घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टघराणेशाहीच्या वादात सांगली काँग्रेसकडून निसटणार

घराणेशाहीच्या वादात सांगली काँग्रेसकडून निसटणार

Subscribe

सध्या सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने संजय पाटील यांच्याविषयीचे सर्व वादविवाद संपवून त्यांची उमेदवारी घोषित केली असून संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला सुरुवातही केली आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील वसंतदादा पाटील समर्थक गट आणि विरोधी गट यांच्या वादामुळे काँग्रेस हायकमांडची गोची झाली आहे. त्यातच ही जागा स्वाभिमानी संघटनेला देण्याचा विषय समोर दामटवण्यात आल्याने सांगली काँग्रेसमधील वाद टोकाला पोहोचला आहे. काँग्रेसमधील घराणेशाहीच्या वादात सांगली लोकसभा मतदार काँग्रेसच्या हातून निसटणार आहेच, त्यानंतर तो महाआघाडीच्या हातूनही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगली लोकसभा मतदार संघ हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा गड मानला जात होता. २००९पर्यंत या ठिकाणी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. ८०च्या दशकात सांगलीमधून वसंतदादा पाटील यांचे जिल्ह्यात वर्चस्व वाढले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा राज्यावर जसा प्रभाव पडला, तसा जिल्ह्यातही प्रभाव वाढत राहिला, मात्र इतरांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत असतात, यालाच राजकारण म्हणतात. त्याप्रमाणे पुढे सांगली काँग्रेसमध्ये अनेक सत्ताकेंद्रे बनली. ज्यात इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील यांचे नाव घेता येईल, मात्र वसंतदादा पाटील यांच्या राजकीय खेळीत राजारामबापू पाटील यांचे नेतृत्त्व पुढे येऊ शकले नाही. त्यानंतर केडगावमधून पतंगराव कदम यांचे नेतृत्त्व उदयास आले, मात्र काँग्रेसच्या या घराणेशाहींच्या वादात पतंगराव कदम यांना शेवटपर्यंत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू दिले नाही. आज या सर्व घराणेशाहींची दुसरी-तिसरी पिढी राजकारणात कार्यरत असून आधीच्या पिढीतील वैरभावना मनात घेऊनच ही पिढीदेखील राजकारण करू लागली आहे. म्हणूनच आता सांगली जिल्ह्यावरील वसंतदादा पाटील घराण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अन्य घराणी कार्यरत झाली आहेत. वसंतदादा पाटील समर्थक गट आणि विरोधक गट अशी उभी फूट जिल्ह्यात पडली आहे. याचा थेट परिणाम २०१९च्या लोकसभा निवडणुकीत होत आहे.

- Advertisement -

या राजकारणाचा अंदाज येताच वसंतदादा पाटील यांचा एक नातू प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याचे घोषित करून भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या वेळी लोकसभेसाठी वसंतदादा पाटील यांचा दुसरा नातू विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र येनकेन प्रकारेण वसंतदादा पाटील घराण्याकडे नेतृत्त्व येऊच नये, यासाठी आता विरोधी गट कार्यरत झाला असून यात राजारामबापू पाटील यांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही पुढाकार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकीवात येत आहे. दुसरीकडे पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत कदम यांनीही यात हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे सांगली लोकसभेची जागा काँग्रेसची असून ती लढवण्यासाठी वसंतदादा पाटील यांचा नातू विशाल पाटील इच्छूक असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली तरी Sangli,Lok Sabha,constituency,Sanjay Patil,BJP,Vasantdada Patil,Islampur, Rajaram Bapu Patil,Patangrao Kadam,NCP,Jayant Patil,Ashok Chavanबाबत स्पष्ट भूमिका मांडत नाही. अशोक चव्हाण यांचे मौनदेखील सांगलीतील वसंतदादा पाटील घराण्याच्या विरोधी गटाचाच एक भाग आहे का, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सांगलीची जागा महाआघाडीतील घटक पक्ष स्वाभिमानी संघटनेला देण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही जागा काँग्रेसची असून त्यावर विशाल पाटील लढतील अशी आग्रही भूमिका घेत स्व. वसंतदादा पाटील समर्थकांनी जिल्ह्याच्या काँग्रेस मुख्यालयालाच टाळे ठोकले, त्यानंतर विरोधी गटाने ते टाळे उघडले. यावरीही अद्याप काँग्रेस नेतृत्त्व निर्णय घेत नाही. परंतु सांगली जिल्ह्यातील एकूण घराणेशाहींमधील अंतर्गत काटशाहच्या राजकारणात काँग्रेस नेतृत्त्वाने यंदा ही जागा स्वाभिमानीसाठी सोडून देण्याचा निर्णय घेतला असून दोन-तीन दिवसांत त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेकडून उमेदवाराची घोषणा होऊन पुढे या मतदारसंघात आघाडीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू होईल.

असे असले तरी सांगली मतदारसंघातील या वेगवान घडामोडींचे पडसाद शेजारच्या हातकणंगले मतदारसंघात उमटतील, अशी चिन्हे दिसू लागली. या ठिकाणी स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी स्वत: उमेदवार आहेत. त्यामुळे स्वाभिमानी आघाडीचे नेते खासदार राजू शेट्टी यांना ‘वसंतदादा घराण्यावर अन्याय करून वादग्रस्त बनलेली सांगलीची जागा आम्हाला नको’, असे जाहीर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्वाभिमानीला सांगलीची जागा देण्याची नामी कल्पना पहिल्यांदा मांडली कुणी, हा प्रश्न आता सांगलीकरांना पडला आहे. काँग्रेसअंतर्गत गटबाजीतून कुणी ही वात पेटवून दिली, की राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीच हा डाव मांडला, याबाबत संभ्रम आहे. या संभ्रमातच असून महाआघाडीचे नाट्य सुरू आहे.

- Advertisement -

दुसरीकडे मात्र भाजपचे उमदेवार संजयकाका पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरून जोरदार प्रचाराला सुरूवात केली असून भाजपने सर्व ताकद यासाठी वापरली आहे. काँग्रेसमधील घराणेशाहींमधील शह-काटशाहच्या राजकारणामुळे सांगली लोकसभा पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात अलगद येईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान भाजपमध्येही संजय पाटील यांच्याबाबत सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या आणि पाटील यांना हे नाराजी नाट्य संपवण्यासाठी सगळी राजकीय शक्ती पणाला लावावी लागली. जिल्ह्यात भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक असे पाच आमदार, जिल्हा परिषद, सहा पंचायत समित्यांमध्ये सत्ता आणि महापालिकेवर वर्चस्व अशी सगळी परिस्थिती असूनही खासदार संजय पाटील यांची उमेदवारीची वाट सुकर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना मुंबईत बैठक घ्यावी लागली. तिथे गेल्या पाच वर्षांतील गटबाजीचा पाढा वाचला गेला. ‘अखेर झाले गेले विसरून कामाला लागा, यापुढे गटबाजीचा ताप कुणाला होणार नाही’, असा तोडगा काढण्यात आला. नंतर खासदार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र अजूनही जत आणि तासगाव-कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य आणि गटबाजीचे वेगळे तंबू शिल्लकच आहे. दरम्यान, भाजपचे एकेकाळचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनीही खासदार पाटील यांना जोरदार आव्हान दिले होते. पडळकर यांचे आक्रमक वक्तृत्व त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. पडळकर यांनी भाजपमधून बंडखोरी केली तर मोठी चुरस होऊ शकते. पडळकर यांच्या भूमिकेमुळे खासदार पाटील समर्थकांत अस्वस्थता दिसते.

सांगली लोकसभा मतदार संघावर १९५७पासून २००९पर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भारतीय जनता पक्षाने ही जागा काँग्रेसच्या हातून खेचून घेतली आणि संजयकाका पाटील हे निवडूण आले. काँग्रेसचे उमेदवार प्रतिक पाटील यांना ३ लाख ७२ हजार २७१ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना ६ लाख ११ हजार ५६३ मते मिळाली. २ लाख ३९ हजार २९२ मतांनी आघाडी मिळवून विजय मिळवला. २०१९मध्येही भाजपकडून संजय पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेस असूनही या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक हे निवडून आले. आता २०१९मध्येही धनंजय महाडिक यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

एकूण मतदार
पुरुष मतदार – ८ लाख ६१ हजार ५८२
महिला मतदार – ७ लाख ८७ हजार ५२५
एकूण मतदार – १ कोटी ६ लाख ४९ हजार १०७

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -