गर्दीच्या नेत्याची गोष्ट!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

कोणत्याही घरासमोर सकाळी सकाळी लोक जमा होऊ लागले की कुणालाही एका वाईट घटनेची शंका येणं साहजिक असतं.

…त्यात घरासमोर जमा झालेले लोक किंचित मळलेले, किंचित चुरगळलेले कपडे घालून जमा होऊ लागले की ती वाईट शंका आणखी बळावते…त्यातही त्यांच्या चेहर्‍यावर शोकमग्न भाव असतील तर मनातल्या वाईट शंकेची खात्रीच पटते…

…अशा वेळी त्या मळलेल्या, चुरगळलेल्या नि:शब्द गर्दीच्या जो कोणी जवळ येतो, जो कोणी त्या नि:शब्द गर्दीत नंतर मिसळून जातो तोही मळला जातो, चुरगळला जातो आणि नि:शब्द होऊन जातो…त्याच्या तोंडून त्या मूक गर्दीप्रमाणे एकही शब्द फुटत नाही…

…जणू त्या गर्दीत येणार्‍या प्रत्येकाला ती गर्दी गर्दीप्रमाणे वागण्याच्या अटी आणि शर्ती घालून देते…त्यामुळे त्या गर्दीच्या अटी आणि शर्तीप्रमाणे कुणी चुकूनही हसत नाही की मोठमोठ्याने बोलत नाही, बोलायचंच झालं तर कुणीही कुणाच्या कानात अगदी हळूच कुजबुजतं…

…तर सांगायचा मुद्दा हा की विजयकुमार धोपटेंच्या घरासमोर त्या दिवशी सकाळी सकाळी अशीच गर्दी जमा झाली होती…थेंबाथेंबाने जलाशय निर्माण व्हावा तशी एका एका माणसाने गर्दी वाढत होती…आणि मतामताने मतपेटी गच्च भरावी तसं प्रत्येकाचं विजयकुमार धोपटेंबद्दलचं आपापलं मत गर्दीच्या मतमतांतरात मिसळलं जात होतं…

…विजयकुमारसारखा नवतरूण, हरहुन्नर, अतिशय कमी वयात जनतेची विधायक कामं झपाट्याने करणारा आपल्या परिसरात दुसरा नेता नव्हता ह्यावर त्या मळलेल्या, चुरगळलेल्या गर्दीतल्या प्रत्येकाचं एकमत होतं…आणि तसंही अशा वाईट प्रसंगी त्या व्यक्तीबद्दलचं आपलं वाईट मत मांडण्याची प्रथा नसते हे गर्दीतल्या प्रत्येकाला मान्य असतं…

…पण तरीही विजयकुमार ह्या एका सळसळत्या रक्ताच्या उभरत्या नेतृत्वाबाबत असं अघटित घडणं हा सगळ्यांना अकस्मात धक्काच होता…कारण गेल्या साडेचार वर्षांत रक्तदान शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना वह्यापुस्तकं वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी शनीशिंगणापूरची मोफत यात्रा, गृहिणींसाठी पाककला स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून विजयकुमारने परिसरातल्या जनताजनार्दनावर चांगलीच पकड मिळवली होती…

…आता जरी निवडणूक घेतली असती तरी विजयकुमारने आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याला मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून प्रचंड पिछाडीवर टाकलं असतं ह्याची परिसरातल्या प्रत्येकाला शंगर टक्के खात्री होती…

…त्यामुळेच विजयकुमारच्या घरासमोरच्या गर्दीतला प्रत्येक जण सकाळी सकाळी हळहळत होता…विजयकुमार हा खरंच गर्दीचा नेता नव्हता तर नायक होता…

…शेवटी गर्दीत नव्याने सामील झालेल्या एकाने कुजबुजतच विचारलं, कधी नेणार?…

…दुसर्‍याने विचारलं, कुणाला?…

…आपले हेच, तरूण रक्ताचे, ज्यांच्यासाठी आपण जमलो आहोत?…पहिल्याने दबकत विचारलं…

…दुसर्‍याची ट्युब लगेच पेटली…तो पहिल्याला बाजुला नेत म्हणाला, ए बाबा, तसं काही घडलेलं नाही…श्रेष्ठींनी विजयकुमारचं फक्त तिकिट कापलंय…

-अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here