मुखपत्रातला राम गेला कुठे?

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

नामदेवने तसं मुखपत्र वाचणं चालू ठेवलं होतं, पण मुखपत्रातल्या बातम्यांमध्ये आता काही राम राहिला नाही असं तो सारखं म्हणू लागला होता.

…नामदेवची बायको म्हणाली, अहो, कायम तेच मुखपत्र वाचताय ना?…मग एकाएकी तुम्हाला त्यात राम का वाटेनासा झाला?…

…नाही गं, आता राम नाही राहिला मुखपत्रातल्या बातम्यांत…नामदेवचं बायकोच्या मागे तरीही टुमणं चालूच राहिलं…

…पण मुखपत्रातला हा राम एकाएकी कमी कसा झाला?…नामदेवच्या बायकोनेही मुद्दा लावून धरला…

…आता मुखपत्रात कोण कुणाला आव्हान देत नाही…कोण कुणावर कसली चिखलफेक करत नाही, कुणाची हजामत करत नाही…त्यामुळे मजा येत नाही…नामदेवने आपलं तुणतुणं चालूच ठेवलं…

…नाहीतरी तुम्हाला रिटायर झाल्यापासून हल्ली कशातच राम वाटत नाही…संसारात तरी हल्ली तुम्हाला कुठे राम वाटतोय?…नामदेवची बायको नामदेववर जवळ जवळ फिस्कारलीच…

…तसं नाही गं, मुखपत्रात आता काही दिवसांपूर्वी राम कसा अयोध्येपासून वांद्यापासून छान लावून धरला होता…तेव्हा मुखपत्रातल्या बातम्यांमध्येही तसा काहीतरी राम वाटायचा…नामदेव बायकोला समजावत म्हणाला…

…मग मुखपत्रातून एकाएकी हा राम सोडला कुणी?…नामदेवच्या बायकोने नामदेववर नेम धरून बाण सोडला…

…अगं, राम कुठे सोडलाय…पण रामाबद्दलच्या बातम्या मुखपत्रात हल्ली बंद झाल्या आहेत…पुढच्या काळात गरज भासलीच तर रामनाम पुन्हा कधीही सुरू होऊ शकतं…नामदेवने मुखपत्राचा किल्ला बायकोजवळ कट्टरपणे लढवला…

…मग तुम्हाला मुखपत्रात राम का वाटेनासा झालाय?…नामदेवच्या बायकोने पुन्हा कळीचा मुद्दा बाहेर काढला…

…अगं तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय…पुर्वी मुखपत्र म्हणजे जंगी धुमशान असायचं…तिथून कुणी अरे म्हटलं की इथून कारे असायचंच…मर्दमावळे वगैरे शब्द असायचे…आता अचानक ते सगळं बंद झालं म्हणून मुखपत्र वाचताना राम वाटेनासा झालाय गं…नामदेवने काकुळतीने बायकोला सांगितलं…

…अहो, पण हे अरेकारे, मर्दमावळे कधीपासून बंद झालं असं विचारतेय मी?…नामदेवच्या बायकोने भोळेपणानेच विचारलं, पण नामदेवचा पिच्छा सोडला नाही…

…नामदेव म्हणाला, कधी काय कधी, युती झाल्यापासून सगळं बंद झालं…युती झाली, पण मजा गेली…

…म्हणजे गड आला, पण सिंह गेला, तसं काय?…नामदेवच्या बायकोने साळसुद प्रश्न केला…

…नामदेवच्या बायकोला काय कळायचं ते कळलं…आणि कळू नये तेही कळलं…

– अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here