घरलोकसभा २०१९डोक्याला शॉट...तो एक कार्यकर्ता!

…तो एक कार्यकर्ता!

Subscribe

भाऊ नगरसेवक होते तेव्हापासून मधू त्यांचा कार्यकर्ता आहे. भाऊ आता पार्लमेंटपर्यंत पोहोचले तरी मधू अजून त्यांचा कार्यकर्ताच आहे.

…फार फार तर मधू त्यांचा सिनियर कार्यकर्ता आहे…

- Advertisement -

…मधूने वयाची ज्येष्ठता ओलांडली तरी मधू अजून कार्यकर्ताच आहे आणि तो आज पस्तिस वर्षं भाऊंचाच कार्यकर्ता राहिला आहे ह्याचा त्याला सार्थ अभिमान आहे…

…भाऊंनी वार्‍याची दिशा बघून पक्ष बदलले…पण मधूने भाऊंना कधीच बदललं नाही…

- Advertisement -

…भाऊंच्या इतर कार्यकर्त्यांनी पक्ष बदलताना भाऊंना बदलून टाकलं…पण मधू भाऊंचा हनुमान बनून कायम भाऊंसोबत राहिला…

…तसं कधी कधी भाऊंच्या मागे मधूने भाऊंचं राजकीय ज्ञान काढलं…पण भाऊ समोर आल्यावर भाऊच अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणत भाऊंना कौतुकाचं अभ्यंगस्नानही घातलं…

…भाऊंबरोबर राहून आपण सडलो असाही साक्षात्कार अधेमधे मधूला व्हायचा…पण भाऊच आपले आणि दीनदुबळ्यांचेही तारणहार असंही मधू कधीमधी म्हणायचा…

…भाऊंच्या पक्ष बदलण्याची जेव्हा कुणकुण लागायची तेव्हा मात्र मधू खूप अस्वस्थ व्हायचा…तो डॉक्टरांकडे जाऊन झोपेच्या गोळ्या घ्यायचा…

…आता बदललेला झेंडा घेऊन बदलत्या नेत्यांचा झिंदाबाद करावा लागणार ह्याचा मधूला त्रास व्हायचा…मधूला त्याची मनातून लाजही वाटायची…

…मधू कधी पिसाटलाच तर भाऊंच्या ड्रायव्हरकडे भाऊंच्या ह्या दलबदलू राजकारणाची पिसं काढायचा…भाऊंच्या प्रतिस्पर्धी नेत्यांचे कार्यकर्ते मधूला त्यावेळी भेटले तर मधू त्याबाबत त्यांच्याशीही आपलं मन मोकळं करायचा…

…तेसुध्दा त्यांचे नाना, त्यांचे दादा भाऊंनी सोडलेल्या पक्षाच्या वाटेवर आहेत म्हणून मधूला सांगायचे…अशा वेळी मधूसमोर दुसरा पर्याय नसायचा…तो आपल्या कपाळावर हात मारून घ्यायचा…आणि आपल्यासारखीच दु:खी जमात दुसर्‍या पक्षातही आहे हे बघून थोडासा सुखावायचा…

…निवडणुकीची चाहूल लागली की मधूच्या छातीत धडकी भरायची…भाऊ आहे त्याच पक्षात राहणार की जाणार, ह्याचा अंदाज घेण्यासाठी मधू त्यांच्या शर्ट, पॅन्ट आणि रूमालाच्या रंगावर लक्ष ठेवून असायचा…

…भाऊ भडक रंगांचे कपडे घालायला लागले की भाऊ भडक पक्षात जाणार हे नक्की व्हायचं…मग मधू भाऊंवर खूप भडकायचा…

…चार दिवस भाऊंच्या घरीदारी, कार्यालयात पाऊल टाकायचा नाही…

…पण पाचव्या दिवशी भाऊ मधूच्या घरी जायचे…आणि मधूच्या बायकोला हर्नियाच्या ऑपरेशनसाठी पैसे देऊन यायचे…

…सहाव्या दिवशी मधू भाऊंच्या नव्या पक्षाचा नवाकोरा झेंडा हातात घ्यायचा…आणि म्हणायचा, निवडून निवडून येणार कोण, भाऊंशिवाय आहेच कोण?…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -