दोन विचारांचे दोघे!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

एखाद्या रेल्वे स्टेशनाच्या पुलावर काही लोक दोन प्लॅटफॉर्मच्या मध्यावर उभे राहतात… त्यांचा हेतू असतो की गाडी ह्या किंवा त्या प्लॅटफॉर्मवर आली की पटकन पळत सुटून गाडी पकडता यावी…

…कोणतीही निवडणूक येताना काही चतूर आणि चपळ राजकारणी अशाच पुलावर असेच उभे असतात…सध्या कोणती गाडी सुसाट पळणार आहे ह्याचा अंदाज घेतात…

…गाडी नजरेच्या टप्प्यात दिसली की झरझर जिना उतरतात…आणि सिनेमातल्या एखाद्या उत्कट प्रसंगात नायिकेला नायक जशी घट्ट मिठी मारून जखडून ठेवतो तशी गाडीला मिठी मारतात…

…अशा वेळी पुलावरचा कुणी कट्टर आणि कडवट जातियवादी एकाएकी आपले रूळ बदलतो आणि धर्मनिरपेक्ष गाडी पकडतो…तर एखादा जहाल आणि जातिवंत धर्मनिरपेक्षतावादी जातियवादाची गाडी पकडून थेट खिडकीकडली सीट पटकावतो…

…निवडणूक आली की पुलाच्या मध्यावर अशी माणसं गर्दी करू लागतात…आणि एकमेकाला इच्छित गाडीत व्यवस्थित जाऊ देण्याचा शिरस्ता इमानदारीत पाळतात…

…कुणी कुणाला विचारत नाही की तू कालचा कितीतरी वर्षांपासूनचा जातियवादी, पण तुझं असं काय मौलिक प्रबोधन झालं म्हणून आज धर्मनिरपेक्ष होतो आहेस?…आणि धर्मनिरपेक्षतावाद्याला कुणी असं विचारत नाही की तू अशी कोणती अफुची गोळी रात्री झोपताना घेतलीस की तुला अशी अचानक जातियवादाची गाडी पकडावीशी वाटली?…

…दोघंही आपल्याच धुंदीत असतात…दोघंही आपल्या निर्णयाशी ठाम असतात…

…काही केल्या आता गाडी सोडायची नाही हे दोघांच्याही डोक्यात फिट बसलेलं असतं…आणि गाडी ज्या दिशेने चाललेली असते त्या दिशेचं वारं कानात शिरलेलं असतं…

…वेगळ्या विचाराच्या, खरंतर विरूध्द विचाराच्या गाडीतून जाताना दोघंही गाडीचा वेग स्विकारतात…गाडी कोणती स्टेशनं घेणार आहे, ह्याकडे साफ दुर्लक्ष करतात…

…गाडी मात्र जत्रेतल्या ताशेवाल्यांना, पिपाणीवाल्यांना, हवशेनवशेगवशांना घेऊन पुढे पुढे जात असते…नव्या प्रवाशांच्या निष्ठेची मध्ये मध्ये नोंद ठेवून असते…

…कधीतरी एखाद्या दिवशी ह्या दिशेने येणारी आयाराम स्पेशल आणि त्या दिशेला निघालेली गयाराम स्पेशल एखाद्या स्टेशनात बाजुबाजूला थांबतात…

…तेव्हा खिडकीतून आयारामांना गयाराम पहातात…आणि गयारामांकडे आयाराम कटाक्ष टाकतात…

…दोघांनाही आपले रम्य दिवस आठवतात…पण दोघंही गहिवरत नसतात…

…कारण दोघांनाही जनसेवा आणि देशसेवा एकाच वेळी करायची असते…कारण विचारसरणी कोणतीही असली तरी सत्तेत पोहोचण्यासाठी पॅकेज डील मात्र एकच असतं…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here