स्टेज, मंडप, निवडणूक!

Mumbai
Dokyla shot editorial
डोक्याला शॉट संपादकीय

पंढरी मंडपवाल्याला देशात लोकशाही आहे, संविधान आहे वगैरे काही माहीत नाही, पण देशात निवडणुका होतात ह्याची चांगली माहिती आहे.

…निवडणुका का होतात ह्याची त्याला माहिती नाही…पण आपल्याकडे अमावास्या-पौर्णिमेला कुठे ना कुठे, कसल्या ना कसल्या निवडणुका अपरिहार्यपणे होतच राहतात हे तो व्यवस्थित जाणून आहे…

…आजुबाजूला असलेले कोणत्या ना कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते, पंढरी तयार राहा असं म्हणायला लागले की पंढरीला निवडणुकीची चाहूल लागते…

…पंढरी मंडपवाल्याला लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका असा निवडणुकीचा फरक कळत नाही…त्याला सगळ्या निवडणुका सारख्याच वाटतात…

…निवडणूक आली…आता आपल्याला मंडप टाकायची ऑर्डर मिळणार…त्यातून चार पैसे मिळणार हे इतकंच त्याला निवडणुकीचं साधंसोपं गणित कळतं…

…त्याने उभारलेल्या स्टेजवरून महान महान नेतेे येतात आणि त्याच्याच मिळकतीतल्या माइकवरून लोकांना कोटी कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची मधाळ आश्वासनं देतात…ती किती सत्यात उतरतात ह्याचा धांडोळा पंढरी कधीच घेत नाही…पण कुठल्याही निवडणुकीपुरतं किमान त्याला स्वत:ला तरी रोजगार मिळतो ह्याबद्दल तो आपल्या लोकशाहीचे खूप आभार मानतो…

…गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात त्याला मंडपासाठी प्रचंड मागणी असते…त्यानंतर निरनिराळे नेते, कार्यकर्ते स्वत:च्या तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींच्या जितके मागे लागत नसतील तितके मंडपासाठी त्याच्या मागे लागतात…

…पंढरी मंडपवाल्याला त्यामुळेच निवडणूक हा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव ह्यासारखाच एक उत्सव वाटतो…

…आणि खुद्द पंढरीसुध्दा निवडणुकीच्या मंडपांची गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासारखीच तयारी करतो…तो आपल्या मंडप टाकण्याच्या धंद्याशी संपूर्ण इमान राखत सगळ्या उत्सवांना अगदी समान न्याय देतो…

…तो वर्तमानपत्रं वगैरे वाचण्याच्या भानगडीत पडत नाही…त्यामुळे त्याला खोलातलं सोडा, वरवरचं राजकारणसुध्दा कळत नाही…

…राजकारणातल्या लोकांशी वारंवार संपर्क येऊनही त्याला राजकारण कळत नाही, ह्याबद्दल त्याची त्याच्या शेजार्‍यापाजार्‍यांकडून यथेच्छ चेष्टा होते…पण त्याचं एकच म्हणणं असतं की आपल्याला काय करायचंय राजकारण, आपला धंदा बरा की आपण बरे…

…पंढरी सगळ्याच पक्षांना मंडप टाकून देत असल्यामुळे त्याचा हा सर्वपक्षसमभाव खरोखरच वाखाणण्याजोगा असायचा…पण त्याचा हा सर्वपक्षसमभाव इथल्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या सर्वधर्मसमभावासारखाच अदखलपात्र ठरायचा…

…मंडप टाकला, स्टेज उभारलं की आपला कार्यभाग संपला असं पंढरी मानत असे…त्यानंतर त्या मंडपात कोण दिग्गज, कोण वजनदार नेता येऊन गेला हे पंढरीच्या गावी नसे…मंडपातले कार्यकर्ते वगैरे त्या दिग्गज, वजनदार नेत्यांबरोबर सेल्फी वगैरे काढून घेण्याचा महान कार्यक्रम करत…पण पंढरी ह्या सगळ्या उपद्व्यापाकडे ढुंकूनही लक्ष देत नसे…

…पंढरी मंडपवाला भगव्यांना भगवा, निळ्यांना निळा, हिरव्यांना हिरवा, तिरंग्यांना तिरंगी आणि अपक्षांना बेरंगी मंडप टाकून देत असे…पण ह्यातल्या सगळ्या रंगांच्या मंडपाखाली वावरूनसुध्दा स्वत:च्या शर्टावर त्यातल्या एकाही रंगाचा थेंब उडवून घेत नसे…

…पंढरीच्या धंद्यातले इतर मंडपवाले प्रत्येक पक्षाच्या मंडपात मी तुमचाच, तुम्हीच निवडून येणार, असं धंद्याची एक लाइन म्हणून त्या त्या पक्षाच्या लोकांना म्हणत असत…पण पंढरीच्या स्वभावात अशी मस्कापॉलिसी नावाचा प्रकारच नव्हता…

…पंढरी एक सरळसोट मंडपवाला होता…मंडप टाकला, स्टेज उभारलं की पंढरी तिथून जे सटकत असे ते पेमेंट घेऊन मंडप काढायलाच मंडपात डेरेदाखल होत असे…

…कोणत्या पक्षाची किती ताकद आहे…कोणत्या पक्षाला किती जनाधार आहे…कोणत्या पक्षाची कुठे पॉकेट्स आहेत…पंढरीकडे ह्यातला एकही तपशील नसे…

…दुसर्‍या पक्षातला नेता तिसर्‍या पक्षात आंघोळ करून चौथ्या पक्षात अंग पुसायला आला तरी पंढरी मंडपवाल्याला त्याच्याबद्दल काही कळत नसे…त्याला त्या नेत्याचा पहिला आणि शेवटचा पक्ष एकाच नाण्यासारखा वाटे…

…पंढरीला मंडपाची ऑर्डर मिळाली की तो आपल्या पंटरना घेऊन आपल्याच धुनकीत मंडप टाकत असे…आणि निवडणूक संपली की मंडप काढून मागे न बघता निघून जात असे…

…पण पंढरीचं एक होतं की निवडणुकीच्या निकालाच्या खूप आधी तो सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या मागे पैशांचा तगादा लावत असे…

…काही नेते त्याला थोड्या वेळाने ये सांगत…काही नेते दोन दिवसांनी ये म्हणत…तर काही नेते निवडणुकीचा निकाल लागल्यावर ये अशी त्याची बोळवण करत…

…आपणच बांधलेल्या अशा कित्येकांच्या रंगीबेरंगी मंडपाखालून वर्षानुवर्ष गेल्यामुळे पंढरी मंडपवाल्याच्या गाठीशी राजकारण्यांच्या ह्या असल्या व्यवहारांचा बक्कळ अनुभव होता…

…कुशल प्रशासन, चोख राज्यकारभार असं आपल्या जाहिरनाम्यातून मायबाप जनतेला वचन देणारे पक्ष पंढरी मंडपवाल्याला मंडपाच्या पैशांसाठी चांगलंच तंगवत असत…

…पंढरीसुध्दा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण उभारून दिलेल्या स्टेजवरून निरनिराळ्या पक्षांच्या नेत्यांची भाषणं ऐकत असे…पण आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना त्यालाच मतदान करत असे, ज्याने आपल्याला मंडपाचे पैसे सगळ्यात आधी दिले आहेत…

…पंढरीचा मत देण्यासाठीचा हा निकष त्याच्या जगण्याशी जोडलेला असे हे सांगायला नकोच…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here