पक्षाची ताकद वाढण्यासाठी…

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

पक्षाची ताकद नावाचा एक प्रकार राजकारणात प्रचलित असतो…आणि त्या ताकदीसाठी पक्षातली खालची-वरची मंडळी झटत असतात.

…परवाच एका जबरदस्त सशक्त पक्षाचा नेता पक्ष थोडासा अशक्त असलेल्या ठिकाणी गेला…आणि तिथल्या लोकांना पक्षाची ताकद वाढण्यासाठी काय काय करावं लागेल, ह्यासाठी चार-दोन युक्तीच्या गोष्टी सांगू लागला…

…तो म्हणाला, आपला पक्ष इकडे सत्तेत आहे, तिकडे सत्तेत आहे, कानाकोपर्‍यात सत्तेत आहे…मग तुमच्याच भागात असा दुबळा, मलूल, दीनवाणा का?…नेत्याचं भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्याची विशेषणं लावण्याची ताकदही मोठी होेती…

…तो पुन्हा म्हणाला, आज ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण धष्टपुष्ट आहोत…धनाने, मानाने आणि ज्ञानानेही आज आपला प्रचड बोलभाला आहे, तरीही तुमच्या ह्या भागात आपली शरीरयष्टी अशी यष्टीसारखी का?…

…पक्षाच्या त्या भागातल्या ताकदीवर सुरूवातीलाच ही प्रस्तावना बोलून झाल्यावर नेता थांबला…आणि सर्व कार्यकर्त्यांवर त्याने एक चौफेर नजर टाकली…

…त्याचा हेतू होता की त्या भागातल्या कार्यकर्त्यांमधून कुणीतरी पुढे यावं आणि त्या मुद्यावर बोलावं…तसंही कार्यकर्त्यांना बोलतं करण्याचा नेत्याला वरून आदेश होता…

…शेवटी एक आडदांड कार्यकर्ता उठला आणि थोडंसं उध्दटपणे म्हणाला…आपला पक्ष इथे अशक्त आहे ह्याचं कारण आहे आणि ते तुम्हालाही माहीत आहे…

…नेत्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की इथे आपला पक्ष अशक्त आहे, पण आपल्या पक्षातल्या लोकांचं तोंड फारच सशक्त आहे…

…नेत्याने मग त्या आडदांड कार्यकर्त्याला म्हटलं…काय आहे आपला पक्ष इथे अशक्त असण्याचं कारण?…

…ताकद कमी असते म्हणजे काय असतं!…हिमोग्लोबीन कमी असतं, कॅल्शियम कमी असतं, लोह कमी असतं, प्रोटीन्स मिळत नसतात…आडदांड कार्यकर्त्याने धिटांग उत्तर दिलं…

…नेत्याला नीट कारणमीमांसा होईल अशी अपेक्षा होती…पण कारणमीमांसा फारच तिरकस झाली होती…त्याने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांकडे चौफेर पाहिलं…

…कोपर्‍यातून एक कार्यकर्ता उठला आणि आधीच्या आडदांड कार्यकर्त्याकडून प्रेरणा घेत म्हणाला…तुम्हाला आमचा हा आडदांडपणा दिसत असेल, पण ते आमच्यातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे…

…आता तर नेता हडबडला…त्यांना सरळ म्हणाला, ह्यावर उपाय काय?…

…आठ-दहा कार्यकर्ते एकदम उठले आणि म्हणाले…आम्हाला टॉनिक द्या, आम्ही आमची ताकद वाढवून दाखवतो…

…नेता म्हणाला, आधी ताकद वाढवा…मग टॉनिकच्या बाटल्या आणून देतो…

…कार्यकर्ते म्हणाले…नाही, आधी टॉनिकच्या बाटल्या द्या, मगच ताकद वाढवून दाखवतो…

…आधी ताकद, आधी टॉनिक…अशी नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप मचमच झाली…

…शेवटी टॉनिकच्या बर्‍याच बाटल्यांवर मांडवली झाली…आणि त्या भागातला अशक्त पक्ष क्षणार्धात सशक्त झाला…आणि पक्ष एकाएकी दंडातल्या बेटकुळ्या दाखवायला लागला…

– अँकर