घरलोकसभा २०१९बदललेल्या हवेचा अंदाज पवारांनी घेतला

बदललेल्या हवेचा अंदाज पवारांनी घेतला

Subscribe

‘हवा तेज चलता है दिनकरराव, टोपी संभालो उड जाएगा’ अग्नीपथ चित्रपटातील अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनने गोगा कपूरला मारलेला डायलॉग आज आठवण्याचे कारण म्हणजे राजकारणातील भीष्माचार्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानकपणे माढा लोकसभा मतदारसंघातून घेतलेली माघार.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील बदललेली हवा सर्वात आधी ओळखतात. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा पुलवामा हल्ल्याच्या आधीचा होता. त्यावेळी भाजप सरकार राफेल, रोजगार, काळा पैसा अशा अनेक मुद्यावरून संकटात सापडले होते. मात्र १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात शिरून एअर स्ट्राइक केला आणि देशातील एकूणच वातावरण बदलले. भाजपला असलेला विरोध मावळला. त्यामुळे माढातून उभे राहिल्यावर मतदारसंघ पिंजून काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा राज्यभर फिरून पक्षाच्या प्रचाराला बळ द्यावे, असाही विचार उमेदवारी मागे घेण्यामागे असू शकतो. कारण राष्ट्रभक्तीचे वातावरण आणखी एक महिना कायम राहिल्यास भाजप पूर्ण बहुमताने केंद्रात निवडून येईल, ही शक्यता पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्याने हेरली असेल. त्यामुळे आपली २०२० पर्यंतची आपली राज्यसभाच बरी असाही विचार पवारांनी केलेला असू शकतो.

- Advertisement -

शरद पवार हे आपल्या अनिश्चिततेसाठीही सर्वपरिचित आहेत. त्यामुळे नव्या पिढीला संधी देण्यासाठी आपण माढातून निवडणूक लढवणार नाही, असे पवार आज म्हणत असले तरी ते उद्या काय भूमिका घेतील हे सांगता येत नाही.राजकीय आणि माध्यम क्षेत्रातील जुणेजाणते लोक म्हणतात की, शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते कधी बोलून दाखवत नाहीत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. दोन आठवड्यापूर्वीच पक्षातील नेत्यांच्या इच्छेखातर मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, असे ठामपणे सांगणार्‍या पवारांनी सोमवारी अचानक मी निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले. माझ्या उमेदवारीचा पक्षाने विचार केलेला नाही, असेही ते म्हणाले. तरुणांना संधी दिली पाहिजे, तसेच एकाच कुटुंबात किती लोकांनी निवडणूक लढवावी? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांनी नक्की माघार का घेतली? हे पवारच जाणोत. मात्र माध्यम म्हणून या कृतीमागच्या काही शक्यता आपण नक्कीच धुंडाळू शकतो.

पक्षातील लॉबिंगला उत्तर

पार्थ पवार यांना मावळमध्ये उमेदवारी देण्याचा विषय ऑक्टोबर २०१८च्या दरम्यान सुरू झाला. माध्यमांमध्ये बातमी झळकल्यानंतर अजित पवारांची यावर पहिली प्रतिक्रिया आली होती. त्यात त्यांनी स्पष्टपणे पार्थची इच्छा असेल तर त्याला स्वातंत्र्य आहे, असे म्हटले होते. दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि शरद पवार मात्र सातत्याने पवारांच्या तिसर्‍या पिढीने निवडणुकीच्या राजकारणात आताच येऊ नये, असा पवित्रा घेतला होता. मात्र अजित पवार पार्थच्या उमेदवारीबाबत एकदाही नकारात्मक बोलले नाहीत. त्यामुळे त्यांचा मूक पाठिंबा असल्याचे दिसतच होते. यातच डिसेंबर महिन्यात खुद्द अजित पवार यांनीच पार्थसोबत पिंपरीमध्ये युवक मेळावा घेऊन मावळ, पिंपरी आणि चिंचवड या परिसरात ‘पार्थ’च उमेदवार असतील असा मेसेज दिला. त्यामुळे इथे दुसरा स्थानिक उमेदवार तयार झाला नाही. दुसरीकडे मावळ लोकसभेच्या अंतर्गत येणार्‍या रायगडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे योग्य उमेदवार नाही. मागच्या वेळी शेकापच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले एकेकाळचे अजितदादा समर्थक लक्ष्मण जगताप सध्या भाजपवासी आहेत. त्यामुळे पवारांचा विरोध असला तरी अजितदादांचा गट पार्थ यांनाच उमेदवारी कशी मिळेल? याकडे डोळे लावून बसला होता.

- Advertisement -

आता माढात कोण?

पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी तरुणांना संधी देत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मावळमध्ये पार्थ पवार निश्चित झाल्यानंतर माढात कोण? असा प्रश्न निर्माण होतो. विजयसिंह मोहिते पाटील हे इच्छुक नाहीत. प्रभाकर देशमुख उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी ते पक्षात नाहीत. मग इथेही तरुणांना संधी द्यावी, असा एक मतप्रवाह माढात आहे. तो तरुण म्हणजे माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील. मोहिते पाटील घराणे हे राष्ट्रवादीच्या पक्षस्थापनेपासून पवार आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. १९९९ ला पक्ष स्थापनेनंतर रणजीतसिंह मोहीत पाटील यांना युवक प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर २००९ साली सुप्रिया सुळे लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची राहिलेली राज्यसभेची टर्म रणजीतसिंह यांनाच देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना पक्षात कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. एकप्रकारे ते अडगळीतच होते. जर पवार तरुणांना संधी देण्यासाठी मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देत असतील तर तोच न्याय त्यांना माढासाठी लावावा लागेल? असाही प्रश्न निर्माण होतो.

पवारांना माढात पराभवाची चिंता होती?

माढा मतदारसंघात अंतर्गत बंडाळीमुळे दगाफटका होण्याची शक्यता होती. पराभव किंवा मताधिक्य घटले असते, त्यामुळे पवार साहेबांनी माघार घेतली, अशी शक्यता राष्ट्रवादीच्या दुसर्‍या फळीतील नेते आता सांगत आहेत. मात्र त्यात तथ्य असेल असे वाटत नाही. कारण जर पवारांना पराभवाची चिंता आहे, तर मग पवारांपेक्षा कोणता मोठा नेता आहे, जो सहज विजय प्राप्त करु शकेल? याचे उत्तर नाही असेच मिळेल. खुद्द पवार यांनीच मी १४ वेळा निवडणूक लढवली असून एकदाही पराभवाचे तोंड पाहिले नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे पक्षातील नेते करत असलेला दावा पोकळ वाटतो. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाची बैठक झाली, त्यावेळी प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनीच माध्यमांना पवार निवडणूक लढवणार असे सांगितले होते. त्यावेळी पक्षांतर्गत विरोधाचे चिन्ह नव्हते का? असाही प्रश्न निर्माण होतो.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -