसं…तुम्ही नुसता हुकूम करा…असा गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांनी धोंडेपाटलांना चांगलाच प्रतिसाद दिला…

…अखेर मोर्चाचा दिवस उजाडला…

…गल्लीबोळातनं एकेक कार्यकर्ता जमा झाला…एकेका कार्यकर्त्याने आपापला कोटा आणला…

…बघता बघता जनांचा प्रवाहो जमला…एकेक तांडा जमला तसा धोंडेपाटलांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊ लागला…

…धोंडेपाटील आगे बढो वगैरे वगैरे वगैरे…

…मोर्चा निघायची वेळ झाली तरी मोर्चा पुढे पाऊल टाकेना तेव्हा काहीजणांचा जीव उगाच वरखाली झाला…कारण आणलेली माणसं शेवटपर्यंत टिकतील की नाही, ह्या प्रश्नाने त्यांच्या जीवाला घोर पडला होता…

…जो तो येऊन धोंडेपाटलांना आपल्या मनगटावरचं घड्याळ दाखवू लागला…

…धोंडेपाटील म्हणाले, चॅनेलवाले येऊ द्या, मग निघुया, तोपर्यंत उकाळा घ्या…

…हळुहळू एकेक चॅनेलचंपू सत्यनारायणाला बोलवल्यासारखा येऊ लागला…धोंडेपाटलांनी ठेवलेला उकाळा फुंकून फुंकून पिऊ लागला…

…धोंडेपाटलांनी चॅनेलवाल्यांचं मस्टरच ठेवलं होतं…आणि चॅनेलवाल्यांचा एकूण स्कोअर किती झाला होता ह्याची अधुनमधून ते चौकशी करत होते…

…धोंडेपाटलांनी आपल्या हातातलं मनगटी घड्याळ बघून शेवटी चॅनेलचंपूंचा धांडोळा घेतला…

…झी 48 तासवाला आला काय?…धोंडेपाटलांनी विचारलं…

…एबीपी सगळ्यांचावाला आला काय?…टीव्ही फाइनवाला काय?…शाम टीव्हीवाला आला काय?…धोंडेपाटील स्वत: मैदानात उतरून सगळ्यांची हजेरी लावत बसले…

…मस्टरवरले बहुतेक आमंत्रण दिलेले हा भव्य क्षण कव्हर करायला आले होते…

…एव्हाना कार्यकर्तेसुध्दा मोर्चा केव्हा निघणार म्हणून विचारायला लागले होते…

…आणि तंबूत आधीच डेरेदाखल झालेले चॅनेलचंपूही, आता कोणत्या महापुरूषासाठी थांबला आहात म्हणून धोंडेपाटलांची हुर्रेवडी उडवू लागले होते…

…धोंडेपाटील त्यांना डबल उकाळा घ्या म्हणून सांगत होते…पण चॅनेलचंपू आधीचाच उकाळा पाणचट होता म्हणून सांगून धोंडेपाटलांची पुन्हा हुर्रेवडी उडवत होते…

…धोंडेपाटील हिंदी चॅनेलचंपूंची वाट बघत होते…ते आल्याशिवाय मोर्चा काढायला तयार नव्हते…

…अहो पण हम है ना, असं मराठी चॅनेलचंपू परत परत सांगत होते…तरी पण एक तरी हिंंदी चॅनेलचंपू मोर्चा कव्हर करायला येऊ दे असा हेका धोंडेपाटलानी लावला होता…

…खूप वेळ झालाय आधीच, आता राहू द्या हो तो हिंदीवाला, आपण त्याच्याशिवाय काढुया मोर्चा, असं कार्यकर्तेही धोंडेपाटलांना म्हणू लागले होते…

…पण हिंदीवाला वाटेत आहे, आता दोन मिनिटात येईल…धोंडेपाटील आपला हिंदी राष्ट्रभाषेचा हेका सोडायला तयार नव्हते…

…पण तुम्हाला राष्ट्रभाषेचा एवढा पुळका कशापायी?…एका कार्यकर्त्याने धोंडेपाटलांना विचारला…

…अहो, राष्ट्रभाषेतलीच बातमी दिल्लीपर्यंत जाते…हिंदुरावांनी आपलं गुपित सांगून टाकलं…

…इतक्यात तो हिंदी चॅनेलचंपू आला…आणि धोंडेपाटलांच्या चेहर्‍यावर फेअरनेस क्रीम पसरलं…

…हिंदी चॅनेलचंपूने आपला कॅमेरा सेट केला…आणि हिंदूरावांचा भव्य, विराट, विशाल मोर्चा सुरू झाला…

…सगळ्यांनी घोषणा दिल्या…कौन करेंगे, हम करेंगे…हम से जो टकराएगा…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here