तुमच्या टोपीचा रंग कोणता?

Mumbai
Dokyla shot editorial
डोक्याला शॉट संपादकीय

पब्लिक मेमरी इज शॉर्ट असं कुणी कितीही म्हणो, पण ये पब्लिक है ये सब जानती हैं असंही कुणीतरी म्हणून ठेवलंच आहे ना?

…अण्णा बनकवडे कायम हे वाक्य सगळ्यांच्या तोंडावर फेकतात…

…सत्तरी पार करून पंच्याहत्तरीकडे दमदारपणे वाटचाल करणार्‍या अण्णा बनकवडेंच्या कुणी नादी लागत नाही…कुणी तोंडी लागत नाही…कुणी वाटेला जात नाही…

…कुणी काँग्रेसवाला अण्णांकडे गेला तर अण्णांची सुरूवात होते…अरे, तू काय मला सांगतो काँग्रेसबद्दल?…मी नेहरूंच्या कोटावरचा गुलाब पाहिलाय माझ्या ह्या डोळ्यांनी…

…कुणी भाजपवाला अण्णांकडे पोहोचला तर अण्णा त्याला सरळ सांगतात…अरे तू काय मला सांगतो भाजपबद्दल?…जनसंघाची मिणमिणती पणती होती तेव्हापासून भाजपला मी ओळखतोय…

…कुणी शिवसेनेवाला अण्णांकडे आला तर अण्णा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात…बाळासाहेबांच्या पहिल्या सभेला हजर राहिेलेला माणूस आहे मी…

…कुणी आपवाला अण्णांना भेटला तर अण्णा म्हणतात…अरे, ते केजरीवाल राळेगणसिध्दीला यायचे तेव्हापासून मी ओळखतो त्यांना…

…कुणी कम्युनिस्ट अण्णांच्या जवळ आला तर अण्णा त्याला सांगतात…कार्ल मार्क्स तू जेवढा वाचला नसशील तेवढा मला माहीताय…

…कुणी समाजवादी अण्णांच्या शेजारी बसला तर अण्णा त्याला म्हणतात…तुझा असा एक समाजवादी साथी सांग की ज्याच्या बाजुला मी बसलेलो नाहीय…

…आंबेडकरी चळवळीतला कुणी अण्णांसमोर येऊन उभा राहिला तर अण्णा म्हणतात…हे बघ पॅन्थरची चळवळ झाली तेव्हा मी बिल्डिगच्या गच्चीवरून ती पाहिलीय…कळलं काय!…

…तर असे हे अण्णा बनकवडे…त्यांनी प्रत्येक इझमचा, प्रत्येक विचारसरणीचा, प्रत्येक पक्षाचा मांडव पाहिलेला…

…त्यामुळे एखाद्या धनवानाला त्याच्याकडे असलेल्या धनाचा गर्व होणार नाही तितका अण्णा बनकवडेंना आपल्या तुटक्याफुटक्या राजकीय ज्ञानाचा गर्व…

…पण अण्णा बनकवडे राजकारणावर ज्या कुणाशी वाद घालायचे ते अण्णांना शेवटी विचारायचेच…ते सगळं जाऊ द्या अण्णा, एवढे सगळे झेंडे तुम्ही पाहिलेत, पण मग तुमच्या झेंड्याचा रंग कोणता?…

…अण्णा बनकवडे ह्या प्रश्नावर जबरदस्त फिस्कटायचे…म्हणायचे…नाही हां, माझा कसला झेंडा पण नाय…आणि माझा कसला रंग पण नाय…

…तरी पण तुमचा कोणता ना कोणता तरी झेंडा असेलच…तुमची पण कोणत्या ना कोणत्या रंगाची टोपी असेलच…लोक त्यांना फिस्कटवायचेच…

…अण्णा बनकवडे जामच फिस्कटले की उजव्या हाताची तर्जनी डोक्याच्या वर नेत सांगून टाकायचे…मी पब्लिक आहे पब्लिक…पब्लिकचा प्रतिनिधी…ये पब्लिक है ये सब जानती हैं म्हणणारा…पब्लिक मेमरी इज शॉर्टवाला नाही…

…अण्णा बनकवडेंचं हे तत्वज्ञान कुणाला पटायचं नाही…पण अण्णा बनकवडेंसमोर हे बोलणार कोण हा प्रश्न असायचा…

…स्वत:लां पब्लिकचा प्रतिनिधी म्हणवून घेणार्‍या अण्णा बनकवडेंच्या टोपीचा रंग कोणता, ह्याचा शोध घेण्याचा त्यांच्या आजुबाजूचं पब्लिक पुष्कळ प्रयत्न करायचं…

…पब्लिक अण्णा बनकवडेंची फिरकी ताणायचं…अण्णा बनकवडेंना गुगली टाकायचं…पण अण्णांचा हेका एकच…माझ्या टोपीला रंग नाय म्हणजे नाय…मी एकजात पब्लिकचा प्रतिनिधी…

…पब्लिक त्यांच्या ह्या उत्तराला कधी हसायचं…कधी वैतागायचं…कधी येडा म्हातारा म्हणून सोडून द्यायचं…

…पण एका निवडणुकीत गंमत झाली…अण्णा बनकवडेंनी एका चॅनेलवर ऐकलं की प्रत्येकाच्या खात्यात काही लाख येऊ शकतात…

…अण्णा बनकवडेंनी चॅनेलचा आवाज वाढवला आणि पुन्हा एकदा आकडा ऐकला तर तो पंधरा लाखाचा निघाला…

…अण्णांनी बनकवडेंनी आकडा नीट ऐकला आणि चॅनेलचा आवाज पुन्हा कमी केला…घराची दारं-खिडक्या बंद केली…आणि हळुच आपलं पासबुक काढून त्यातल्या आकड्यात पंधरा लाख मिळवून त्याची बेरीज करून पाहिली…

…अण्णा बनकवडेंनी आरशात आपला चेहरा पाहिला तर त्यांच्या भुवया त्यांना वर गेलेल्या दिसल्या…

…अण्णा बनकवडे घराबाहेर आले…नेहमीप्रमाणे टाइमपाससाठी त्यांच्याभोवती रिटायर्ड लोक गोळा झाले…

…त्यांनी कुणी राजकारणातला कोणता विषय काढण्याच्या आधीच अण्णा बनकवडे म्हणाले, आपल्या बँकेच्या पासबुकावरचा आकडा जो कुणी वाढवेल तो आपला…आपलं मत त्याला…

…अण्णा बनकवडे इतकं म्हणाले मात्र…ज्याने त्याने चरकून अण्णा बनकवडेंकडे बघितलं…कारण प्रत्येकाने आपापल्या टीव्हीवर तो पंधरा लाखाचा आकडा पाहिलेला आणि ऐकलेला होता…आणि प्रत्येकाने आपापलं पासबुक काढून पंधरा लाख हातचे मिळवून बघितले होते…

…सगळे एकसुरात म्हणाले…अण्णा, कळला, तुमच्या टोपीचा रंग कळला…

…अण्णा बनकवडेंनाही सगळं कळून चुकलं…पण तरीही अण्णा बनकवडेंचा हेका कायम राहिला…माझ्या टोपीला कोणता रंग नाही…मी पब्लिकचा प्रतिनिधी…

…पण बाकीच्या सगळ्यांनी अण्णांना अण्णांचंच तत्वज्ञान ऐकवलं…ये पब्लिक है ये सब जानती हैं…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here