…त्यांची लोकशाही!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपण प्राणपणाने लढलं पाहिजे…प्रसंगी रस्त्यावर उतरायची तयारी ठेवली पाहिजे.

…मोठे साहेब जोरदार भाषण ठोकत होते…आज प्रत्येक वाक्यात ते लोकशाही ह्या शब्दावर जोर देत होते…

…ह्या देशातली लोकशाही ही कोणत्याही परिस्थितीत जगली पाहिजे…लोकशाही जगली तर आज ह्या देशात आपण जगू शकू…

…मोठे साहेब लोकशाहीचा धरलेला पदर सोडायला तयार नव्हते…आज त्यांना लोकशाहीपेक्षा इतर काहीच महत्वाचं वाटत नव्हतं…

…आपला देश हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे…आपल्या देशातल्या लोकशाहीकडे जगातले बलाढ्य देशही आदर्श लोकशाही म्हणून पहातात…

…मोठ्या साहेबांनी लोकशाही सोडून दुसरं काही बोलायचंच नाही असं ठरवलं होतं…लोकशाहीबद्दल असं सतत बोलताना त्यांच्या चेहर्‍यावर अतिशय धीरगंभीर भाव होते…

…आपण लोकशाहीत राहतो, ह्याचा आपल्याला अभिमान नव्हे, गर्व वाटला पाहिजे…लोकशाही हा आपल्या व्यवस्थेचा अलंकार आहे, व्यवस्थेचं आभुषण आहे…

…मोठे साहेब आपल्या भाषणात लोकशाहीला दागदागिन्यांनी नुसते मढवत सुटले होते…लोकशाही प्रत्येकाच्या गळी उतरवत होते…

…गेली सत्तर वर्षं लोकशाही जगवण्यासाठी आपण जगलो…लोकशाही आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली…

…मोठ्या साहेबांनी लोकशाही ह्या मुद्यावरून आपला गियर बदललाच नाही…लोकशाही ह्या विषयावर बोलताना ते फारच रमल्यासारखे दिसत होते…

…लोकशाही हा आपला श्वास आहे…लोकशाही हा आपला उच्छवास आहे…

…भाषणाच्या नावाखाली मोठे साहेब आता खूपच भंकस करू लागले आहेत असं व्यासपीठावरच्या मान्यवरांनाही वाटू लागलं होतं…एकादोघांनी तर आलेली जांभई तोंडावर रूमाल धरून चक्क लपवली…

…लोकशाहीशिवाय देश म्हणजे शेंगदाण्याबिगर शेंग…मोठ्या साहेबांनी सुचली ती उपमा मागेपुढे न बघता देऊन टाकली…

…शेवटी एक कार्यकर्ता मोठ्या साहेबांच्या भाषणाला खूप कंटाळला…त्याने आपल्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी मोठे साहेब भाषण करत असतानाच त्यांना पाठवण्याचं धाडस दाखवलं…

…ती चिंठ्ठी पोहोचताच मोठ्या साहेबांनी आपल्या भाषणात लोकशाहीला सोडचिठ्ठी दिली…आणि ते आपल्या पक्षाच्या कामगिरीबद्दल बोलू लागले…

…कारण सरळ होतं…कार्यकर्त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं…साहेब, तुमच्यावर झालेला घराणेशाहीचा आरोप लोक कधीच विसरलेत त्यामुळे आता लोकशाहीबद्दल बोलणं सोडून द्या…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here